Shiv Sena 58th Foundation Day Sarkarnama
विशेष

Shiv Sena Foundation Day 2024 : जय महाराष्ट्र, भगवा, वाघ, धनुष्यबाण...हेच जीव की प्राण!

Shiv Sena 58th Foundation Day : शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी जय महाराष्ट्र, भगवा, वाघ, धनुष्यबाण...हेच जीव की प्राण! बाकी सर्व बाबी गौण असतात. पक्षाच्या आजपर्यंतच्या प्रवासात निष्ठावंत कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत मोलाची अशी ठरली आहे.

अय्यूब कादरी

Shiv Sena Anniversary: झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मुख्य आधार असतो. शिवसेना याबाबतीत सुदैवी ठरली आहे. निष्ठावंत, कोणत्याही परिस्थितीत न डगमगणाऱ्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी शिवसेनेला लाभली आहे.

मुंबईतून बाहेर पडून राज्यभरात हातपाय पसरण्याच्या शिवसेनेच्या वाटचालीत अशा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. अशा कार्यकर्त्यांची मजबूत फळी आजही शिवसेनेकडे आहे.

निष्ठावंत, कट्टर कार्यकर्ते हीच शिवसेनेची (Shiv Sena) खरी ताकद आहे. अशा कार्यकर्त्यांच्या बळावरच महाराष्ट्राच्या राजकारणात आमूलाग्र बदल घडवलेल्या शिवसेनेचा बुधवारी (19 जून) 58 वा वर्धापनदिन (Shiv Sena 58th Anniversary) साजरा होत आहेत.

असेच बहुतांश कार्यकर्ते आमदार, खासदार, मंत्री झाले. काळाच्या ओघात त्यांचा नूर पालटला, त्यांची झगमगाट वाढली, आर्थिक ताकद वाढली. असे असले तरीही घरावर तुळशीपत्र ठेवून शिवसेनेला वाहून घेतलेले, झोळी रिकामीच राहिलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. आपली झोळी रिकामी राहिली, याची या कार्यकर्त्यांना खंत ना खेद.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शिवसेना त्यांचा जीव की प्राण! बाळासाहेब आणि शिवसेना यांच्याशीच त्यांची कायम निष्ठा राहिली. उर्वरित कोणत्याही बाबीचा त्यांनी विचार केला नाही.

शिवसेना उर्वरित महाराष्ट्रात हातपाय पसरायला लागली ती प्रस्थापित राजकारणाला, राजकीय नेत्यांना विरोध म्हणून. प्रस्थापितांच्या राजकारणात सर्वसामान्य तरुणांना, त्यांच्या राजकीय आशा-आकांक्षाना अजिबात 'स्पेस' नव्हती.

प्रत्येक जिल्ह्याचे, तालुक्याचे, गावाचे नेते. कार्यकर्ते ठरलेले होते. शिवसेनेमुळे उपेक्षित तरुणांना राजकारणात पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. त्यामुळे तर काळीपिवळी जीप चालवणारे ज्ञानेश्वर पाटील हे भूम-परंड्याचे (जि, धाराशिव) आमदार होऊ शकले. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. बाळासाहेबांनी अशा साध्या, गरीब लोकांना राजकारणात आणले आणि त्यांना आमदार, खासदार, मंत्री केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांना अन्य कोणत्याही पक्षाने अशी संधी देण्याचा साधा विचारही त्या काळात केलेला नसावा.

अशोक सांगवे हे उमरगा (जि. धाराशिव) येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते. 1988 पासून ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. सांगवे यांच्याकडे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहता येईल. ते म्हणतात, प्रस्थापितांच्या राजकारणात सर्वसामान्य तरुणांना राजकारणाचा गंध लागणेही दुरापास्त होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर सामान्य कुटुंबांतील तरुणांना राजकारणात संधीच मिळाली नसती. शिवसेनेत पडलेली फूट वेदनादायी आहे.

आम्हाला ज्या बाळासाहेबांनी राजकारणात संधी दिली, त्यांच्या कुटुंबीयांना सोडून जाण्याचा इच्छा होत नाही. त्यामुळे फुटीनंतर माझ्यासारखे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असेही ते सांगतात. उमरगा मतदारसंघ युतीत भाजपकडे होता. तो शिवसेनेला मिळावा, यासाठी सांगवे यांच्यासारख्या कार्यकर्त्याने केलेल्या प्रयत्नांना बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी प्रतिसाद दिला होता. यासाठी सांगवे यांनी त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

अशोक सांगवे यांच्यासारखा फाटका कार्यकर्ताही 'मातोश्री'वर जाऊन थेट बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊ शकत होते. सांगवे यांनी सहा ते सात वेळा बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. बाळासाहेब त्यांना नावानिशी ओळखायचे. एकदा ते काही कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.

बाळासाहेबांनी त्यांना पाहिले अन् रस्त्यावरच....

बाळासाहेब अगदी काही वेळातच पुण्याला निघणार असल्याचे त्यांना कळाले. त्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. ते गेटच्या बाजूला थांबले. त्यांना खात्री होती की आपल्याला पाहिले की बाळासाहेब नक्की थांबणार. झालेही तसेच. बाळासाहेबांनी त्यांना पाहिले आणि रस्त्यावरच त्यांचे वाहन थांबवले. अशोक, इकडे ये, असे म्हणत त्यांनी हाक मारली आणि दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर येण्यास सांगितले. हा किस्सा सांगताना सांगवे गहिवरून जातात.

निष्ठावंत कार्यकर्त्यांची किंमत बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त कोणाला कळाली असेल, असे म्हणताना अनेकवेळा विचार करावा लागेल. अशा कार्यकर्त्यांच्या बळावरच धाराशिवसह अन्य जिल्ह्यांत शिवसेनेचा विस्तार झाला.

प्रा. रवींद्र गायकवाड हे उमरग्याचे दोन वेळा आमदार झाले, एकदा धाराशिवचे खासदार झाले. ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे दुसऱ्यांदा खासदार झाले. त्यापूर्वी ते एकदा आमदार झाले. ज्ञानराज चौगुले यांची आमदारीकीची तिसरी टर्म आहे. यापूर्वी ज्ञानेश्वर पाटील, कल्पना नरहिरे, शिवाजी कांबळे, दयानंद गायकवाड हे आमदार, खासदार झाले. शिवसेना नसती तर यातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळालीच नसती.

खुर्ची, पैसा हे आमच्यासाठी महत्वाचे नाही....

पैसा. सत्तेच्या लालसेपोटी नेते. कार्यकर्ते इकडून तिकड्या उड्या मारतात. आपल्याला ज्यांनी राजकारणाची संधी दिली, त्यांच्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे. मान, गुत्तेदारी, खुर्ची, पैसा हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. जय महाराष्ट्र, भगवा झेंडा, वाघ आणि धनुष्यबाण हेच आमचे सर्वस्व. यासमोर बाकी सर्व बाबी गौण आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे कार्यकर्ते शिवसेना सोडून कुठेच गेले नाहीत. मी आमदार, खासदारांच्या गाडीत बसून फिरलो नाही, त्यांना कधीही माझे वैयक्तिक काम सांगितले नाही. आम्ही पक्षासाठी काम केले, कोणत्याही नेत्यासाठी नाही...अशोक सांगवे सांगत होते.

एम 80 ला भगवा झेंडा लावून फिरणाऱ्या सांगवे यांना संपूर्ण उमरगा तालुक्याने पाहिले आहे. आता ते मारुती 800 या अनेक वर्षे जुन्या कारचा वापर करतात. पक्षाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसलेले असेच कार्यकर्ते हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. सांगवे एकटे नाहीत, असे हजारो, लाखो कार्यकर्ते आजही शिवसेनेकडे आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली, त्यांना मोठे केले. त्यांनी मोठे केलेले तरुणही त्यांच्या भूमिकेला जागले. शिवसेनेचे आमदार, खासदार लोकांसाठी कुठेही उपलब्ध होऊ लागले.

कार्यकर्त्यांची प्रतिमा उंचावली

अगदी चहाची टपरी, पानटपरीवर आमदार, खासदार सर्वसामान्य लोकांना भेटू लागले. सामान्य माणूस प्रस्थापित राजकारण्यांना भेटू शकत नव्हता. तसा तो आजही भेटू शकत नाही, थेट बोलू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेमुळे हे चित्र बदलून गेले. ते आजही कायम आहे. त्यामुळे पर्यायाने जनमानसात कार्यकर्त्यांची प्रतिमा उंचावली, त्यांचे वजन वाढले. शिवसेनेचा विस्तार होण्याचे हे प्रमुख कारण आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT