Ravindra Gaikwad Sarkarnama
विशेष

Ravindra Gaikwad: धर्मनिरपेक्षतेची मूल्ये खऱ्या अर्थाने जपणारा शिवसेनेचा नेता

Shivsena Leader Ravindra Gaikwad: A Profile of Secular Political Commitment: उमरग्याचे दोनदा आमदार आणि धाराशिवचे एकदा खासदार राहिलेल्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी धर्मनिरपेक्षतेची मूल्ये खऱ्या अर्थाने जपली आहेत.

अय्यूब कादरी

''कशाला भांडता बे, निवडणूक संपली की सारे विसरून जावा आणि आपापाल्या कामाला लागा. मिळून-मिसळून राहा, निवडणुकीतला राग कायम ठेवू नका. कोणत्या उमेदवाराचं काम करायचं हे ते करा, मात्र मतदान झाल्यानंतर सारे विसरून जा...! आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेली असली तरी बाहेर कुठं भेटलो की एकत्र चहा घेतो, जेवण करतो, मग तुम्ही कार्यकर्ते कशासाठी शत्रुत्व कायम ठेवता?''

निवडणुकीच्या, राजकारणाच्या निमित्तानं गावागावांत गट-तट निर्माण होतात. निवडणुकीच्या कारणावरून अनेकदा हाणामाऱ्या होतात, वितुष्ट निर्माण होते. अशा पार्श्वभूमीवर असा सल्ला देणारा, शिवसेनेत राहूनही सर्वधर्मसमभावाची खऱ्या अऱ्थाने जपणूक करणारा राजकीय नेता विरळाच म्हणावा लागेल. हे नेते म्हणजे उमरग्याचे दोनवेळा आमदार आणि एकदा धाराशिवचे खासदार राहिलेले प्रा. रवींद्र गायकवाड.

राज्यात काँग्रेसचं प्राबल्य असण्याचा तो काळ होता. मुंबईतून बाहेर पडून शिवसेना मराठवाड्यात रुजू पाहात होती. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य चेहऱ्यांचा शोध सुरू केलेला होता. काँग्रेसची पकड असल्यामुळं विरोधकांना राजकारणात फारशी संधी मिळत नव्हती. काँग्रेसच्याच आणि नेत्यांच्या मर्जीतल्याच कार्यकर्त्यांना संधी मिळत होती. सत्तेच्या पदांपासून वंचित राहिलेल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या रूपानं संधी मिळाली. प्रा. रवींद्र गायकवाड हे त्यापैकीच एक. शिवसेनेनं मोठी केलेली अशी अनेक नावं मराठवाड्यासह राज्यभरात आढळतील.

प्रा. रवींद्र गायकवाड हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील रहिवासी. त्यांचा जन्म 27 एप्रिल 1960 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. उमरग्यापासून साधारण 10 किलोमीटरवर असलेलं आष्टा जहागीर हे त्यांचं मूळ गाव. त्यांचे वडिल विश्वनाथराव गायकवाड हे उमरगा पंचायत समितीचे सभापती होते. 1972 च्या दुष्काळात सभापतिपदाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं काम केलं होतं. मातुःश्री झिंगुबाई या उमरग्याच्या नगरसेविका होत्या. त्यांचे आई आणि वडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते. हे दोघेही काँग्रेसमध्ये होते. विश्वनाथराव गायकवाड हे भारत शिक्षण संस्थेचे सचिवही होते. मराठवाड्यातील सर्वात जुन्या शिक्षण संस्थापेकी ही एक संस्था. गायकवाड यांचे कुटुंबीय वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे.

रवींद्र गायकवाड यांचं शालेय, महाविद्यालयीन शिक्षण उमरगा येथेच झालं. लातूर येथील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी एम.कॉम. केलं. त्यानंतर भारत शिक्षण संस्थेच्या उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचं काम सुरू केलं. ते अल्पावधीत विद्यार्थीप्रिय बनले ते त्यांच्या साधेपणानं आणि थेट संवाद साधण्याच्या पद्धतीनं. 'म्हातारं काम करून तुम्हाला शिकवत आहे, नीट शिका रे' असा थेट संवाद ते विद्यार्थ्यांशी साधायचे. यामुळं ते विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. ते स्वतः शिवसेनेचे असले तरी अन्य विद्यार्थी संघटनांच्या उपक्रमांनाही ते मदत करत असत.

साधारण 1986-87 मध्ये शिवसेना मराठवाड्यात आली. प्रा. गायकवाड यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काँग्रेसची असली तरी ते स्वतः मात्र शिवसेनेकडं आकृष्ट झाले. त्यावेळी तालुक्यात काँग्रेसचे नेतृत्व प्रस्थापित झालेलं होतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये अन्य लोकांना संधी मिळणं अवघड होतं. अमोघ वक्तृत्त्वशैली आणि तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता हे प्रा. गायकवाड यांचे सर्वात मोठे भांडवल. विरोधक असला तरी ते त्याच्या खांद्यावर हात ठेवून आपुलकीने बोलतात. नेत्यांना भेटण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावा लागण्याचा तो काळ होता. अशा काळात एक नेता लोकांना कुठेही भेटतो, त्यांच्या खांद्यावर हात टाकून बोलतो... त्या काळात हे थोडं अविश्वसनीय वाटणारं चित्र होतं. शिवसेना अशाच नेत्यांच्या शोधात होती.

महाविद्यालयातील काही विद्यार्थी शिवसेनेच्या संपर्कात आलेले होते. प्रा. रवींद्र गायकवाड यांची वक्तृत्वशैली अमोघ अशी आहे. त्यामुळं विद्यार्थी त्यांना शिवजयंतीच्या व्याख्यानांसाठी नेऊ लागले. त्याच काळात बाळासाहेब ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरात सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रा. गायकवाड शिवसेनेकडे ओढले गेले. नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. शिवसेना -भाजप युतीमध्ये उमरगा हा भाजपच्या वाट्याला आलेला होता. भाजपकडे त्यावेळी बलाढ्य उमेदवार नव्हता. तरीही भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला नव्हता. त्यामुळं 1990 मध्ये प्रा. गायकवाड यांनी उमरगा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली.

या निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. काँग्रेसचे दिवंगत माजी राज्यमंत्री खालिकमियाँ काझी हे विजयी झाले. बलभीमराव पाटील यांना 25 हजार, प्रा. गायकवाड यांना 24 हजार मते मिळाली होती. काझी यांना 35 हजार मते मिळाली होती. मराठा समाजाच्या दोन उमेदवारांमध्ये मतांची विभागणी झाली होती. त्यानंतर प्रा. गायकवाड यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडं घेण्यासाठी जोर लावला. त्यासाठी 1995 च्या निवडणुकीच्या आधी बाळासाहेब ठाकरे यांची उमरगा येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर भाजपशी चर्चा करून हा मतदारसंघ शिवसेनेकडं घेण्यात आला.

1995 च्या निवडणुकीत प्रा. गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले बसवराज पाटील यांचा पराभव केला. आमदार हा लोकांसाठी असतो. ते लोकांना सहजपणे उपलब्ध होतो, अगदी चहाच्या टपरीवरही आमदार लोकांना भेटू शकतो, हे या मतदारसंघांतील लोकांना पहिल्यांदाच प्रा. गायकवाड यांच्यामुळं कळालं. कोणताही भेद न ठेवता प्रा. गायकवाड लोकांमध्ये थेट मिसळत, त्यांच्या सुख-दुखाःत सहभागी होतात. पहिल्यांदा आमदार असताना त्यांची लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील किल्लारी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक म्हणून निवड झाली. त्यानंतर दीड वर्षानं झालेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत प्रा. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल विजयी झालं. शिवसेनेच्या ताब्यात आलेला बहुधा हा पहिलाच सहकारी साखर कारखाना असावा.

या कारखान्याचे प्रशासकीय अध्यक्ष असताना प्रा. गायकवाड यांनी उसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव दिला होता. कारखान्याला उत्कृष्ट कार्यक्षमतेचा देशपातळीवरील पुरस्कार मिळाला होता. तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं होतं. प्रा. गायकवाड अध्यक्ष असतानाच्या काळात किल्लारी साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचाही पुरस्कार मिळाला होता. एखाद्या शिवसेनेच्या नेत्याला अशा प्रकारचे पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. प्रा. गायकवाड हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळ होते. हा पुरस्कार मिळाल्यानंतर ते बाळासाहेबांचे लाडके बनले.

प्रा. गायकवाड हे आमदार झाले त्यावेळी तालुक्यातील गावांना जोडणारे बहुतांश रस्ते कच्चे होते. 1993 च्या भूकंपानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली होती. त्यांनी बहुतांश गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचं डांबरीकरण करून घेतलं. सिंचनाच्या कामांकडे लक्ष देत मतदारसंघात जवळपास 28 तलावांची उभारणी करवून घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या 'गुडबुक्स'मध्ये असल्यामुळे प्रा. गायकवाड यांना ही कामे करून घेण्यात अडचण आली नाही.

प्रा. गायकवाड यांचा प्रत्येक गावात संपर्क होता, आजही आहे. सर्व थरांतील नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क. त्यावेळी निराधारांचे मानधन मनीऑर्डरने यायचे. बहुतांश निराधारांचं मानधन परत जात असे. संबंधित व्यक्ती उपलब्ध नसल्याचं कारण यासाठी दिलं जात असे. गावात गेल्यानंतर या योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला, पुरुषांनी प्रा. गायकवाड यांना ही अडचण सांगितली. निराधारांचे वेतन बँकेत जमा व्हावे, यासाठी त्यांनी सभागृहात आणि बाहेरही पाठपुरावा केला. त्याला यश आलं. त्यानंतर मग निराधारांचं मानधन बँकेत जमा होऊ लागलं. पुढे 1999 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

2004 च्या विधानसभा निवडणुकी नाट्यमय घडामोडी घडल्या. तोपर्यंत शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचा दबदबा निर्माण झाला होता. प्रा. गायकवाड यांना कोणाच्याही पुढे पुढे करायची सवय नाही. ते बाळासाहेबांचे निकटवर्तीय होते. त्यामुळं 2004 च्या निवडणुकीत मातोश्रीवरून शब्द मिळूनही एेनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवारी नाकारली तरी हरकत नाही, मला एकदा बाळासाहेबांना भेटू द्या, असा त्यांचा आग्रह होता. मात्र त्यांची बाळासाहेबांशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळं ते मुंबईतून गावी परत निघाले. मुंबाईपासून दूर आल्यानंतर त्यांनी मातोश्रीवरून फोन आला आणि बाळासाहेबांनी भेटायला बोलावलं आहे, असा निरोप देण्यात आला.

दरम्यानच्या काळात प्रा. गायकवाड यांचे तिकीट कापल्याची माहिती बाळासाहेबांना मिळाली होती. बाबा ऊर्फ केशव पाटील यांना एबी फॉर्मही देण्यात आला होता. ते मतदारसंघात परतलेही होती. अशा परिस्थितीत आता काहीही होणार नाही, पण बाळासाहेबांची भेट तरी होईल म्हणून ते परत निघाले. मातोश्रीवर गेल्यानंतर बाळासाहेबांनी ठणकावून सांगितले आणि आधीचा एबी फॉर्म रद्द करून प्रा. गायकवाड यांना एबी फॉर्म देण्यात आला. तोपर्यंत मध्यरात्र झाली होती. पुढचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मध्यरात्री निघून कारने उमरग्याला पोहोचणे होणार की नाही, अशी परिस्थिती त्यावेळी होती.

इकडे, प्रा. गायकवाड यांचे तिकीट कापल्याची माहिती मिळाल्यामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. उमेदवारी मिळाल्याचे कळल्यानंतर वातावरण बदलले. अर्ज दाखल करण्यासाठी न बोलावताही मतदारसंघातू मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक जमा झाले. आधी ज्यांना शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाला होता, त्या बाबा पाटील यांनीही उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले बसवराज पाटील, अपक्ष बाबा पाटील आणि प्रा. गायकवड अशी तिरंगी लढत झाली. दोन मराठा उमेदवार असला की काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार, या गृहितकाला त्यावेळी तडा गेला. प्रा. गायकवाड दुसऱ्यांदा आमदार झाले.

2009 मध्ये उमरगा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळं प्रा. गायकवाड यांना शिवसेनेनं धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना प्रा. गायकवाड यांची चांगली लढत दिली. डॉ. पाटील हे विजयी झाले. पुढच्या म्हणजे 2014 च्या निवडणकीत प्रा. गायकवाड यांनी डॉ. पाटील यांचा पराभव केला. खासदार असतानाच्या काळात त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात मारहाण केल्याचं प्रकरण गाजलं होतं. त्या कर्मचाऱ्यानं त्यांना शिवीगाळ केली होती. शिवसेनेत असताना त्यांनी विविध कारणांवरून दोनदा पक्षातून काढून टाकण्यात आलं आणि परत घेण्यात आलं. या काळात त्यांना अन्य पक्षांतून ऑफर होती, मात्र त्यांनी नाकारली. राजकारण करायचं तर शिवसेनेतच, अन्यथा नाही, अशी त्यांची भूमिका आजही आहे.

खासदारकीचा कार्यकाळ संपत असतानाच्या टप्प्यात प्रा. गायकवाड हे पक्षावर नाराज झाले. शिवसेनेने डॉ. तानाजी सावंत यांना धाराशिव जिल्ह्यात सक्रिय केलं होतं, हे त्यामागचे कारण. नंतर त्यांच्यावर नॉट रीचेबल असा शिक्का बसला. 2019 च्या निवडणुकीत पक्षानं त्यांना उमेदवारी नाकारली. शिवसेनेत फूट पडली, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला होता. मात्र ठाकरे यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळं काही महिन्यांनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.

धर्मनिरपेक्ष मूल्यांची जपणूक करणारा नेता कसा असतो, हे प्रा. गायकवाड यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहिली की लक्षात येईल. त्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा गवगवा केला नाही. हिंदुत्वाच्या बाबतही त्यांचे धोरण असेच आहे. नगराध्यक्ष, बाजार समितीचे सभापती या पदांवर त्यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांना संधी दिली. शिवसेनेत असूनही त्यांनी कधीही प्रक्षोभक विधानं केली नाहीत. काम करताना कार्यकर्ता आपला आहे की विरोधक आहे, हे त्यांनी कधीही पाहिलं नाही. काम होणारं नसेल तर ते तसं स्पष्टपणे सांगून टाकतात.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा काळ होता. शिवसेनेला मते दिली तर कारखान्याला आमचा ऊस जाणार नाही, असे काही लोकांनी त्यांना सांगितलं होतं. तुमचा ऊस महत्वाचा आहे, तो घालवण्याला तुम्ही प्राधान्य द्या, असं त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं. कामधंदा सोडून राजकारणात पडू नका, आधी तुमच्या व्यवसायाला प्राधान्य द्या, तिकडं स्थिर व्हा, असं कार्यकर्त्यांना, निकटवर्तीयांना स्पष्ट सांगण्याचं धाडसही प्रा. गायकवाड यांनी अनेकदा दाखवलं आहे.

राजकीय नेत्यांना महत्वाकांक्षा असतेच, मात्र प्रा. गायकवाड यांनी कधीही त्याचं जाहीर प्रदर्शन केलं नाही. नेत्यांच्या मागेपुढेही केलं नाही. त्यामुळं ते राजकारणात काही प्रमाणात मागे पडले. मी शेतकऱ्याचा मुलगा, दोनदा आमदार, एकदा खासदार झालो, आणखी काय हवं, असं ते म्हणतात. राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये रवी सर या नावानं परिचित असणारे प्रा. गायकवाड हे सध्या राजकारणापासून थोडेसे अलिप्त आहेत. खऱ्या अर्थाने सर्धर्मसमभावाची जपणूक करणारी कार्यकर्त्यांची, विद्यार्थ्यांची पिढी प्रा. गायकवाड यांनी घडवली आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT