Uddhav Thackeray Sarkarnama
विशेष

Uddhav Thackeray News : महाराष्ट्राचा ‘ठाकरे’ ब्रँड

Political News : सर्व जातीधर्मांना बरोबर घेतले तर काय होते हे गणित त्यांना कळले असावे. काही असो... ठाकरे नावाचा ब्रँड महाराष्ट्राचा आहे तो काही केल्या संपणार नाही, हे उद्धव यांनी देशाला दाखवून दिले आहे.

सरकारनामा ब्युरो

प्रकाश पाटील

Mumbai News : शिवसेना संपवायची हे स्वप्न जे कोणी पाहिले त्यांचे स्वप्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भंग केले. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. ती संपणार नाही, हे त्यांनी आपल्या विरोधकांना दाखवून दिले आहे. उद्धव यांचे राजकारण बदलते आहे. हिंदुत्वाची धार कमी करून सर्वसमावेशक राजकारण त्यांनी सुरू केले. सर्व जातीधर्मांना बरोबर घेतले तर काय होते हे गणित त्यांना कळले असावे. काही असो... ठाकरे नावाचा ब्रँड महाराष्ट्राचा आहे तो काही केल्या संपणार नाही, हे उद्धव यांनी देशाला दाखवून दिले आहे.

20 जून 2022 ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वांत मोठे बंड. हे बंड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी धक्का होता. शिवसेनेचे काय होणार? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष टिकणार की संपणार याची चर्चा देशभर सुरू होती. तसे तर शिवसेनेला (Shivsena) बंड नवे नव्हते. यापूर्वी जेव्हा जेव्हा पक्ष फुटला त्या त्यावेळी बाळासाहेब होते. त्यांनी सर्व बंड मोडून काढली होती. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीत खूप फरक आहे. एखाद्यावर तुटून कसे पडायचे हे बाळासाहेबांना माहीत होते. उद्धव मात्र काहीसे संयमी नेते आहेत. (Uddhav Thackeray News)

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे मैदानात उतरले. मोजकेच नेते हाताशी होते. त्यामध्ये खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, अनिल देसाई, सुभाष देसाई, सुषमा अंधारे अशी नावे घेता येतील. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर छोट्यामोठ्या पक्षांची राज्यात सत्ता होती.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कोरोनासारख्या महासाथीमध्ये ते राज्याचे प्रमुख होते. त्यातच त्यांचे आजारपण. तरीही मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यातील जनतेला आधार देत गाडा हाकला. ज्येष्ठ नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील अजित पवार आदी नेत्यांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता. पुढे म्हणजे जून महिन्यात शिवसेनेला एकावर एक धक्के बसू लागले. यामागे कोण आहे, हे न समजण्याइतके उद्धव दूधखुळे नक्कीच नव्हते.

ठाणे, सुरतमार्गे गुवाहाटी आणि पुढे गोव्यामार्गे मुंबईत बंडखोर नेते आले. दहा दिवस बंड गाजत राहिले. शेवटी 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर खरा संघर्ष सुरू झाला. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला नाव दिले गेले मिंधे सरकार. एकीकडे उद्धव हे मोदी-शहा आणि भाजपला लक्ष्य करीत राहिले.

हे बंड भाजपने घडवून आणले हे महाराष्ट्राला ते सतत सांगत राहिले. तर दुसरीकडे संजय राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासारखे आक्रमक नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सळो की पळो करून सोडत होते. तसेच भाजपवालेही ठाकरेंना सोडत नव्हते. फडणवीस हे काही कच्च्या गुरूचे शिष्य नव्हते. राऊतांनी तुरुंगाची हवा खाली. दुसऱ्या काही नेत्यांवर ईडीची टांगती तलवार होती, त्यापैकी काही जणांनी एकतर शिवसेना (शिंदे) किंवा भाजपमध्ये प्रवेश करून कारवाई रोखण्यात यश मिळविले.

पुरून उरले

राज्याचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे. याकडे राज्यातील जनतेचे बारीक लक्ष होते. पुढे कांदा, दुधाचा प्रश्‍न गाजू लागला. निवडणुकीच्या तोंडावर हा उचलून धरत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत जनमत स्वत:कडे फिरविण्याचा प्रयत्न केला. अजित पवारानींही एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. या बंडानंतर मात्र जनतेला वाटू लागले की भाजप सत्तेचा भुकेला आहे. ज्या अजित पवार यांच्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली केली होती. त्याच अजित पवारांना पक्षात घेतल्याने जनतेमध्ये नाराजी होती. लोकसभा निवडणुकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत असे नेते महायुतीच्या नेत्यांवर तुटून पडत होते. लोकसभेला मोदी-शहांचा दौडणारा रथ महाराष्ट्राने रोखला.

पक्षाला संजीवनी

लोकसभेच्या निकालावर दृष्टीक्षेप टाकला तर भाजपला दहाचा आकडाही पार करता आला नाही. दुसरीकडे मराठा आरक्षणाचाही फटका विशेषत: भाजपला बसला असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रात जो भाजप शिवसेनेचे बोट धरून घराघरांत पोचला त्या भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा मोठी नाही हेही लोकसभेला दिसून आले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाण्याची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळाली नाही. उद्धव ठाकरे व त्यांचा पक्ष दोन वर्षापूर्वी खिळखिळा झाला होता. त्याच पक्षाला संजीवनी मिळाली. राज्यात वातावरण निर्मिती करण्यात खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत.

विधानसभे’ला घाम फोडणार

लोकसभेला यश मिळाल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ऑक्सिजन मिळाला आहे. तो आगामी विधानसभा निवडणुकीत किती टिकतो हे पाहावे लागेल. बाळासाहेबांइतके उद्धव आक्रमक नाहीत पण, तेही त्यापद्धतीने विरोधकांची खिल्ली उडवितात. तसेच जनतेची सहानुभूती कशी मिळवायची हेही त्यांना चांगले माहीत आहे. काहीही असले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनतेला आज सहानुभूती आहे. आघाडी अशीच भक्कम राहिली तर विधानसभेलाही हे प्रमुख नेते महायुतीला घाम फोडल्याशिवाय राहणार नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT