sanjay pawar | uddhav thackeray | ravikiran ingavale sarkarnama
विशेष

Ravikiran Ingavale Vs Sanjay Pawar : शहरप्रमुख इंगवलेंना जमलं ते उपनेते संजय पवारांना का जमत नाही?

Rahul Gadkar

एरवी चार चौघांना घेऊन सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकांची मंगळवाराची ( 24 सप्टेंबर ) गर्दी लक्षवेधी ठरली आहे. कारण, 'कोल्हापूर उत्तर' विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे राहण्यासाठी आणि शहप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या उमेदवारीसाठी शहरात रॅली निघाली होती.

उमेदवारीसाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीकडे साकडे घालण्यासाठी हजारो शिवसैनिक एकवटले होते. त्यामुळे नेहमीच चारचौघांना सोबत घेऊन आंदोलनाचा रेटा ठेवून प्रशासनावर जरब ठेवणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना मंगळवारचा तोरा पाहून अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ऐन विधानसभेच्या तोंडवर शिवसेना ठाकरे गटात धुसफूस तर सुरू नाही ना? असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, इंगवले यांनी केलेली गर्दी ही इतर ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये डोळ्यात अंजन घालणारी आहे. त्यामुळे शिवसेना ( Shivsena ) ठाकरे गटाच्या उपनेत्यांना ( संजय पवार ) जे जमलं नाही, हे इंगवले यांनी करून दाखवलं, अशी भावना काल शिवसैनिकांमध्ये उमटली होती.

कोल्हापुरातील शिवसेना म्हणजे इतर पक्षातील नेत्यांनी चालवलेली सेना, अशी टीका वारंवार होत आली आहे. तडजोडी शिवाय शिवसेनेला काहीच मिळालं नाही. मग ती महापालिका निवडणूक असो किंवा 'कोल्हापूर उत्तर'ची पोटनिवडणूक असो. नेहमीच शिवसेना हा पक्ष दुसऱ्या पक्षातील नेते चालवतात, असाच आरोप होत आला आहे. राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट झाले. कोल्हापुरात देखील शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे गट अस्तित्त्वात आले.

तत्पूर्वी शिवसेनेमध्ये दोन गट अस्तित्त्वात होते. पहिला गट म्हणजे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा तर दुसरा गट म्हणजे शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांचा. या दोघांमधील असलेल्या मतभेदामुळे केवळ शिवसेनेच्या वाटेला तडजोडीच आल्या. त्यामुळे केवळ शहरात शिवसेना वाढली. मात्र, जिल्ह्यात अस्तित्त्व असतानाही वाढली नाही. सत्ता आणि दोन गटामुळे शिंदेंची शिवसेना तेजीत आहे. पण, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट अस्तित्वात आहे कुठे? अशी विचारण्याची वेळ आली आहे.

वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरची शिवसेना शिंदे गटाने ही जागा मिळवून अस्तित्त्व दाखवण्याचा प्रयत्न केला. या लढतीत पराजय झाला असला तरी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. मात्र, महाविकास आघाडीतील तडजोडी अंती ही जागा काँग्रेसला गेल्यानंतर केवळ आमदार सतेज पाटील, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्त्वामुळे काँग्रेसचा विजय सोपा झाला.

लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली. वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाने सोडली, असली तरी विधानसभा निवडणुकीत त्याचा मोबदला घेणे आवश्यक होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात सध्याची शिवसेना ठाकरे गटाची भूमिका मवाळ आहे. 'पक्षप्रमुखांनी आदेश दिला तरच, अमुक करू तमुक करू' असे सांगून निष्ठावंत शिवसैनिकांची बोळवण पदाधिकाऱ्यांकडून केली जाते. मात्र, सातत्याने होणारी तडजोडी ही आता निष्ठावंतांच्या जिव्हारी लागत असल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीत 'कोल्हापूर उत्तर'ची जागा शिवसेनेला मिळावी, अशी निष्ठावंत शिवसैनिकांची इच्छा आहे. नुकताच शिवसैनिकांचा मेळावा झाला. पक्षशिस्तीचा भाग असला तरी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपला पक्ष वाढवा यासाठी नेहमीच कटिबद्ध असले पाहिजे. पक्ष वाढवणाऱ्याला बाजूला केले जाते, ही कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाची जन माणसात भावना निर्माण होत चालली आहे. पण, वास्तविकरित्या ते न होता स्वतःचाच फायदा कसा होईल, याकडे सध्याच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे.

कोल्हापुरातील 'उत्तर'ची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, अशी सध्याच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी ठाम निर्णय घेण्याची भूमिका कोणाची नाही. झालेल्या मेळाव्यात पक्षप्रमुखांच्या खांद्यावरच बंदूक ठेवली जाते. जर स्वतःहून पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली, तर त्याला पक्ष शिस्तीचा नियम शिकवला जातो. पदाधिकाऱ्यांच्या अशा वर्तवणुकीमुळे शिवसेना ठाकरे गट कोल्हापूर जिल्ह्यात वाढणार कसा? असा सवाल निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित करत आहे.

शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी याच 'कोल्हापूर उत्तर' मतदारसंघावर दावा करत तिकीट मागितले आहे. त्यासाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर होते. 'कोल्हापूर उत्तर' विधानसभा मतदारसंघासाठी उपनेते संजय पवार यांना दबाव निर्माण करण्यासाठी गर्दी जमवता आली नाही, तीच शहप्रमुखांनी केलं? जर पक्ष वाढीसाठी आणि उमेदवारीसाठी इंगवले हे महाविकास आघाडीत दबाव निर्माण करत असतील, तर त्यांचं चुकलं काय? असा सवाल निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित करत आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT