Eknath Shinde  Sarkarnama
विशेष

Eknath Shinde Birthday : मुख्यमंत्री शिंदे अन् स्टाइल स्टेटमेंट

Style statement of Eknath Shinde : आमदार आणि मंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टाइलमध्ये खूप फरक पडला आहे.

Avinash Chandane

Eknath Shinde Birthday : गुरुवार, 30 जून 2022. याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडला. केवळ 40 आमदार सोबत असलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि 105 आमदार असलेले आणि यापूर्वी मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांना आयत्या वेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली.

हे कमी म्हणून की काय, तर 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि तेदेखील शिंदेंच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्री बनले. त्यांच्यासोबत 8 आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ दिली.

हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच, त्यावेळी चर्चा अनेक होत होत्या की, एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) आता काय होणार? अजित पवार सत्तेत आले की एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार, पण चर्चाच त्या! प्रत्यक्षात काहीही घडलं नाही. एकनाथ शिंदेंचं स्थान अबाधित राहिलं. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाला तेव्हाही धोका नव्हता आणि आताही नाही. या सर्वांत एक महत्त्वाचा बदल घडला तो एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिमत्त्वात, त्यांच्या वक्तृत्वशैलीत आणि एकूणच त्यांच्या स्टाइलमध्ये.

ज्यांनी शिवसेना जवळून पाहिली, शिवसेनेचे (Shivsena) मेळावे पाहिले, सभा, मोर्चे पाहिले असतील त्यांनी एकनाथ शिंदेंना बोलताना फारसं पाहिलं नसेल. ते धडाडीचे कार्यकर्ते होते, पडद्यामागे कामे करण्यात त्यांची हातोटी होती. त्यांचा वावरही नेत्यांच्या मागे असायचा. बोलणं हा त्यांचा कधीही स्वभाव नव्हता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, या पावणेदोन वर्षात एकनाथ शिंदेंचं व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थानं बहरलं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणून 2022 च्या दसरा मेळाव्याचं देता येईल. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटली आणि 5 ऑक्टोबर 2022२ रोजी एकनाथ शिंदेंनी बीकेसीच्या मैदानात शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा (Dasara Melava) घेतला. या मेळाव्यात त्यांनी तब्बल दीड तास भाषण केलं होतं. एकनाथ शिंदे ते भाषण मध्ये मध्ये वाचत होते. ते भाषण खूप लांबले होते आणि अनेकदा कंटाळवाणे झाले होते. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनीही ते नंतर मान्य केलं होतं. मात्र, त्यातून त्यांनी स्वत:ला सावरलं. आता त्यांची भाषणं ऐकली तर जोरदार टीका करणारी असली, आक्रमक असली तरी मुद्देसूद असतात. किती वेळ बोलायचं, हे त्यांना चांगलंच कळलं आहे. ते लिखित भाषणाकडं फारसं पाहत नाहीत.

भाषणाची स्टाइल

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) कॉपी केलेलं स्पष्टपणे जाणवतं. पंतप्रधान मोदींप्रमाणे भाषण करताना मध्येच भावूक होणे, मध्येच कार्यकर्त्यांना आवाहन करणं आता एकनाथ शिंदेंना उत्तम जमू लागलं आहे. शिवाय मोदींप्रमाणे ते आवाजातही उत्तम बदल करतात. त्यामुळे कार्यकर्ते म्हणा किंवा कुठल्याही सभेत आता श्रोत्यांना खिळवून ठेवणं त्यांना चांगल्या प्रकारे जमू लागलं आहे.

चालण्याची ऐट

आणखी एक झालेला बदल म्हणजे बरोबरीनं चालणं. एकनाथ शिंदे यापूर्वी नेत्यांच्या मागून चालायचे आणि त्यांची चाल ही सामान्य वकूब असलेल्या नेत्यासारखी असायची. खूपदा ते खाली मान घालून चालायचे. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या चालीत प्रचंड आत्मविश्वास आला आहे. त्यांच्या चालण्यात आता एक ऐट आली आहे. ते अगदी पंतप्रधान मोदींना तेवढ्याच आत्मविश्वासानं भेटतात आणि इतर नेत्यांच्या सोबत चालतात.

दाढीवाले पहिले मुख्यमंत्री

दाढीचा विषय निघाला म्हणून जाणून घ्या! राज्याच्या यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांवर नजर टाकली तर म्हणजे आधीचे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख, नारायण राणे, मनोहर जोशी तसेच सुशीलकुमार शिंदे, शरद पवार किंवा अगदी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण... महाराष्ट्राचे केणतेही मुख्यमंत्री दाढी राखत नव्हते. याला एकनाथ शिंदे अपवाद ठरले आहेत. ते राज्याचे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री ठरले आहेत.

पांढरे कपडे

मंत्री आणि त्यातही मुख्यमंत्री म्हटले की कुर्ता किंवा झब्बा, त्यावर नेहरू जॅकेट (हल्ली मोदी जॅकेट) पायजमा अशी वेशभूषा घातलेला चेहरा समोर येतो. देवेंद्र फडणवीसही आजही मोदी जॅकेट घालतात. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या व्याख्येला एकनाथ शिंदे अपवाद ठरले आहेत. पांढरा शुभ्र फुल शर्ट, पांढरी शुभ्र पँट हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आता युनिफॉर्म (White Uniform) झाला म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. दावोसला जाताना मुख्यमंत्री सुटाबुटात दिसले तेवढेच. इतर सर्व वेळी त्यांचा इन न केलेला पांढरा शर्ट आणि पांढरी पँट असते.

Edited By :

बोलण्याचं भान

मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे यांना माध्यमांसमोर त्यातही चॅनेलच्या बूमसमोर काय बोलावं आणि काय बोलू नये, याचं उत्तम भान आलेलं आहे. कित्येक वर्षे नेते राहूनही अनेकांना जे जमलं नाही ते त्यांनी अल्पावधीत सहज साध्य करून दाखवलं आहे. अनेकदा नेते बूम समोर दिसला की त्यांचं तोंड सुटतं. शिंदेंनी हे कटाक्षानं टाळलं आहे. याबद्दल एकनाथ शिंदेंना पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील.

शिंदे, दाढी अन् स्टाइल स्टेटमेंट

एकनाथ शिंदे आणि दाढी हे समीकरण आहे. ते कायम दाढीवरून हात फिरवताना दिसतात. दाढीवरून हात फिरवून बोलणं ही शिंदेंची स्टाइल स्टेटमेंट झाली आहे. एखाद्याचं मनापासून कौतुक किंवा एखाद्यावर जोरदार टीका करतानाही त्यांचा दाढीवरून सहज हात फिरतो. त्यावेळी चेहऱ्यावर उमटणारे मिश्किल भाव खूप काही सांगून जातात.

SCROLL FOR NEXT