Supriya Sule Sarkarnama
विशेष

Supriya Sule Indapur Tour : शोभते ना पवारसाहेबांची लेक...?

Vijaykumar Dudhale

Pune News : भल्या सकाळपासून सुरू झालेला दौरा...दिवसभर गाठीभेटींचा सिलसिला...मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी… भेटायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी… त्यातही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावत बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या सायंकाळी उशिराच इंदापूर शहरात पोचल्या… धो धो कोसळणाऱ्या पावसातच त्यांनी इंदापूर शहरातील तब्बल २२ मंडळांच्या गणेशाचे दर्शन घेतले. त्यांचे ते चित्र पाहून आपसूकच शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली आणि ‘शोभते ना पवारसाहेबांची लेक...’ अशा प्रतिक्रियाही इंदापुरातील नागरिकांच्या ऐकायला मिळाल्या. (Supriya Sule's visit to Ganesh Mandal in Indapur in rain)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी (ता. २५ सप्टेंबर) दौंड, इंदापूरच्या दौऱ्यावर होत्या. दौंड शहरातील गणेश मंडळांना भेटी देत मंगलमूर्तीचा आशीर्वाद घेत सुळे या भिगवण, मदनवाडीमार्गे इंदापूर तालुक्यात आल्या. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

माने यांच्याकडील कार्यक्रम संपवून सुप्रिया सुळे यांनी आपला मोर्चा इंदापूर शहरातील गणेश मंडळांकडे वळविला. एक-दोन मंडळांच्या गणेशाचे दर्शन होताच पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाला तरी त्यांनी आपला कार्यक्रम थांबवला नव्हता. पावसातच गणेशाचे दर्शन घेण्याचा आणि मंडळांना भेटी देण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला.

इंदापूर शहरात धो धो पाऊस कोसळत होता. रस्त्यावरून पाणी वाहत होते. तरीही सुप्रिया सुळे यांनी गणेश मंडळांना भेटून आरती केली. काही ठिकाणी छत्री घेत, तर काही ठिकाणी पावसात भिजतच त्यांनी इंदापूर शहरातील तब्बल २२ पेक्षा अधिक गणेश मंडळांना भेटी देऊन आरती केली. या दौऱ्यातून त्यांनी मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने मात्र जिंकली. त्यांचा दौरा सोमवारी रात्री दहापर्यंत सुरू होता.

सुप्रिया सुळे यांनी पावसात भिजत इंदापूर शहरातील गणेश मंडळांना भेटी देण्याचे चित्र पाहून अनेकांना शरद पवार यांच्या सातारा येथील सभेची आठवण झाली. त्यातून अनेक कार्यकर्त्यांकडून ‘शोभते ना पवारसाहेबांची लेक.... सुप्रियाताई’ अशा प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा इंदापुरातील गणेश दर्शनाचा दौरा विशेष असा ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT