Supreme Court Hearing Sarkarnama
विशेष

Maharashtra Politics : मीडियाशी कमी बोला, काम लवकर करा; सरन्यायाधीशांची नार्वेकरांना तंबी

Shivsena MLA Disqualification Case : हे बरोबर नाही. या प्रकरणाला अगोदरच खूप उशीर झालेला आहे.

Vijaykumar Dudhale

New Delhi : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी कमी बोलावे आणि काम लवकर करावे, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अध्यक्षांना सुनावणीदरम्यान दिला. (Talk less to the media, get the job done faster: Chief Justice's advice to rahul Narwekar)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (ता. १७ ऑक्टोबर) सुनावणी झाली. त्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. अध्यक्ष नार्वेकर यांची बाजू मांडताना देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी आम्ही वेळापत्रक दिले आहे, असे सांगितले.

तुषार मेहता यांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हे बरोबर नाही. या प्रकरणाला अगोदरच खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे तुम्ही ३० ऑक्टोबरपर्यंत वास्तववादी (रियालिस्टिक) सुधारित वेळापत्रक सादर करावं. ते तुम्हाला मान्य नसेल तर आम्ही तुम्हाला वेळापत्रक देऊ, त्यानुसार तुम्हाला आमदार अपात्रताप्रकरणी कार्यवाही करावी लागेल, असे सरन्यायाधीशांनी अध्यक्षांच्या वकिलांना सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुनावणीदरम्यान, कोर्टाने अध्यक्षांना शिवसेनेच्या आमदारांचे अपात्रता प्रकरण कधी दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची याचिका कधी दाखल झाली, अशी विचारणा केली आहे. निर्णय घेण्याचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत. मात्र, आमदार अपात्रता प्रकरणाचे वेळापत्रक तुम्ही वेळेत केलं नाही, तर आम्हाला ठरवावं लागेल, असेही कोर्टानेही म्हटले आहे.

मागच्या वेळी तोंडी झापले, या वेळी लेखी आदेश काढले

मागील सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. विधानसभेचे अध्यक्ष न्यायालयाच्या निकालाची अशा प्रकारे अवहेलना करू शकत नाहीत. अध्यक्षांना कोणीतरी नीट समजावून सांगितलं पाहिजे. ते विवेकाने वागतील, असे आम्हाला मागील सुनावणीच्या वेळी वाटलं होतं. मात्र, ते हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत, असं दिसून येत नाही. विधानसभेचे अध्यक्ष जर नीट वागत नसतील, तर मात्र आम्हाला त्यांना जबाबदार धरावं लागेल. देशातील सर्व घटनात्मक व्यवस्थांचा आम्ही नितांत आदर करतो, पण कोणी जर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणार असतील, तर आम्हाला संबंधित व्यक्तीचे कान ओढावेच लागतील, असे सरन्यायाधीशांनी मागील सुनावणीच्या वेळी तोंडी म्हटले होते. या वेळी मात्र सरन्यायाधीशांनी सर्व लेखी आदेश काढले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT