Narendra Modi-Dr. Bhagwat Karad
Narendra Modi-Dr. Bhagwat Karad Sarkarnama
विशेष

त्या वृद्धाने दिलेले पागोटे पाहून मोदींच्या डोळ्यात टचकन पाणी आले!

विलास काटे

आळंदी : ‘‘मतदारसंघात दौरा करत असताना अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांना एक वयोवृद्ध आजोबा भेटले. त्यांनी आपल्या चुरघळलेल्या पिशवीतून पागोटे काढून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना द्यायचे आहे, असे सांगितले. ते पागोटे घेऊन डॉ. कराड दिल्लीला गेले आणि ते पागोटे व त्या ज्येष्ठाची कहाणी ऐकून मोदींच्या डोळ्यांत पाणी आले. मोदी त्या आजोबांशी स्वतः फोनवरून बोलले,’’ अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आळंदीतील कार्यक्रमात सांगितली. (Tears came to eyes of Prime Minister Narendra Modi when he saw feta given by oldage man)

पुणे महापालिकेने भामा-आसखेड योजनेतून आळंदीकरांना पाणी देण्यास सहमती दर्शविल्याने आळंदी शहर भाजपकडून वचनपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते पाणी योजनेचे लोकार्पण आणि नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांच्यासह नगरसेवकांचा जाहीर सत्कार महाद्वारात स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून ठेवण्यात आला होता. त्यावेळी पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशात अनेकजण भक्त आहेत. लोकांच्या मनामध्ये विकासाची जाणीव झाली पाहिजे, असे काम भाजपकडून झाले पाहिजे, ही भावना ठेवली म्हणूनच लोकांच्या मनामनांत नरेंद्र मोदी आहेत. केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड नुकतेच पुण्यात भेटले. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्यांनी सांगितले की, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावले की सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघात फिरून मला रिपोर्ट केला पाहिजे. लोकांपर्यंत माझ्या योजना पोचतात का, हे कळले पाहिजे, हा त्यामागचा पंतप्रधानांचा उद्देश होता. मतदारसंघात पोचल्यावर रस्त्याच्या कडेला एक वयोवृद्ध आजोबा भेटले. त्या ज्येष्ठाने एक चुरघळलेली पिशवी काढली आणि त्यातले पागोटे काढून ते मोदींना द्यायचे, असे सांगितले. कारण, मोदी वर्षाला माझ्या खात्यावर (तीन वेळा प्रत्येकी दोन हजार) सहा हजार रूपये टाकतात, म्हणून माझे घर चालते. माझा मुलगा, सून मला सांभाळत नाहीत. मोदी सांभाळतात; म्हणून मला त्यांना पागोटे द्यायचे आहे.

‘‘त्या आजोबांनी दिलेले पागोटे घेऊन डॉ. कराड दिल्लीला गेले. ते पागोटे व त्या ज्येष्ठाची कहाणी सांगितल्यानंतर मोदींच्या डोळ्यात पाणी आले. मोदी तातडीने मला म्हणाले, ‘पहिले तुम फोन लगाकर उस बुढे आदमीसे मेरी बात करादो.’ मला प्रश्न पडला, ‘आता त्या ज्येष्ठाला शोधायचे कुठे. दोन दिवसांनी ते वयोवद्ध आजोबा सापडले. पंतप्रधान मोदी त्या वृद्धाशी स्वतः बोलले,’’ असे कराडांनी सांगितल्याचे पाटील यांनी नमूद करून ते म्हणाले की, आपल्या पिशवीतून एक आजोबा पागोटे काढून देतात, ही मोदींवरच जनतेची श्रद्धा आहे. लोकांच्या मनात मोदीच आहेत, असा दावाही त्यांनी केला.

आळंदीतील राष्ट्रवादीच्या नेत्याने दोन दिवसांपूर्वी भाजपचे कमळ यंदाच्या निवडणुकीत इंद्रायणीत बुडवणार असल्याची भाषा वापरली होती. त्याला उत्तर देताना ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारसाहेब एकटेच कार्यकर्ते आहे. खूप फिरले, मी आदरार्थी बोलतो. राष्ट्रवादीतील बाकीचे सगळे स्टाईल मारणारे नेते आहेत. त्यातही आम्हाला शिकवतात की भाजपचे कमळ इंद्रायणीत बुडवणार. लोक ठरवतील कुणाला बुडवायचे, असे म्हणून पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना मार्मिक टोला लगावला.

...कारण मी दररोज ज्ञानेश्वरी वाचतो : चंद्रकांत पाटील

गिरणी कामगाराचा मुलगा. आई-वडील अंगठा लावायचे. मग तू इथपर्यंत पुढे कसा गेला. गिरणगावातील मुलगा व्यसनाधीन असतो. मग तुला कधी सुपारी खावीशी का नाही वाटली, असे अनेकजण मला बोलतात. त्याचे कारण मी दररोज ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरी किती वेळा वाचली, याचे मोजमापच नाही. वारकऱ्यांचे आशीर्वाद आहेत, माउलींचा आशीर्वाद आहे. त्याचेच श्रेय म्हणजे मी राजकारणात मंत्री झालो, आता पक्षाची जबाबदारी मिळाली आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT