Manikrao Kokate-Sharad Pawar-Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंनी बारामतीत जाऊन पवारांसमोरच पुन्हा 'ती' खपली काढली...!

Baramati Agricultural Exhibition : कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने हे दोन्ही पवार एकत्र आले खरे. पण अजितदादांचे खंदे समर्थक माणिकराव कोकाटे यांचे भाषण लक्षवेधी ठरले. कोकाटेंनी आपल्या भाषणाची सुरुवातच आदरणीय शरद पवारसाहेब असे म्हणून केली खरी. पण...

Vijaykumar Dudhale

Pune, 16 January : ॲग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या ‘कृषक’ कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने बारामतीत पुन्हा एकदा राजकीय मेळा रंगला होता. त्याच मेळाव्यात बोलताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या समारेच काही जुन्या जखमांची खपली काढण्याचा प्रयत्न केला. कोकाटे यांनी शेतीच्या प्रदर्शनात राजकीय भाष्य करून धमाल उडवून दिली. त्याचीच चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार हे अपवादानेच एकत्र आले आहेत. अजित पवार हे पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील घरी गेले होते. त्यानंतर आज कृषक प्रदर्शनाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित एकत्र आले होते. तत्पूर्वी या दोन्ही गटाकडून लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका त्वेषाने लढल्या होत्या, त्या हे दोन्हे नेते जेव्हा एकत्र आले, त्या त्या वेळी पवार एकत्र येणार, अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू होते.

कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने हे दोन्ही पवार एकत्र आले खरे. पण अजितदादांचे खंदे समर्थक माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांचे भाषण लक्षवेधी ठरले. कोकाटेंनी आपल्या भाषणाची सुरुवातच आदरणीय शरद पवारसाहेब असे म्हणून केली खरी. पण पुढे, ‘ज्यांच्यामुळे मला कृषिमंत्री म्हणून बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला येता आले, ते उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष’ असा अजित पवारांचा उल्लेख केला, तोही खुद्द मोठ्या पवारांच्यासमोर. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. मात्र, अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी कोणाची असा वाद रंगला होता. विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी सोपवली होती. तो निर्णय मान्य नसल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी सर्वोच्च न्यायालयात गेली, त्यावर अजून निकाल येणे बाकी आहे. पण, पवार आणि सुप्रिया सुळेंसमोरच कोकाटेंनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख केला. तो विशेष लक्षणीय ठरला आहे.

मी उशिरा उठतोय, हे अजितदादांना माहिती आहे, त्यामुळे त्यांनी मला रात्रीच सांगितले होते. उद्याचा दिवस तसदी घ्यावी लागेल. मी म्हटलं, दादा जेव्हा गरज असते, तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो. नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा, मीच दादांच्या पाठीमागे उभा होतो, असे माणिकरावांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यावर अजितदादांनी ती पहाटे नव्हती, तर आठ वाजले होते, असे स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या त्या पहाटेच्या शपथविधीवरून अजितदादांनी अनेकदा थोरल्या पवारांना आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केलेले आहे. माणिकरावांनी नेमकं त्याच गोष्टीवर खुद्द पवारांच्या उपस्थितीत भाष्य केले. त्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. आता माणिकरावांनी केलेल्या उल्लेखाची चर्चा बारामती रंगली आहे, त्यामुळे कृषी सारख्या संवदेनशील कार्यक्रमात कृषिमंत्र्यांनी खुद्द पवारांच्या उपस्थितीत केलेले ते दोन उल्लेख ठळकपणे नजरेत येणारे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT