
Pune, 16 January : मी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलते; पण तेच माझ्याशी बोलत नाही. मी नमस्कार करते, मी सगळं करते. कारण माझ्या आईने जे माझ्यावर संस्कार केले आहेत, त्यानुसार आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने आणि नात्याने मोठे असतील, त्यांचा मानसन्मान केलाच पाहिजे, हे माझ्या आईने माझ्यावर केलेले संस्कार आहेत. अजित पवार हे वयाने, पदाने आणि कर्तृत्वाने म्हणजे सर्वच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे मी त्यांचा मानसन्मान करणं, हे माझं कर्तव्य आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुप्रिया सुळे (Supriya sule) म्हणाल्या, पवार कुटुंबातील 99 टक्के लोक आम्ही आजही एकमेकांशी बोलतो. खासदार सुनेत्रा पवार, त्यांची दोन्ही मुलं जय आणि पार्थ यांचाही त्यात समावेश आहे. माझ्या मनात त्या तिघांबाबत कधीच काय नव्हतं. व्हॉट्सॲप, फोनच्या माध्यमातून मी त्यांच्याशी कायम संपर्कात असते. एरव्ही आम्ही एकमेकांशी बोलत असतो.
कृषक कृषी प्रदर्शनासाठी आम्ही सर्व बारामतीत एकत्र आलो होतो. शरद पवार (Sharad Pawar), प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांचा कोणाशीही दुरावा नाही. तो कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसेल. आमच्या पक्षात जे झालं, तेव्हापासून आमच्या तिघांकडून टिका टिपण्णी झाली असेल तर कोणीही सांगावं. आम्ही तिघं स्वभावाप्रमाणे, तसंच माझ्या आई वडिलांनी जे माझ्यावर संस्कार केले. त्यानुसार या जगात माझा कोणाशीही दुरावा नाही. मी सगळ्यांशी बोलते. मी कोणाविषयी मनात कटुता ठेवत नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या (Ajit Pawar) मनात कटुता आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुळातच कमी बोलतात आणि ते वयानेही मोठे आहेत. अजित पवारांनी बोलायला हवं होतं, असे मी कसं सांगणार. प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं. शरद पवार 84 वर्षांचे आहेत, त्यामुळे त्यांनी नमस्कार करावं, अशी संस्कृती झाली असेल तर मला माहिती नाही, असा टोमणाही सुळे यांनी लगावला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवार कुटुंब एकत्र येणार, याबाबत मला माहिती नाही. मी माझ्या मित्र, मैत्रिणीशी संवाद ठेवून आहे. मी सर्वांशी नाते जपते. माझ्या मनात जे काही आहे, ते मी बोलून मोकळे होते. कोणतेही ओझे घेऊन मी जगत नाही. माझ्या मनात कधीही कोणाविषयी कटुता नसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.