Uddhav Thackeray-Devendra Fadnavis
Uddhav Thackeray-Devendra Fadnavis sarkarnama
विशेष

ED, गडी, घरगडी आणि धुणीभांडी : ठाकरे Vs फडणवीस रंगला सामना...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्दे गाजले असले तरी सर्वाधिक वेळा नाव आले ते ईडी (ED) या तपाससंस्थेचे. त्यात हे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मेव्हणे पाटणकर यांच्याच फ्लॅटवर ईडीने टाच आणल्याने हे प्रकरण आणखी चिघळले. ठाकरे यांनी त्यांना आपल्या नेहमीच्या शाब्दिक कोट्या करत ती ईडी की घरगडी हे काहीच कळत नाहीये, असे म्हणत निशाणा साधला. त्यांनी शिवसेनेच्या गेल्या दसरा मेळाव्यात देखील अशीच एक कोटी केली होती. ईडी आणि केंद्रीय संस्थांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केल्याचा आरोप करत छापा टाकून काटा करण्याचे उद्योग सुरू असल्याचा टोला लगावला होता.

उद्धव ठाकरे यांच्या घरची मंडळीच लक्ष्य झाल्याने त्यांचा संताप उफाळून आला होता. त्यांचे अनेक वाक्ये ही तीक्ष्ण होती. त्यातील काही वाक्ये खालीलप्रमाणे

-संस्थांचा दुरुपयोग करून दहशत निर्माण करण्याचं काम सुरु आहे

-लढण्याची ताकद नाही म्हणून शिखंडीला पुढं आणून जसं महाभारतात युद्ध लढलं गेलं तसं युद्ध आता सुरु आहे.

-घराघरातलया कुटुंबियांना बदनाम करायचे, धाडी टाकायचं काम सुरु आहे.

-सत्ता पाहिजे आहे ना, पेन ड्राईव्ह गोळा करू नका, मी तुमच्यासोबत येतो, सत्तेसाठी नाही, तुम्ही जे चाळे केले, माझ्या कुटुंबियांना बदनाम करत आहात, मालमततेवर टाच.. मी टाचेला घाबरत नाही. या मला तुरुंगात टाका

-मी कधीही तुमच्या कुटुंबियाना त्रास दिला नाही.

-एवढाच जीव जळत असेल तर मला तुरुंगात टाका, मी भावनिक बोलतो, हो बोलतो

-मला तुरुंगात टाकलं तरी मी सगळ्यांच्यावतीने ती जबाबदारी घेतो.

- ज्यांनी मुंबई वाचवली त्या शिवसैनिकांना छळू नका

-हा तुरुंगात जाणार, तो तुरुंगात जाणार असं जे म्हणतात ते केंद्रीय संस्थांचे दलाल आहेत का?

तर एकूणच गडी, घरगडी हा ठाकरे यांचा आवडता शब्द आहे. ठाणे येथील गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी त्यांनी अशीच टीका केली होती. तेव्हा भाजप विरुद्ध शिवसेना असाच सामना होता. तेथे परमबीरसिंग हे पोलिस आयुक्त होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नियुक्त केले होते. त्यामुळे परमबीरसिंग हे फडणवीस यांचा प्रत्येक आदेश ऐकत होते. त्यावर बोलताना परमबीरसिंग हे फडणवीस यांच्याघरी धुणीभांडी करत आहेत. त्यांनी ती खुशाल करावीत. पण माझ्या शिवसैनिकांना त्रास दिला तर याद राखा, असा इशारा दिला होता.

फडणवीस यांनी काय उत्तर दिले?

उद्धव ठाकरे यांचे हे भाषण म्हणजे अरण्यरुदन असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ईडीला घरगडी म्हणता. आम्ही मुंबई पोलिसांना तुमचे गडी आहेत, असे कधी म्हणतो का? घरच्या गड्यांवर ईडीने कारवाई केल्याने राग आला आहे का, असा सवाल त्यांनी केला. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांकडे उत्तर नव्हते. त्यांचेकड एकच अस्त्र आहे ते म्हणजे टोमणाबाॅम्ब, अशा शब्दांत फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. आज हे अटक होणार, उद्या ते अटक होणार, असे म्हणणारे जर त्या संस्थांचे दलाल असतील तर हेच संजय राऊतांनी सांगा जरा. बाप-बेेटे तुरुंगात जाणार, हे राऊत कसे काय सांगतात, असेही उदाहरण फडणवीस यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT