Mumbai News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या प्रकारचा सर्वचस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेमंडळी अधिक आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर तातडीने सर्वपक्षीय बैठक घेत सर्व घटनाक्रमाची माहिती देण्याची मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली होती.
त्यानंतर गुरुवारी सायंकाळी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नेमक्या या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्यातच आता या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार का उपस्थित राहिले नाहीत? याचे नेमके कारण समोर आले आहे.
सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्षाचे खासदार उपस्थित होते. यावेळी सर्वच विरोधी पक्षांनी येत्या काळात केंद्र सरकार जी काही पावले या सगळ्या घटनेनंतर उचलेल, त्याला पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे. दुसरीकडे मात्र, ठाकरे गटाचे (uddhav Thackeray ) खासदार या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. ठाकरे गटावर टीका करण्याची संधी मिळताच आरोप करण्यात आले.
या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे (shivsena) खासदार का उपस्थित राहिले नाहीत? या बाबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याने स्पष्टीकरण दिले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दोन्हीही सभागृह नेते पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या दौऱ्यानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे हे दोघेजण या महत्वाच्या बैठकीला गैरहजर होते. त्याबाबतचे स्पष्टीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिले.
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता सर्वपक्षीय बैठक केंद्र सरकारने बोलावली असल्याचा निरोप त्यांनी फोनवरून दिला होता. त्यावेळीच मी बाहेरगावी लोकसभेच्या स्टॅंडिंग कमिटीसोबतच्या दौऱयावर आहे आणि सध्या ज्या ठिकाणी आहे तिथून पोहोचणे कठीण आहे, असा निरोप दिला होता. त्याचवेळी त्यांनी या बैठकीची संजय राऊत यांना कल्पना द्या, असे सांगितले. त्याचवेळी संजय राऊत सुद्धा याच पार्लमेंटरी स्टॅंडिंग कमिटीच्या कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगितले असल्याचे खासदार सावंत यांनी स्पष्ट केले.
यावेळीच मी आम्ही दुसऱ्या कोणत्या खासदाराला या बैठकीला आमच्याकडून पाठवू का? अशी विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की दोन्ही सभागृहाचा नेता किंवा तुमच्या पक्षाचे नेते या बैठकीला आले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती. मात्र, ही विनंती त्यांनी नाकारत बैठकीनंतर यावर विस्तृत चर्चा करण्याच सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते.
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी त्यांना एक पत्र आणि मेसेज केला होता. त्यामध्ये गोपनीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आम्ही या बैठकीला उपस्थित राहू शकतो का? असे विचारले होते. मात्र, त्यावर किरण रिजीजू त्यांनी या बैठकीनंतर यावर सविस्तर बोलेल असे सांगून धन्यवाद केले, असेही यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.
आम्ही दोघेही पार्लमेंटरी स्टॅंडिंग कमिटीच्या कामानिमित्त बाहेर होतो ही वस्तुस्थिती असताना केवळ राजकीय हेतूने शिवसेनवर आरोप केले जात आहेत. मात्र, प्रत्येकाला वस्तुस्थिती कळावी म्हणून ही माहिती दिली असून केंद्र सरकार जी काही पावले या सगळ्या घटनेनंतर उचलेल त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार असल्याचे जाहीर केले असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.