Vidhansabha Election Sarkarnama
विशेष

Vidhansabha Election 1985 Flashback: काँग्रेसचं बहुमताचं सरकार, पण मुख्यमंत्री केले चार!

Maharashtra Politics: 1985 च्या विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे बहुमत मिळवून काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं खरं पण 1985 ते 1990 या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रानं चार मुख्यमंत्री पाहिले. नेमकं काय घडलं या निवडणुकीत? पुरोगामी लोकशाही दल म्हणजे 'पुलोद'चं काय झालं?

Sandeep Chavan

Assembly Election News : 1985 च्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध पुरोगामी लोकशाही दल) 'पुलोद' अशी मुख्य लढत पाहायला मिळाली. शरद पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, भाजप, शेकाप या पक्षांनी मिळून तयार झालेली पुलोद आघाडी काँग्रेसला हरवण्यासाठी निवडणुकीत एकत्रित उतरली होती.

काँग्रेसनं 287 जागा तर शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसनं 126 जागा लढवल्या. 11 पक्ष आणि 1506 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आणि विधानसभा निवडणूक (Assembly Election) 1985 चा रणसंग्राम सुरू झाला.

काँग्रेसला बहुमत; 'पुलोद'चा प्रयोग फसला

काँग्रेसनं (Congress)161 जागा जिंकत बहुमताचा आकडा सहजगत्या पार केला तर शरद पवारांचा 'पुलोद'चा प्रयोग फसला. त्यांच्या समाजवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. 'पुलोद' मधील इतर पक्ष म्हणजे जनता पक्षाला 20, भाजपला 16 आणि शेकापला 13 जागांवर विजय मिळवता आला. शिवसेनेकडं स्वतःचं असं चिन्ह नव्हतं. त्यामुळं उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागली. त्यामुळं त्यांची गणना अपक्षांमध्ये केली गेली.

विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेकडून 'मशाल' चिन्हावर लढलेले छगन भुजबळ मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळं 'पुलोद'चे 104 उमेदवार निवडून आले.

एकूण 11 पक्षांपैकी 07 पक्षांना जागा जिंकता आल्या तर इतर 04 पक्षांना भोपळाही फोडता आला नाही. 1506 पैकी 20 अपक्ष उमेदवार आमदार बनले. 1980 च्या तुलनेत या निवडणुकीत 10 अपक्ष आमदार जास्त निवडून आले

इतर काही पक्षांनी जिंकलेल्या, लढवलेल्या जागा

माकप - विजयी - 02 - लढवलेल्या जागा - 14

भाकप - विजयी - विजयी - 02 - लढवलेल्या जागा - 31

काँग्रेस सत्तेत, वसंतदादा पाटील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत!

1985 च्या निवडणुकीत काँग्रेस बहुमत मिळवून सत्तेवर आली खरी पण पुढील पाच वर्षांत काँग्रेसनं चार वेगवेगळे मुख्यमंत्री दिले. सर्वांत पहिल्यांदा म्हणजे 10 मार्च 1985 रोजी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेतली खरी पण काँग्रेसनं काही महिन्यांतच त्यांना राजस्थानच्या राज्यपालपदी बसवलं आणि 3 जून 1985 रोजी शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री झाले.

दरम्यानच्या काळात, आपल्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून तिच्या गुणपत्रिकेतील गुण वाढवल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. त्यामुळं काँग्रेसवरील विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिला. पुढं त्या आरोपांत काही तथ्य नसल्याचं सिद्ध झालं पण निलंगेकरांचं मुख्यमंत्रिपद गेलं. 14 मार्च 1986 रोजी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेल्या शंकरराव चव्हाण सरकारचा कारभार व्यवस्थित सुरू असताना तिकडं शरद पवारांनी डिसेंबर 1986 मध्ये औरंगाबादेत (आताचं छत्रपती संभाजीनगर) राजीव गांधी यांच्या नेतृत्वात आपल्या समाजवादी काँग्रेस पक्षाचं भारतीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण केलं.

पुढं शंकरराव चव्हाण यांना दिल्लीत बोलावून 24 जून 1988 रोजी त्यांना केंद्रीय अर्थमंत्री बनवण्यात आलं आणि इकडं शरद पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं. 25 जून 1988 रोजी शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली.

एकूणच काय तर 1985 च्या निवडणुकीत काँग्रेस बहुमतानं सत्तेत आली पण पाच वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत चार जणांना बसवलं.

क्रमश:

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT