Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील हालचालीना वेग आला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी आतापासूनच बैठकांवर जोर दिला जात आहे.
महायुती व महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यामुळे महायतीकडून निशाणा साधला जात आहे. ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शेलक्या शब्दांत टीका केली.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्रीपद स्वीकारले असे उद्धव ठाकरे सांगत होते. ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महविकास आघाडी आज तुमचे नावही मुख्यमंत्रिपदासाठी घेत नाही. एकेकाळी ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या जायच्या, जे जागावाटप करण्याचे सूत्र ठरवायचे, तेच आज जागांचा जोगवा मागत फिरत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली.
दिल्लीपुढे आम्ही झुकत नाही, आमचा स्वाभिमान झुलवत नाही, आम्ही कोणाला विचारायला जात नाही म्हणून डरकाळ्या फोडणारे ठाकरे दिल्लीत जाऊन दोन चार जागा मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या घरी हेलपाटे मारत आहेत.
भाजपची शिवसेनेसोबत गेली 25 वर्ष वैचारिक तत्वांवर आधारलेली युती होती. जी प्रत्यक्ष स्व. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या महाराष्ट्राच्या धुरिणांनी काँग्रेसला सत्तेबाहेर करण्यासाठी अस्तित्वात आणली होती. भाजपसोबत लढताना १२५ पेक्षा जास्त जागांवर लढणारी शिवसेना, म्हणजे आताची उबाठा कशाबशा १०० जागा मिळवण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे, अशी टीका उपाध्येंनी केली आहे.
स्वाभिमान गमावणे याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी आजच्या उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठाकडे बघावे, ठाकरेंची शिवसेना जेमतेम १०० जागा मिळवण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे, दिल्लीत जाऊन दोन चार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत असल्याचे उपाध्ये म्हणाले.
चुकून आणि दुर्दैवाने मिळालेलं मुख्यमंत्रीपदही गेले
उद्धव ठाकरेंनी ज्या अमित शहांची तुलना अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपचे अध्यक्ष असतानाही मातोश्रीवर चर्चेसाठी आले आणि योग्य तो सन्मान दिला. ज्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजपसोबतची युती तोडली, ती सत्ता तर गेलीच, पक्षही गेला. चुकून आणि दुर्दैवाने मिळालेलं मुख्यमंत्रीपदही गेलं, असा टोलाही केशव उपाध्येंनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.