Legislative Council Election sarkarnama
विशेष

Vidhansabha Election 1999 Flashback : युतीचं सरकार गेलं अन् आघाडीचं सरकार आलं!

Maharashtra Politics News : 1999 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली. सोनिया गांधींविषयी विदेशी मुद्दा उपस्थित करून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि...

Sandeep Chavan

Maharashtra Politics : महाराष्ट्रात 1995 मध्ये पहिल्यांदाच सत्तेत आलेलं युतीचं सरकार जाऊन 1999 च्या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचं पहिल्यांदाच सरकार बनलं आणि या आघाडीचे पहिले मुख्यमंत्री ठरले काँग्रेसचे विलासराव देशमुख. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पदार्पणातच केलेली दमदार एन्ट्री!

288 जागा, 39 पक्ष, 837 अपक्ष!

1999 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप (BJP) युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली. सोनिया गांधींविषयी विदेशी मुद्दा उपस्थित करून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 223 जागा लढवल्या तर काँग्रेसनं 249 जागा लढवल्या.

दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध आपापल्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवलं. तिकडं शिवसेना-भाजप युतीनं अनुक्रमे 161 आणि 117 जागा लढवल्या. एकूण 39 पक्षांसह 837 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आणि सुरू झाला विधानसभा 1999 चा रणसंग्राम...

पहिल्याच झटक्यात राष्ट्रवादीचे 58 उमेदवार विजयी

राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या पहिल्याच निवडणुकीत 58 जागांवर विजय मिळवला. 75 जागांवर विजय मिळवून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी 1995 च्या तुलनेत 05 जागा घटल्या. नाही म्हटलं तरी शरद पवारांनी स्थापन केलेल्या नव्या पक्षाचा काँग्रेसला (Congress) थोडाफार फटका बसला. तिकडं शिवसेना-भाजप युतीच्या जागाही घटल्या.

शिवसेनेनं 69 तर भाजपनं 56 जागा जिंकल्या. 1995 च्या तुलनेत शिवसेनेच्या 04 तर भाजपच्या 09 जागा घटल्या. बसपनं 83 जागा लढवल्या पण एकही जागा जिंकता आली नाही. एकूण 39 पक्षांपैकी 13 पक्षांना जागा जिंकता आल्या तर 26 पक्षांच्या हाती भोपळा लागला. 837 अपक्षांपैकी 12 उमेदवार आमदार बनले.

इतर काही पक्षांनी जिंकलेल्या, लढवलेल्या जागा

शेकाप - विजयी - 05 - लढवलेल्या जागा - 22

भारिप - विजयी - 03 - लढवलेल्या जागा - 34

जनता दल (सं) - विजयी - 02 - लढवलेल्या जागा - 25

सप - विजयी - 02 - लढवलेल्या जागा - 15

माकप - 02 - लढवलेल्या जागा - 23

रिपाइं - 01 - लढवलेल्या जागा - 10

गोंडवाना गणतंत्र पक्ष - 01 - लढवलेल्या जागा - 16

नेटिव्ह पीपल्स पक्ष - 01 -लढवलेल्या जागा - 01

समाजवादी जनता पक्ष (महाराष्ट्र) - 01 - लढवलेल्या जागा - 05

विलासराव देशमुख 'आघाडी'चे पहिले मुख्यमंत्री

1999 च्या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 75 जागा मिळवून काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला. काँग्रेसला 75 जागा मिळाल्या. निवडणुकीपूर्वी स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडणुकीनंतर मात्र काही मित्रपक्षांना हाताशी धरून आघाडी केली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला.

अखेर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं पहिलंवहिलं सरकार बनलं आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख या सरकारचे पहिले मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री बनले.

*पुढील भागात विधानसभा फ्लॅशबॅक 1995*

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT