Vinayak Mete-Devendra Fadnavis
Vinayak Mete-Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

विनायक मेटेंचा देवेंद्र फडणवीसांना मध्यरात्री सव्वादोनला मेसेज!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) हे माझे अत्यंत जवळचे सहकारी होते. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून आम्ही खूपच जवळून काम केले आहे. मेटे यांनी शनिवारी (ता. १३ ऑगस्ट) मध्यरात्री सव्वादोन वाजता मला मेसेज पाठवला होता. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावली आहे, त्या बैठकीला मी येतो आहे. मी आपल्याला फोन लावला होता, त्यावेळी तुम्ही फ्लाईटमध्ये होता. मी सकाळी तुमच्याशी बोलतो.’ असा तो मेसेज होता आणि आज सकाळीच मी तो वाचला, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. (Vinayak Mete sent message to Devendra Fadnavis at midnight on Saturday)

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज पहाटे ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’वर अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर यांनी पनवेलमधील एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन मेटे यांच्या अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, अत्यंत दुःखद अशा घटनेने आजचा दिवस सुरू झाला. माजी आमदार मेटे यांच्या अपघाताचा आज सकाळी सहा-साडेसहालाच मला मेसेज आला, त्यावेळी त्याची गंभीरता लक्षात आलेली नव्हती, म्हणून मी माहिती घेत होतो. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली. रुग्णालयात आल्यानंतर साधारणपणे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मेटे यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. मात्र, आताच मुख्यमंत्री शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विनायक मेटे हे अत्यंत संघर्षशील अशा प्रकारचे नेतृत्व होतं. अतिशय गरिबीतून वर येत स्वतःच्या भरोशावर उभं राहिलेलं ते नेतृत्व हेातं. मराठा आरक्षणाचा लढा अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी लढला आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. अगदी न्यायालयात केस लढण्यापासून आंदोलन करण्यापर्यंत सर्व गोष्टी त्यांनी केल्या. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांचा प्रचंड अभ्यास होता. माझे ते अत्यंत जवळचे सहकारी होते, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

मराठा आरक्षणासंदर्भात अत्यंत तळमळीचा नेता मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे अतिशय अपरिमित अशी हानी झाली असून कधीही भरून न येणारी ही घटना आहे. मुख्यमंत्री आणि मी आताच मेटे यांच्या परिवाराला भेटलो आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत. मेटे यांचे निधन हे शिवसंग्राम परिवाराला मोठा धक्का आहे. आम्ही या परिवारासोबत कायम राहणार आहोत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT