Solapur, 29 September : सुशीलकुमार शिंदे हे माझ्यापेक्षा लहान आहेत...शेवटी त्यांना मला सांगावं लागेल की...मी बरा आहे... तुमच्यापेक्षा आठ महिन्यांनी का होईना मी थोरला आहे...त्यामुळे जास्त भानगडीत आमच्या नादी लागू नका,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांची फिरकी घेतली.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा अकलूज (जि. सोलापूर) येथे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी आपल्या भाषणात पवार यांनी वयावरून शिंदे यांची फिरकी घेतली. कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह माेहिते पाटील, बाळासाहेब थोरात, खासदार शाहू महाराज आदी प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.
आपण एका चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. सुशीलकुमार शिंदेंचा (Sushilkumar Shinde) 84 वा वाढदिवस... माहीत नव्हतं की, शिंदे हे 84 वर्षांचे झाले आहेत...माझ्यापेक्षा साडेआठ महिन्यांनी ते लहान आहेत...आताच बघा ते कसे वाटतात...असे म्हणत शरद पवारांनी शिंदेंची फिरकी घेतली. ते पुढे म्हणाले, आज शिंदे यांचा सत्कार आहे...सत्कारमूर्तींचं उत्तर हे शेवटी असतं.. सुशीलकुमार शिंदे हे माझ्यापेक्षा लहान आहेत...शेवटी त्यांना मला सांगावं लागेल की...मी बरा आहे... असे सांगून पवारांनी शिंदेंना चिमटा काढला.
शेवटी तुमचा सन्मान आहे. हजारोंच्या संख्येने लोक आज तुमच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आणि तुमचे विचार ऐकण्यासाठी आले आहेत. मला आनंद आहे की, मोहिते पाटील परिवाराने हा आनंदोत्सव सोहळा आयोजित केला. शिंदे यांच्या आयुष्यातील मोठा काळ तुम्हा लोकांसोबत गेला, असे पवारांनी नमूद केले.
सुशीलकुमार शिंदे हे कष्टाने पुढे आले. मुंबईला गेले. शिक्षण वाढवले. पोलिस खात्याची नोकरी केली. हळूहळू समाजकारणाची आस्था निर्माण झाली... विधीमंडळात आले...मंत्रिमंडळात आले...मुख्यमंत्री झाले... राज्यपाल झाले....केंद्रामध्ये मंत्री झाले...एवढी प्रगती कोणाच्या आयुष्यात कधी मिळत नसते. मीसुद्धा अनेक दिवस सत्तेमध्ये होतो. पण शिंदेंइतका राजकारणातील वेगळेपणा मलाही कधी जमला नाही आणि हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.
सुशीलकुमार शिंदे यांनी सत्ता कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. पाय नेहमी जमिनीवर ठेवले आणि सामान्य माणसाची बांधिलकी कधी सोडली नाही, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत, ते त्यांच्या कर्तृत्वाचे यश आहे, अशा शब्दांत पवारांनी आपल्या सहकाऱ्याचे कौतुक केले.
वयाची 84 वर्षे वैगेरे झाली आहेत, हे डोक्यात काढा. आपल्याला लांब जायचं आहे. तुम्ही काही चिंता करू नका. आपण आणखी पुढं जाऊ. कोणी काही म्हटलं तर हातात घेतलेलं काम सोडायचं नाही. तुम्ही असंच काम करत राहा. नव्या पिढीला मार्गदर्शन करत राहा. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र हा देशाचा महत्वाचा भाग आहे, हे दाखवण्याची खबरदारी नवी पिढी घेईल, त्या नव्या पिढीला तुम्ही आणि मी मार्गदर्शन करू, असा सल्लाही शरद पवार यांनी शिंदे यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.