Mangalveda Bazar Committee Election Sarkarnama
विश्लेषण

Bazar Samiti Election : मंगळवेढ्यात काका-पुतण्याची बाजी : भालके-परिचारकांच्या समविचाराचे स्वप्न धुळीस

आमदार समाधान आवताडे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे बबनराव आवताडे यांनी १३ जागा बिनविरोध करून बाजार समितीवर एकहाती वर्चस्व कायम ठेवले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा (Mangalveda) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत आज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल ११३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे बबनराव आवताडे यांनी १३ जागा बिनविरोध करून बाजार समितीवर एकहाती वर्चस्व कायम ठेवले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत चुलत्या- पुतण्यांनी एकत्र येऊन पुन्हा सत्ता स्थापन केली. मात्र, पाच जागांसाठी नऊ उमेदवार आखाड्यात राहिल्याने निवडणूक लागली आहे. (13 unopposed seats of Mangalveda Bazar Committee)

दरम्यान, विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरमधील माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके यांनी एकत्र येत समविचारी आघाडी उभारली होती. या समविचारीच्या माध्यमातून दामाजी कारखान्यात आमदार समाधान आवताडे यांनी धूळ चारली होती. त्याच पद्धतीने बाजार समितीही ताब्यात घेण्याचा भालके-परिचाकरांचा प्रयत्न समाधान आवताडे आणि बबन आवताडे या काका पुतण्यांनी एकत्र येत हाणून पाडला.

गतवर्षी १८ जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदा १८ जागांसाठी १४५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १० अर्ज छाननीत बाद झाले तर उर्वरित १३५ पैकी आज ११३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. बिनविरोध १३ जागांमध्ये संस्था मतदार संघाच्या नऊ, ग्रामपंचायतीमधील एक आणि व्यापारी मतदारसंघातील दोन, हमाल तोलारमधील एका जागेचा समावेश आहे. संस्था मतदार संघातील महिलांच्या दोन जागांसाठी तीन, ग्रामपंचायतीमधील दोन जागांसाठी तीन तर ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय एका जागेसाठी तीन अर्ज असे पाच जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर बबनराव आवताडे व आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने एकमेकांपासून फारकत घेतल्यामुळे अनेकांना राजकीय अडचणीचा सामना करावा लागले. बबनराव आवताडे यांनी आपले राजकीय बस्तान जोमाने बसवत असताना दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत ऐनवेळी अंतिम टप्प्यात पाठिंबा दिल्यामुळे आवताडे गटाला कारखाना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यानंतर समर्थकांनी या निवडणुकीत दोघांनी एकत्र यावे, ही भूमिका मांडली. विरोधात लढलो तर तिसऱ्याचा लाभ होतो, ही भूमिका दोघांनाही सांगून त्यांची मनधरणी करण्यात यश मिळवले.

बिनविरोध संचालक

संस्था मतदारसंघातून विष्णुपंत आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, सुशील आवताडे, नानासाहेब चोपडे, मनोज चव्हाण, प्रकाश जुंदळे, धन्यकुमार पाटील, सहदेव लवटे, बिराप्पा माळी, व्यापारी मतदारसंघातून बबनराव अवताडे, बसवंत पाटील, हमाल तोलार मतदारसंघातून प्रवीण कौडूभैरी, ग्रामपंचायत मतदार संघातून आनंद बिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT