AAP internal conflict : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील दहापैकी सात खासदारांनी बंड केले आहे. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकाचवेळी सात खासदार पक्षातून बाहेर पडण्यामागे नेमकं कारण काय, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. केजरीवालांना हे माहिती नव्हतं का, त्यांनी अचानक घर का बदललं, नेमकं काय घडलं, खासदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला का, यामागे मास्टरमाईंड कोण, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
सुरूवात कुठून झाली?
खासदार राघव चढ्डा यांच्यासह आपचे नवनियुक्त उपनेते अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून आपण भाजपसोबत जाणार असल्याची घोषणा केली. या तिघांसह माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम सहानी आणि राजेंद्र गुप्ता हे खासदारही आपल्यासोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले. पण अचानक हे कसं घडलं? खरंतर याची सुरूवात २ एप्रिललाच झाली.
चड्ढांना पदावरून हटवले
राघव चड्ढा हे आपचे राज्यसभेतील उपनेते होते. त्यांना २ एप्रिलला पदावरून हटविण्यात आले. त्यांच्याजागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. याचदिवशी पहिली ठिणगी पडली. राघव चड्ढा यांनी इतर खासदारांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला अन् त्यातून भाजप प्रवेशाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
१४ एप्रिलला धमाका
चड्ढा यांच्याकडून अशोक मित्तल यांच्यासह इतर खासदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जात होता. सुरूवातीला मित्तल यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. पण १४ एप्रिलला धमाका झाला. मित्तल यांच्याशी संबंधित आस्थापनांवर ईडीने रेड टाकली. तिथूनच अन्य खासदारांचे मन वळण्यास सुरूवात झाली. स्वाती मालीवाल या आधीपासून आपपासून चार हात लांब होत्या. त्यामुळे पहिला होकार त्यांचा होता.
मित्तल यांच्यावरील रेडमधील इतर खासदारही सतर्क झाले. केवळ तीन-चार खासदार सोबत घेऊन चड्ढा यांचे मार्ग सुकर होणार नव्हता. खासदारकी वाचविण्यासाठी दोन तृतीयांश खासदार सोबत असणे आवश्यक होते. त्यानुसार चड्ढा यांनी एकएका खासदाराशी वैयक्तिक संपर्क साधल्याचे समजते. यामध्ये भाजप नेत्यांचाही सक्रीय सहभाग असल्याची चर्चा आहे.
केजरीवालांना लागली कुणकुण
दरम्यानच्या काळात अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. खासदार विक्रम साहनी यांनीच ही माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे बंडखोर खासदारांशी चर्चा आणि दुसरीकडे ते केजरीवालांना ही माहिती देत होते. त्यानंतर केजरीवालांनीही खासदारांना फोन करण्यास सुरूवात केली. पण बहुतेकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. काही जणांनी फोन उचलून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामध्ये केजरीवाल अलर्टवर होते.
संदीप पाठक यांची भेट
बंडखोर खासदार संदीप पाठक यांनी २३ एप्रिल रोजी केजरीवालांची भेट घेत आपण पक्षासोबत असल्याचे आश्वासन दिले होते, अशीही माहिती समोर आली आहे. पण काही तासांत त्यांनीही पारडं बदललं. २४ तारखेला ते थेट राघव चड्ढा आणि मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषदेत दिले. त्याआधीच सातही खासदारांच्या सहीचे पत्र राज्यसभेच्या सभापतींपर्यंत पोहोचले होते.
केजरीवालांनी ते घर सोडलं
अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर आल्यापासून खासदार अशोक मित्तल यांच्या सरकारी बंगल्याचे राहत होते. मित्तल हेही चड्ढा यांच्यासोबत जाणार असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी २४ तारखेला घर बदलत असल्याचे जाहीर केले होते. पण त्यामागे मित्तल यांची बंडखोरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. सोशल मीडियातून त्यांनी केवळ आपल्याला दुसरे घर मिळाल्याचे सांगत तिथे जाणार असल्याची माहिती दिली होती. मित्तल यांच्या बंडामुळे त्यांनी घर सोडल्याचे पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.