Administration - Politics Sarkarnama
विश्लेषण

Administration - Politics : प्रशासकीय अधिकारी राजकारणात,अनेकजण तरले,काहीजण फसले...

अय्यूब कादरी

Mumbai News : ओडिशातील आयएएस अधिकारी,मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे खासगी सचिव व्ही.के.पांडियन यांनी नोकरीचा राजीनामा देऊन बिजू जनता दलाच्या माध्यमातून (बीजेडी) राजकारणात प्रवेश केला आहे. राजकारणात पाऊल टाकल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्यांच्या दर्जाचे पद दिले आहे. त्यांनी २० ऑक्टोबरला राजीनामा दिला आणि केवळ तीनच दिवसांत तो मंजूर करण्यात आला.

कार्यक्षम,धडाकेबाज,प्रामाणिक अधिकारी अशी ओळख असलेल्या पांडियन यांच्या माध्यमातून तरुणांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा मुख्यमंत्री पटनायक यांचा प्रयत्न आहे. पांडियन यांच्याप्रमाणे महाराष्ट्रासह देशभरात याआधीही आयएएससह अन्य प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यापैकी काहींना यश आले तर काहीजण अपयशी ठरले.

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रसेचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे उदाहरण महाराष्ट्रात ताजे आहे.श्रीनिवास पाटील हे आयएएस अधिकारी होते.ते शरद पवार(Sharad Pawar) यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत.नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला.लोकसभेच्या सातारा मतदारसंघात २०१९ मध्ये झालेल्या पोटनवडणुकीत त्यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला.त्यापूर्वी जुलै २०१३ ते आॅगस्ट २०१८ पर्यंत ते सिक्कीमचे राज्यपाल होते.

पुण्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सेवानिवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)मध्ये प्रवेश केला.२०१९ ला माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती,मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही.त्यांचे गणित अद्याप जमून आलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर महापालिका आयुक्त म्हणून ९० च्या दशकात आयएएस अधिकारी टी. चंद्रशेखर यांची कारकीर्द राज्यभर गाजली होती.त्यांनी नागपूरचा चेहरामोहरा बदलला होता. २००८ मध्ये त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी पेज राज्यम पार्टीत प्रवेश करून राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर जनसेना पक्षात प्रवेश केला. आंध्र प्रदेश विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये ते पराभूत झाले. आता ते तेलंगणात सत्ताधारी असलेल्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमधून दोनवेळा विधानसभेत गेलेले कै. रायभान जाधव हे आयएएस अधिकारी होते. एकदा ते काँग्रेसतर्फे निवडून गेले होते. दुसऱ्यांदा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली. आता भारत राष्ट्र समिती पक्षात असलेले त्यांचे पुत्र हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा (२००९ आणि २०१४) प्रतिनिधीत्व केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal) हे आयआरएस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) अधिकारी होते. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात आघाडीवर होते. अण्णांचे आंदोलन संपल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. त्यांच्या पक्षाला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळाले. आता दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. पंजाबमध्येही त्यांचा पक्ष सत्ताधारी आहे.

राजकारणात सर्वाधिक यशस्वी ठरलेले प्रशासकीय अधिकारी म्हणून केजरीवाल यांचा उल्लेख करता येईल.भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्यांच्यासोबत सहभागी असलेल्या देशातील पहिल्या आय़पीएस अधिकारी किरण बेदी यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या पुदुचेरीच्या राज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) बनल्या.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे आयएएस अधिकारी होते. रेल्वेमंत्री बनण्यापूर्वी ते पंतप्रधानांच्या कार्यालयात उपसचिव होते.नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून ते राज्यसभेवर निवडून गेले. परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर हे आयएफएस (इंडियन फॅारेन सर्व्हिस) अधिकारी होते.निवृत्तीनंतर भाजपमध्ये प्रवेश करून ते राज्यसभेवर गेले.नंतर त्यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आले.

जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना अजित जोगी यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रेरणेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर ते छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री बनले. ते गांधी घराण्याचे निष्ठावंत होते. जोगी आणि त्यांचा आमदार मुलगा अमित यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. अमित यांची २०१६ मध्ये काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर जोगी यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडून छत्तीसगड जनता काँग्रेस पक् स्थापन केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही.

यशवंत सिन्हा हे १९६० च्या बॅचचे आय़एएस अधिकारी आहेत. त्यांनी जनता दलात प्रवेश करून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. भाजप नेतृत्वाशी मतभेदांनंतर २०१८ मध्ये त्यांनी पक्ष सोडला. त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे भाजपमध्ये आहेत.

लोकसभेचे अध्यक्षपद (२००९-२०१४) भूषवणार्या पहिल्या महिला म्हणून मीरा कुमार यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे. १९७३ मध्ये त्या (इंडियन फॅारेन सर्व्हिस) अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी दहा वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरी केली होती. त्यांचे वडील बाबू जगजीवनराम उपपंतप्रधान होते.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये (२००४) त्या मंत्री बनल्या. काँग्रेसने २०१७ मध्ये राष्ट्रपतिपदासाठी त्यांना उमेदवारी दिली होती.

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर (आयएफएस), नटवर सिंग (आयएफएस), भाजपचे विद्यामान केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी (आयएफएस), राजकुमार सिंग (आयएएस अधिकारी यांनीही राजकारणाच नशीब आजमावले आहे. राजकुमार सिंग हे सध्या भाजपमध्ये आहेत. ते समस्तीपूरचे जिल्हाधिकारी होते त्यावेळी भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांना रथयात्रेदरम्यान अटक करण्यात आली होती. ही यादी लांबतच जाईल. राजकारणात प्रवेश करणार्या अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुढे मंत्रिपदांसह महत्वाची पदे मिळाला. अनेक अधिकारी महत्वाच्या पदांपासून वंचित राहिले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT