Ramdas Kadam | Tanaji Sawant Sarkarnama
विश्लेषण

Mahayuti Politics: बेभान नेते, उथळ वक्तव्यांनी महायुतीचा वारू भरकटला?

अय्यूब कादरी

Maharashtra Politics: महायुतीचा पाया ठिसूळ झाला आहे, हे गुरुवारी समोर आले ते शिवसेना शिंदे गटाच्या दोन बड्या नेत्यांच्या विधानांमुळे. या दोन्ही नेत्यांनी यासाठी धाराशिव जिल्ह्याची निवड नियोजनपूर्वक केली की, हा योगायोग असावा, असा प्रश्न आहे. तिकडे, महाविकास आघाडीचे नेते, विशेषतः शरद पवार हे बेरजेचे राजकारण करत असताना महायुतीचे नेते मात्र आपल्या राजकीय अपरिपक्वतेचे जाहीर प्रदर्शन करत आहेत.

हे दोन नेते कोण आहेत, हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेल. होय, धाराशिवचे पालकमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि दुसरे म्हणजे रामदासभाई कदम. वादग्रस्त विधाने करण्यासाठी हे दोन्ही नेते ओळखले जातात. रामदासभाई यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती.

रवींद्र चव्हाण हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी रामदासभाई यांच्याबाबत थोबाड फोडण्याची भाषा वापरली. रामदासभाई यांनी आता तुळजापूरचे आमदार, राज्याचे दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना अंगावर घेतले आहे. डॉ. सावंत यांच्या वादग्रस्त विधानांची तर लांबलचक यादीच होईल. मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, असे ते मागे एकदा जाहिरपणे म्हणाले होते.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसल्यामुळे डॉ. सावंत यांना म्हणे उलटी येते! कमालच झाली ना ही? सावंत असे विनाकारण बोलले नाहीत. त्यांना एक जुने शल्य टोचत असते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, मात्र सावंत यांना मंत्रिपद मिळाले नव्हते.

त्यांना मंत्रिपद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा, विशेषतः अजितदादा पवार यांचा प्रखर विरोध होता, असे सांगितले जाते. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. तो राग सावंत यांच्या मनात अद्यापही आहे, असे त्यांच्या उलटीच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात सावंत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

मुत्सद्दी, मुरब्बी राजकारणी बोलून दाखवत नाहीत. सावज टप्प्यात आला की कार्यक्रम उरकून टाकतात. कागल (जि. कोल्हापूर) येथील भाजपचे नेते समरजित घाटगे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी कागल येथे घाटगे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतो, असे त्यावेळी पाटील म्हणाले होते. ते महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी उद्देशून बोलत होते. मुत्सद्दी राजकीय नेत्याची ही ओळख असते.

आता महायुतीत काय सुरू आहे पाहा. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, या दुर्दैवी घटनेवर महायुतीच्या नेत्यांची वक्तव्ये चीड निर्माण करणारी आहेत, हा आणखी वेगळा विषय आहे.

शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनीही महायुतीत वात पेटवण्यासाठी गुरुवारचाच दिवस निवडला आणि स्थळ निवडले ते कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेचे शहर, म्हणजे तुळजापूर! तुळजापूरचा आमदार शिवसेनेचा व्हावा, हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, हे खरे आहे, मात्र रामदासभाई यांना हे महायुतीत आल्यानंतरच आठवले असेल का, असा प्रश्न निर्माण होत आहे. राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत. आता रामदासभाईंना हा मतदारसंघ शिंदे गटाला हवा आहे!

राजणाजगजितसिंह पाटील हे 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. त्यांची जिल्ह्यात संस्थात्मक ताकद आहे. ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. आमदार पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात.

असे असले तरी त्यांनी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिपदाबाबत अवाक्षरही काढलेले नाही. महायुतीत तीन पक्ष असल्यामुळे सर्वाधिक आमदार असूनही भाजपच्या अनेकांना संधी मिळू शकली नाही.

या पार्श्वभूमीवर रामदासभाई यांनी तुळजापूर मतदारसंघ शिंदे गटाला द्यावा, अशी मागणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन मतदारसंघ शिंदे गट लढवणारच, अशी भूमिका पालकमंत्री सावंत यांनी 15 ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे.

आता उरलेला एक तुळजापूर मतदारसंघ, जो भाजपच्या ताब्यात आहे, त्याच्यावरही शिंदे गटाने दावा केला आहे. हे कशाचे लक्षण म्हणावे? महायुतीचा वारू भरकटला आहे, हे स्पष्ट जाणवत आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेले रामदासभाई धाराशिव जिल्ह्यात महायुतीत वात पेटवून गेले आहेत.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पराभव झाला असला तरी जिल्ह्यातील भाजपच्या ताकदीकडे, संघटनाकडे दुर्लक्ष करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाला महागात पडू शकतो.

भूम-परंड्याचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि उमरगा-लोहाऱ्याचे प्रतिनिधीत्व करणारे ज्ञानराज चौगुले यांना याची कटू फळे चाखावी लागू शकतात. रामदासभाई म्हणाले तसे शिंदे गटाला बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक स्वबळावर लढावी लागेल.

या मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार कोण असेल, येथून त्यांना सुरुवात करावी लागेल. दुसरे म्हणजे, रामदासभाई आणि पालकमंत्री सावंत यांच्या विधानांमुळे भाजपची घडी बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यात भाजपमध्ये काही प्रमाणात जुने-नवे असा संघर्ष दिसतो आहे. त्या संघर्षाला रामदासभाईंच्या वक्तव्यामुळे पूर्णविराम मिळून पक्ष एकवटतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रामदासभाई आणि सावंत यांची वक्तव्ये भाजप आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागण्यासारखीच आहेत.

महायुतीतून बाहेर पडलेले बरे, अशी प्रतिक्रिया सावंत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे. यामुळे महायुतीतील बेबनाव टोकाला तर गेला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याची सुरुवात झाली होती.

महायुतीत अजितदादा पवार यांच्या पक्षाचा समावेश झाल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आहे, असा लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाला होता. आता त्याच्या पुढचा अंक सुरू झाल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून महायुती बाहेर पडली, असे वाटत होते, मात्र तिन्ही पक्षांत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.महायुतीत सारे काही आलबेल दिसत नाही.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT