Darshan Thoogudeepa: खुनाच्या आरोपातील सुपरस्टारला जेलमध्ये रॉयल ट्रीटमेंट; मुख्यमंत्र्यांचा पारा चढला अन्...

Actor Darshan Getting Royal Treatment In Jail: कन्नड सुपरस्टार दर्शन हा खुनाच्या आरोपात कारागृहात आहे. कारागृहात त्याला विशेष सुविधा दिल्या जात असल्याचे समोर आल्यानंतर वाद झाला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणी दोन जेलरसह सात अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
Darshan Thoogudeepa
Darshan ThoogudeepaSarkarnama
Published on
Updated on

Renukaswamy Murder Case: खुनाच्या आरोपातील एका सुपरस्टारच्या बचावासाठी मध्यस्थी करावी, यासाठी एक बडे राजकीय प्रस्थ शिफारस घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले होते, अशी चर्चा रंगली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला फटकारून या प्रकरणात पुन्हा कोणत्याही प्रकारचा संवाद साधायचा नाही, अशी ताकीद दिली होती.

हा प्रकार जूनमध्ये घडला होता. आता तो अभिनेता कारागृहात आहे. कारागृहात तो ऐशोआरामात राहत असल्याचे समोर येताच मुख्यमंत्र्यांचा पारा चढला आणि दोघा जेलरसह सात अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची कुऱ्हाड कोसळली.

हे प्रकरण कर्नाटकमधील आहे. कन्नड सुपरस्टार 47 वर्षीय दर्शन थुगुदीपा (Darshan Thoogudeepa) याला एका चाहत्याच्या खून प्रकरणात 11 जून 2024 रोजी अटक करण्यात आली आहे. दर्शन हा कर्नाटकमधील लोकप्रिय अभिनेता आहे.

त्याच्यावरील खुनाचे आरोप आणि त्यानंतर अटकेमुळे खळबळ उडाली होती. त्याच्या कथित गर्लफ्रेंडला आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्या रेणुकास्वामी या त्याच्या 33 वर्षीय चाहत्याचा मृतदेह गटारीत आढळला होता. एका फार्मा कंपनीत काम करणाऱ्या रेणुकास्वामी यांचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला होता. अभिनेता दर्शन याच्यावर खून करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.

सुपरस्टार दर्शनची फॅन फॉलोइंग मोठी आहे. त्यामुळे त्याला अटक झाल्यानंतर कर्नाटकमधील एका बड्या राजकीय नेत्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे येऊन शहाजोगपणा केला होता, अशी चर्चा कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात होती.

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, असे त्यांचे म्हणणे होते. सिद्धरामय्या यांनी ते धुडकावून लावत पुन्हा या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा संवाद साधायचा नाही, अशी ताकीद दिली होती, अशी चर्चा त्यावेळी कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात होती, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Darshan Thoogudeepa
Mehbooba Mufti: निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; सांगितलं कारण...

अन्य 17 आरोपींसह अभिनेता दर्शन सध्या कारागृहात आहे. त्यामध्ये त्याची कथित मैत्रीण अभिनेत्री पवित्रा गौडा हिचाही समावेश आहे. कारागृहातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेता दर्शन याला कारागृहात विशेष सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत. तेथे तो आरामात राहत आहे, ही दर्शवणारी छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

भाजपकडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या आधीच अडचणीत आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दोषी आढळलेल्या दोन जेलरसह सात अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

Darshan Thoogudeepa
Beed News: जनसन्मान यात्रा येण्यापूर्वीच झळकले काळ्या रंगाचे बॅनर; बीडकरांनी विचारला अजितदादांना जाब

दर्शन हा कारागृहात आरामात खुर्चीवर बसून सिगारेट ओढत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला अन्य कारागृहात हलवण्याचे आदेश दिले आहेत. दर्शन हा बंगळुरू येथील परप्पन कारागृहात आहे. त्याच्यासोबत अन्य आरोपीही सिगारेट ओढत असल्याचे छायाचित्रात दिसत आहेत. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. दर्शनला आता बळ्ळारी येथील कारागृहात हलवण्यात आले आहे.

रेणुकास्वामी यांचा मृतदेह बेंगळुरू येथील एका अपार्टमेंटजवळ आढळला होता. त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फूटेजमुळे दर्शन आणि पवित्रा यांच्यावर संशय वाढला. गुन्हा घडला त्या ठिकाणी ते दोघेही होते, हे सीसीटीव्हीत आढळले होते. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. खुनासाठी त्यांना साथ देणाऱ्या अन्य 15 जणांनाही अटक करण्यात आली असून, ते सध्या कारागृहात आहेत.

दर्शनच्या वकीलांनी या सर्व आरोपांचा आधीच इन्कार केला आहे. दर्शनच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. पवित्रा ही दर्शनची पत्नी असल्याचे सांगितले जात होते, मात्र वकीलांनी ते खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.

दर्शन हा कर्नाटक सिनेसृष्टीचा सर्वात मोठा स्टार आहे. चाहते त्याची पूजा करतात. निर्मात्यांना त्याचे चित्रपट हमखास नफा मिळवून देतात. एका चित्रपटासाठी तो 25 ते 30 कोटी रुपये शुल्क आकारतो, असे सांगितले जाते. पत्नीला मारहाण प्रकरणात यापूर्वीही एकदा त्याला अटक करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com