Ahilyadevi Holkar 300th birth anniversary : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित जयंतीचा कार्यक्रमाचं नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारनं अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या (ता. 6) होत आहे.
त्यामुळे या बैठकीत कोणते निर्णय होतात, याकडे लक्ष लागलं आहे. या बैठकीसाठी विधान परिषदेचे प्रा. राम शिंदे राज्य सरकारकडे आग्रही होते. आता अहमदनगरचं अहिल्यानगर, असं नामकरण करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी इथं गेल्या 31 वर्षांत, विशेष करून जयंतीचा कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरा करायला सुरुवात झाल्यापासून काय काय परिवर्तन झालं, याचा आढावा घेतला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगावी चौंडी इथं सन 1994 साली विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अण्णा डांगे यांनी सर्वात प्रथम भेट दिली. त्यावेळी चौंडीला वेड्याबाभळीनं वेढलं होतं. अण्णा डांगे यांनी विकासाची मुहुर्तमेढ रोवली. त्यानंतर अवघ्या एक वर्षांत म्हणजे, 1995 ला राज्यात भाजप (BJP)-शिवसेना युतीचे सरकार आले. डांगे यांची ग्रामविकास, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्रिपदावर वर्णी लागली. डांगे यांनी चौंडीच्या विकासाला गती दिली. 1995 साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 200 व्या पुण्यतिथीनिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत 25 ऑगस्ट 1995 रोजी चौंडीत भव्य कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यावेळी चौंडीत पहिल्यांदाच हेलिकॉप्टर उतरले. जोशी यांनी चौंडीला पर्यटनस्थळ म्हणून विकसासाठी तब्बल दोन कोटी रूपयांचा निधीची घोषणा केली.
अहिलेश्वर मंदिर, महादेव मंदिर, चौंडेश्वरी मंदिर, जन्मघर गढी, हनुमान मंदिर यासह अनैक वास्तुंचा जीर्णोध्दार झाला. माणकोजी शिंदे स्मृती सभागृह, विश्रामगृह, विस्थापितांसाठी घरकुले, अशी कामे झाली. 11 सप्टेबर 1996 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डाॅ. शंकरदयाळ शर्मा यांच्या उपस्थित झालेल्या 201 व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेचे (Shivsena) मुख्यमंत्री मनोहर जोशी- भाजपचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हेही उपस्थित राहिले. यावेळी मुख्यमंत्री जोशी यांनी चौंडीतील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची घोषणा केली.
सीना नदीवर तब्बल 90 लाख रूपये खर्चाचा पुल बांधण्यासाठी तत्कालीन बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी विशेष निधी देवून, या पुलाचा प्रारंभ केला. दरम्यान, तत्कालीन पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते यांनी अकलूजच्या शिवसृष्टीच्या धर्तीवर चौंडीत "अहिल्या" शिल्पसृष्टी उभारण्यासाठी भरीव निधी दिला.
31 मे 2001 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चौंडीत हजेरी लावली. यावेळी त्यांनी चौंडीला विकासकामांना भरीव निधी देण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात महादेव जानकर यांच्यावतीने सन 1996 ते 2015पर्यंत चौंडीत जयंतीचे कार्यक्रम साजरे करण्यात आले. प्रारंभी यशवंतसेनेच्या माध्यमातून जयंती साजरी केल्यानंतर जानकर यांनी सन 2012ला दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थित चौंडीत जयंती कार्यक्रम घेत राष्टीय समाज पक्षाची स्थापना केली.
31 मे 2014 ला जयंती कार्यक्रमास लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी चौंडीला हजेरी लावली. केंद्रात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री झाल्यानंतर मुंडे यांचा चौंडीतील कार्यक्रम राज्यातील पहिला आणि शेवटचा कार्यक्रम ठरला. 2016 पासून तत्कालीन मंत्री प्रा. राम शिंदे यांनी जयंतीचा कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना जयंती कार्यक्रमाला बोलावले. चौंडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करताना साधारण 50 कोटीहून अधिक रकमेची कामे झाली.
22 वर्षानंतर 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडीत हजेरी लावली. यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर बारामती येथील सरकारी मेडीकल काॅलेजलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा चौंडीतच झाली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी देशभर हजारो मंदिरांचा जीर्णोध्दार केला. अनेक विकास कामे केली. अहिल्यादेवी या महिला शासक असूनही त्यांनी केलेला राज्यकारभार हा आदर्शवत होता. नव्या पिढीला त्यांच्या कार्याची कायम प्रेरणा मिळावी यासाठी चौंडी हे त्यांचं जन्मगाव राष्टीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्या (ता. 6) महायुती सरकारची राज्य मंत्रिमंडळाची होत असलेल्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.