BJP internal conflicts Sarkarnama
विश्लेषण

BJP internal conflicts : मांडव रिकामा होऊनही काँग्रेस 'अलबेल'; भाजपमधील धुसफूस पोचली मुंबईपर्यंत...

Complaints BJP factionalism in Ahilyanagar and Shrirampur reach Mumbai causing concern for Minister Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील राजकारणात काँग्रेस नेत्यांसमोर भाजपनं चांगलच आव्हान उभं केलं असलं, तरी भाजपमध्ये अंतर्गत वाद वाढले आहेत.

Pradeep Pendhare

Shrirampur BJP infighting : अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरातील व्यापारी वर्गासह (कै.) जयंत ससाणे यांच्या कट्टर समर्थक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच भाजपने पक्षसंघटनेच्या नेतृत्वात बदल करत शहरासह तालुक्यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली. एकंदरीत पक्षाची ताकद वाढलेली दिसत असताना नवा व जुना कार्यकर्ता, असा वाद उफाळून आला.

बॅनरबाजी होऊन मतभेद चव्हाट्यावर आले. त्यामुळे भाऊगर्दी झालेल्या भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळला असून, त्याच्या तक्रारी मुंबईपर्यंत पोचल्या आहेत. यातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे रिकामी झालेल्या काँग्रेसला नव्याने पक्षबांधणीसह पदाधिकारीही निवडायचे असताना त्यांच्याकडे, मात्र 'अलबेल' दिसत आहे.

भाजप हा केडर बेस असलेला पक्ष असूनही काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या श्रीरामपूरमध्ये त्यांना शिरकाव करण्यासाठी वेळ लागला. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मतांचे ध्रुवीकरण करत एकगठ्ठा हिंदू मते आपल्या पारड्यात टाकण्यात यश मिळविले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही सुरुवातीला माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व नंतर लहू कानडे यांच्या बाजूने ताकद उभी केली. मात्र, पारंपरिक भाजप व केडर पूर्ण क्षमतेने त्यांच्यासोबत आला नाही.

संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्यासाठी प्रयत्नाशी शर्थ केल्याचे त्यांना मिळालेल्या मतांवरून दिसून आले. यातून नेत्यांनी बोध घ्यायला हवा होता. निवडणुका पार पडल्यानंतर भाजप (BJP) पक्ष संघटनेत बदलाचे वारे वाहू लागले. काँग्रेस पक्ष अंगवळणी पडलेले पदाधिकारी भाजपत आले खरे. मात्र, त्यांनी आपला काँग्रेसी बाणा सोडलेला नव्हता. त्यामुळे पदासाठी लॉबिंग सुरू होती. मध्यंतरी मंडळ अध्यक्ष निवडीसाठी बैठका झाल्या. शक्तिप्रदर्शनात इच्छुकांनी मुलाखती दिल्या. प्रत्यक्ष निवडीनंतर जे मुलाखतीला नव्हते, त्यांचीच नावे जाहीर झाली.

मुंबईपर्यंत तक्रारी

पक्षाचे निकष डावलण्यात आल्याची बॅनरजबाजी श्रीरामपूरच्या शहरभर करण्यात आली. तसेच जुन्या एका गटाने थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्याध्यक्ष चव्हाण यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाल्याचे समोर आले नाही. उलट पालकमंत्री विखे यांनी राज्यस्तरीय पक्षसंघटनेच्या बैठकीत कार्याध्यक्षांसमोर बॅनरबाजीचा खरपूस समाचार घेतला.

विखेंकडून खरडपट्टी

एकंदरीत या आरोप-प्रत्यारोपांतून जुन्या-नव्या वादाला फोडणीच मिळाली. नुकताच विखे यांना मानणाऱ्या गटातील पदाधिकारी एकत्रितपणे त्यांच्या भेटीला गेले. आताप्रमाणे एकजूट आधी का दाखविली नाही, असे म्हणत विखे यांनी खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे. एकंदरीत भाजपमध्ये पारंपरिक व विखे समर्थक, अशी सर्वच मंडळी एकवटली आहे. मांडवात जागा पुरेना इतकी गर्दी असताना सर्वच काही अलबेल नाही. अंतर्गत धुसफूस वाढली आहे. प्रत्येकाचे राजकीय सुभे अडचणीत आले आहे. या सर्वांबरोबरच भाजपचा केडर व संघाला मानणारा मतदाराला आपलेसे करण्याची कसरत विखे यांना करावी लागणार आहे.

काँग्रेसमधील दिग्गजांसमोर दिव्य

दुसरीकडे काँग्रेसच्या मांडवात दिग्गज नेते नाही. आमदार हेमंत ओगले, करण ससाणे, सभापती सुधीर नवले, सचिन गुजर आदींना आता प्रयत्नाची शर्थ करावी लागेल. नव्याने पक्षसंघटना उभी करावी लागणार आहे. नव्या शिलेदारांच्या खांद्यावर जाबाबदारीचे ओझे देताना पक्षनेतृत्वाचा कस लागणार आहे.

बदलेल ते राजकारण कसले

एकंदरीत श्रीरामपूरच्या राजकारणात मध्यंतरी सकाळी एका पक्षात दिसलेला कार्यकर्ता संध्याकाळी दुसऱ्या पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत. त्यावर मिश्किल भाष्य करताना माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी कोणता गोऱ्हा कोणत्या गायीला पितो, हेच कळत नाही, अशी श्रीरामपूरची राजकीय परिस्थिती आहे. आता जवळपास सर्वच गोऱ्हे एकत्र आणल्यानंतरही राजकारण बदलायचे नाव घेईना.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT