Nagar Politics News  Sarkarnama
विश्लेषण

Thorat Vs Vikhe : विखे, पाटलांची साखर विरोधकांना कडू? 'सायलेंट व्होटर'साठी रणनीती

Nagar Politics: विखेंची 'साखर' नगर दक्षिण-उत्तरेतील विरोधकांना फारच कडू वाटू लागली आहे.

Pradeep Pendhare

Nagar: नगर जिल्ह्यातील राजकारण नेहमीच राज्याचे महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्याभोवती फिरत असते. हे दोघे नेते सत्ता असो किंवा नसो, नगरचे राजकारण मात्र यांच्याच भोवती! विखे-थोरातांनी सध्या नगरमधील राजकारणात चर्चेत आणली आहे, ती म्हणजे 'साखर'. विशेष म्हणजे, विखे-थोरातांची ही 'साखर' केंद्रातील भाजप सरकार देत असलेल्या 'हरभरा डाळी'वर भारी पडली आहे. यात विखेंची 'साखर' नगर दक्षिण-उत्तरेतील विरोधकांना फारच कडू वाटू लागली आहे.

नगरमध्ये यंदा दुष्काळी स्थिती आहे. यातच जायकवाडीला नगरच्या धरणातून पाणी सोडले जाण्याचा आदेश आहे. हा वाद न्यायालयात पोहाेचला आहे. राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ ग्रामपंचायती निवडणुकीत विखेंना काही ठिकाणी धक्का बसला आहे. विखेंना हे धक्के त्यांच्या राहाता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात बसलेत.

बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांची युती यामागे कारणीभूत असल्याचे स्पष्ट आहे. थोरात-कोल्हे युतीने पहिला धक्का दिला आहे तो, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत. विखेंच्या ताब्यात असलेला कारखान्यावर थोरात-कोल्हे युतीने विजय मिळवला आहे. नगर जिल्ह्यात सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत.

गणेशचा गळीत हंगामदेखील सुरू झाला आहे. या वेळी थोरात यांनी गणेशच्या सर्व सभासदांना दहा किलो साखर मोफत वाटण्याची घोषणा केली. यात अनुउत्पादक सभासदांचादेखील समावेश केला. यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्येदेखील विखेंना मतदारसंघात काहीसा फटका बसला. थोरात-कोल्हे युतीने सरशी केली. हे सर्व विखे यांच्या होमग्राउंडवर घडले. यावर विखेंकडून प्रतिक्रिया येणार नाही, झाले नाही. या वेळी मंत्री विखे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे मैदानात आले.

सुजय विखे हे नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार. परंतु आपल्या वडिलांसाठी त्यांनी नगर उत्तरेतील शिर्डी मतदारसंघात शड्डू ठोकला. खासदार विखेंनी शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला रेशनकार्डवर प्रत्येकी पाच किलो साखर वाटपाची घोषणा केली. दिवाळीच्या तोंडावर ही घोषणा झाली. साखर वाटपासाठी सर्व विखे कुटुंब मैदानात उतरले आहे.

साखर वाटपाचे सोहळे

शिर्डी विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी साखर वाटपाचे सोहळे होत आहेत. मोफत साखर घेण्यासाठी लोकांची गर्दीदेखील होत आहे. यानिमित्ताने खासदार विखेंच्या छोटेखानी जाहीर सभा होत आहे. यात वेगवेगळ्या योजनांची घोषणा ते करत आहे. ही सर्व साखर पेरणी नगर उत्तरेत मंत्री विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात होत आहे. परंतु विखेंची ही साखर नगर दक्षिणेतील नेत्यांना कडू लागू लागली आहे.

उत्तरेत दिवाळी, दक्षिणेत शिमगा?

सुजय विखे ते साखर वाटप करत फिरत आहेत, नगर उत्तरमध्ये. यामुळे नगर दक्षिणेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. खासदार विखेंच्या या साखर वाटपाचे पडसाद आता नगर दक्षिणमध्ये उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (अजित पवार गट) यांनीदेखील पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात मोफत एक किलो साखर वाटप आणि दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचा धडाका लावला आहे. यातच खासदार विखेंच्या या मोफत साखर वाटपावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी सडकून टीका केली आहे. निवडून यायचे नगर दक्षिणमध्ये आणि साखर वाटायची नगर उत्तरमध्ये. म्हणजेच नगर उत्तरेत दिवाळी आणि नगर दक्षिणेत शिमगा आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

नगर दक्षिणमधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील नगर उत्तरेतील या साखर वाटपावर नाराज आहे. परंतु त्यांनी त्यांची नाराजी जाहीर केलेली नाही, एवढेच! विखेंच्या साखर वाटपाचा विरोधकांनी कायही अर्थ घेऊ द्यात. परंतु यात विखेंची पुढची रणनीती ठरलेली आहे. 'सायलेंट व्होटर' तयार करण्याची ही रणनीती आहे. प्रत्यक्ष दिसणारे कार्यक्रम हाती घ्यायचे आणि त्यातून अपेक्षित असलेला 'सायलेंट व्होटर' उभा करून घ्यायचा, हे या साखर पेरणीचे गणित आहे.

अपेक्षित सायलेंट व्होटर तयार

आगामी काळात लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका आहे. ही साखर पेरणी पुढचे बरेच कडू गणिते सोपी करणार आहे, हे विखे जाणून आहेत. त्यामुळे ही साखर विरोधकांना कितीही कडू लागली तरी, विखे ती अपेक्षित सायलेंट व्होटर तयार करण्यासाठी पुढील वर्षभर कोणत्या-कोणत्या कारणातून पेरतच राहणार आहेत.

विखे-थोरातांची ही साखर पेरणी केंद्रातील भाजप सरकारच्या महागड्या हरभरा डाळीवर भारी पडली आहे. एकंदर काय, तर विखेंची ही साखर वाटणी विरोधकांना फारच कडू लागली आहे. ही कडू साखर पुढे बरच राजकारण वाढणार असेच सध्या चित्र आहे. परंतु विखेंना सत्ते असो किंवा नसो, संघर्ष काही जुना नाही. कारण, संघर्षाशिवाय त्यांचे यशस्वी राजकारण नाही, हेदेखील येथे नमूद होते.

भाव मिळत नसलेल्या उसाची साखर मोफत

राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय संघर्षांतून साखर पेरणीची गोड अनुभूती नगर जिल्हा सध्या, तरी घेत आहे. राहाता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात तब्बल 15 किलो मोफत साखर प्रत्येक कुटुंबाला वाटली जाणार आहे. या विखेंची पाच किलो साखर शिर्डीतील एक लाखांपेक्षा जास्त कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे, तर गणेश साखर कारखान्याची 10 किलो साखर नऊ हजारांवर सभासदांना मिळणार आहे. या साखर वाटपावर जवळपास साडेतीन ते चार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे.

उसाच्या भावाचे काय...

सहकारातील हे नेते मोफत साखर वाटप करत आहेत, ही सर्वसामान्यांसाठी चांगली बाब असली, तरी ऊस उत्पादक शेतकाऱ्यांच्या उसाच्या भावाचे काय, हा प्रश्न चर्चेत आहे. नेवासे येथे नगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आठ नोव्हेंबरला ऊस परिषद झाली. यात उसाच्या भावावर चर्चा आणि त्यासाठी संघर्षाचा निर्धार करण्यात आला. प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळण्यासाठी शेतकरी संघटना संघर्षाच्या तयारीत आहे. ज्या उसापासून साखर निर्मिती होते, ती साखर कारखानदारांकडून मोफत वाटली जात आहे. आणि त्याच उसाच्या भावासाठी संघर्ष शेतकरी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT