Political News: मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर शुक्रवारी झाले. यामध्ये राष्ट्रवादीला (अजित पवार गट) अर्थ, कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा आणि महिला व बालकल्याण यासह आदी वजनदार खाते मिळाले. तर शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले.
पण मंत्रिपदाच्या आशेने घोड्यावर बसलेले शिवसेनेचे (शिंदे गट) भरत गोगावले, संजय शिरसाट, आणि मंत्रिपदाची आशा सोडल्याचे जाहीर करणाऱ्या बच्चू कडू यांना आता मंत्रिपदासाठी पुन्हा राज भवनाकडे डोळे लावून बसावे लागणार आहे.
राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने खाते वाटप झाले असले तरी गेल्या एक वर्षापासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिवसेनेच्या (शिंदे गट) काही आमदारांचे अनेक दिवसांपासून लक्ष लागले आहे. आपल्याला मंत्रिपद मिळावं, यासाठी आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांनी अनेकदा जाहीर इच्छा बोलून दाखवली. यापुढेही ते बोलतच राहतील.
आमदार भरत गोगावले यांनी आपण 100 टक्के नाही तर 101 टक्का मंत्री होणार आणि रायगडचा पालकमंत्रीही आपणच होणार, असे दंडच थोपटले होते. तसेच उद्याच आपण मंत्री होणार, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला होता. पण आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी लागणार? की गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराचं भिजतं घोंगडं तसंच कायम राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेतील काही आमदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिपदाची आशा लागलेले भरत गोगावले, संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांचे डोळे राज भवनाकडे लागले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.