Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

भाजप-शिवसेनाच ओढतीय राष्ट्रवादीचे पाय ; सांगलीत प्रवेशाचा मार्गावर असलेला दुसरा नेता पळवला

BJP, Shivsena vs Ajit Pawar NCP : आगामी स्थानिक ही फक्त चाचणी परीक्षा असून खरी परीक्षा 2029 ची विधानसभा आहे. महायुतीती तिन्ही पक्ष आप आपल्या पक्षाची बांधणी त्याच पार्श्वभूमिवर करताना दिसत आहेत.

Aslam Shanedivan

थोडक्यात सारांश :

  1. सांगली जिल्ह्यात निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट मजबूत होत असताना, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे त्यांच्या वाढीस अडथळा आणत असल्याचे चित्र आहे.

  2. महापालिकेत राष्ट्रवादीत येण्याची शक्यता असताना जयश्रीताईंना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये खेचले, तर आता वनखंडेही अजितदादांच्या पक्षात येण्याच्या तयारीत असताना त्यांचे पाय शिवसेनेकडे वळले.

  3. या घटनांमुळे अशी शंका उपस्थित केली जात आहे की, अजितदादांची ताकद वाढू नये म्हणून महायुतीतील जिल्ह्यातील नेतेच अप्रत्यक्षपणे काम करत आहेत.

Sangli News : अजित पवार यांचा पक्ष सांगलीत निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात मजबूत होत असतानाच भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांचा पाय ओढताना दिसत आहे. महायुतीतच कुरघोडी पाहायला मिळत असून अजित पवार यांचे हात मजबूत होत असतानाच दुसऱ्यांदा प्रवेश न झाल्याचे समोर आले आहे. याआधी जयश्रीताई राष्ट्रवादीत जाणार त्यांचा दबदबा महापालिकेत वाढणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समित कदम यांच्याकडून सुत्रे हलवली आणि जयश्रीताई भाजपवाशी झाल्या. आताही असेच झाले असून वनखंडेही राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत होते, पण त्यांचेही पाय शिवसेनेकडे वळाले. त्यामुळे आता अजितदादांची ताकद वाढू नये म्हणून महायुतीचे जिल्ह्यातील नेते काम करतायत की काय अशी शंका उपस्थित केली जातेय.

जयश्रीताई पाटील भाजपवाशी

सांगली जिल्ह्यातील महत्वाचे आणि मोठं राजकीय घराणं हे वसंतदादा पाटील घराणं आहे. ते खेचण्यासाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चढाओढ असल्याचे दिसून आले होते. एकीकडे अजित पवार यांच्याशी जयश्री पाटील यांचे बोलणं नवनियुक्त जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक यांनी करून दिलं होतं. त्या प्रमाणे त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी दाट शक्यता निर्माण झाली होती. पण ऐन वेळी माशी शिंकली आणि त्या भाजपवाशी झाल्या.

जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटलांना भाजपमध्ये आणण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुड लिस्टमध्ये असणारे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे नेते शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांना सुत्रे हालवण्याच्या सुचना दिल्या. आणि वसंतदादा घराणे काँग्रेससोडून अन्य पक्षात जाणार नाही या अटकळींनाही खो बसला.

या प्रवेशामुळे सांगलीत भाजपचे राजकीय गणितं बदलली आहेत. यामुळे आगामी स्थानिकसाठी भाजपची वाटचाल स्वबळाकडे होताना दिसत आहे. महापालिका क्षेत्रात मदन पाटील गटाची ताकद असून सांगली, मिरज आणि कुपवाड क्षेत्रात गटाला मानणारे कार्यकर्ते आहेत. येथे सतत महापालिका राजकारणात मदन पाटील गटाचा वरचष्मा राहिला आहे.

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे

अजित पवार यांचे हात मजबूत होताना दुसऱ्यांदा महायुतीतील मित्र पक्षांनी कुरघोडी केली आहे. याआधी भाजपने जयश्री पाटील यांना आपल्या खेचले. तर आता एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेनं देखील भाजपची चाल चालली. राष्ट्रवादीत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे यांचा प्रवेश शिवसेनेत झाला आहे. वनखंडे यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेत काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. तसेच राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत प्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. यामुळे जयश्री पाटील नाही तर जिल्ह्यातला मोठा राष्ट्रवादीत येईल असे बोलले जात होते. पण आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोहन वनखंडे हे विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये आले होते. ते आमदार सुरेश खाडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख निर्माण झाली होती. मात्र, भाजपमधील अंतर्गत कुरघोड्यांमुळे ते नाराज होते. यामुळेच त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसचा हात धरला होता. त्यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.

मात्र अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी काँग्रेसला देखील सोडचिठ्ठी दिली असून राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चांना फुल्ल स्टॉप देत शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी आमदार सुहास बाबर, चंद्रहार पाटील यांनी जोर लावला. तर अन्य पक्षात वनखंडे यांची घुसमट झाली असा प्रकार शिवसेनेत होणार नाही. पक्ष संघटना पातळीवर चांगली संधी दिली जाईल, असा शब्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

अशा प्रकारे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असो किंवा उद्योगमंत्री उदय सामंत असो यांनी महत्वाच्या दोन नेत्यांचे प्रवेश घडवून आणले आहेत. आधी जयश्री पाटील आणि आत्ता मोहन वनखंडे यांच्या रूपाने राष्ट्रवादीचे हात मजबूत होणार होते. पण महायुतीतील भाजप असो किंवा शिवसेना यांनी राष्ट्रवादीचे पाय खेचल्याचेच दिसत आहे.

1. अजित पवार यांची सांगलीत स्थिती काय आहे?
निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात त्यांची ताकद वाढत असली तरी भाजप आणि शिंदे गट त्यांचं वर्चस्व रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

2. जयश्रीताई आणि वनखंडे राष्ट्रवादीत का गेले नाहीत?
राजकीय हस्तक्षेपामुळे आणि भाजप-शिवसेनेच्या रणनीतीमुळे त्यांचा कल राष्ट्रवादीऐवजी भाजप व शिंदे सेनेकडे वळला.

3. हे सगळं महायुतीच्या अंतर्गत संघर्षाचं लक्षण आहे का?
होय, जिल्हास्तरावर महायुतीतील पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाला आघाडीवर येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT