Siddheshwar Sugar Factory  Sarkarnama
विश्लेषण

Siddheshwar Sugar Factory : ‘सिद्धेश्वर’च्या चिमणीबरोबरच भाजपच्या व्होट बँकेला सुरुंग..? ‘प्लॅन बी’कडे लक्ष

भारतीय जनता पक्षाचा एक खासदार आणि चार आमदारांवर थेट तर एका आमदारावर अप्रत्यक्षपणे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अभय दिवाणजी

Solapur News : सोलापूर विमानतळावरुन विमान उड्डाणास अडथळा ठरणाऱ्या सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवर अखेर महापालिका प्रशासनाने हातोडा चालविण्यास सुरवात केली. यामुळे आर्थिक, सामाजिकबरोबरच राजकीय परिणामांनाही सामोरे जावे लागणार आहे. भारतीय जनता पक्षाचा (BJP) एक खासदार आणि चार आमदारांवर थेट तर एका आमदारावर अप्रत्यक्षपणे परिणाम होण्याची म्हणजे व्होट बँकेलाच सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Along with Siddheshwar's Chimney, a blow to BJP's vote bank?)

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकाचेही कार्यक्षेत्र, २८ हजारांवर सभासद, दोन हजारांवर कामगार, पाच हजारांवर अप्रत्यक्ष रोजीरोटी असलेल्या सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या (Siddheshwar Sugar Factory) विस्तारीकरणानंतर वीजनिर्मितीची चिमणी उभी केली. या चिमणीलाच कारखान्याने मुख्य चिमणीचे रुप दिले, त्यातून गाळप क्षमताही वाढविली. विमान उड्डाणाच्या फनेल परिघात उभी केलेली ही ९२ मीटरची चिमणी महापालिकेने बेकायदेशीर ठरवली. तर विमान विकास प्राधीकरणानेही त्याच्या उंचीला हरकत घेतली होती. यासाठी सर्वौच्च न्यायालयापर्यंतचे उंबरे अक्षरशः झिजवावे लागले.

गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन, प्रशासकीय प्रक्रियेनंतर महापालिकेने २७ एप्रिल २०२३ रोजी कारखान्यास नोटीस बजावून ४५ दिवसांची मुदत दिली. या मुदतीत कारखान्याने स्वतःहून चिमणी पाडून घ्यावी; अन्यथा महापालिका ती पाडेल, अशी तंबी दिली होती. ११ जूनपर्यंत वाट पाहून अखेर महापालिकेने मागील अनुभव जमेस धरता योग्य नियोजन करत प्रचंड गोपनियता पाळत बुधवारी (ता. १४ जून) या चिमणीवर पहिला हातोडा मारला. तब्बल एक किलोमीटर अंतरापर्यंत प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवून प्रशासनाने आंदोलनाच्या धगीची हवाच काढून टाकली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ म्हणजेच अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, शहर मध्य, मोहोळ व पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघावर प्रचंड प्रभाव असणाऱ्या सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी पाडकामातून राजकीय प्रभावाचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. या कारखान्यावर एक अपवाद वगळता काडादी घराण्याचे कायम वर्चस्व आहे. चौथ्या पिढीच्या हातात कारखान्याची सूत्रे आहेत.

अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर व पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे, तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदारही भाजपचे आहेत. अक्कलकोट, शहर उत्तर व दक्षिण सोलापूर मतदारसंघात काडादी समर्थक समाजाचे मोठे प्राबल्य आहे. मंगळवेढ्यातील सीमावर्ती भागातही हा समाज प्रभाव टाकणारा आहे. शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभेवरही भाजपचेच वर्चस्व आहे. या मतदारसंघातही कारखान्याचे सभासद मोठ्या प्रमाणावर आहेत. तेथेही आगामी निवडणुकीत प्रभाव पडला नाही तर नवलच!

सिद्धेश्‍वर कारखाना उभा करताना अथवा चालवताना एकतर तो सर्व जाती-धर्माचा असला तरी स्वार्थापोटी काही हितचिंतकांनी त्याला जातीयवादाचे स्वरुप दिले. आता आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर त्याचा निश्‍चितच प्रभाव पडण्यासाठी याचे मोठे भांडवल केले जाईल, यात शंका नाही.

अन्ये अडथळेही हटविण्याची गरज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रचंड संवेदनशील अशा चिमणी पाडकामाबाबत केलेले वक्तव्य पाहता त्यांच्या ‘व्होट बँके‘वर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना ‘बी प्लॅन' तयार ठेवावा लागेल. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी या बेकायदेशिर चिमणीची पाठराखण केली होती. सोलापूरच्या विकासासाठी व उडाण योजनेचा फायदा घेण्यासाठी विमानाची सोय आवश्‍यकच आहे. तसेच, फक्त चिमणी पाडून विमानसेवा तातडीने सुरु होईल, असेही चित्र नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अन्य अडथळ्यांनाही या भागातून हटविण्याची गरज आहे. सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी व विमानतळ असे सोलापुरात सरळसरळ दोन गट पडले आहेत. माध्यमांमध्ये याबाबत कोणत्याही घटनेचे वृत्त आले की, ते वृत्तपत्र अथवा तो बातमीदार त्या संबंधितांचा पाठीराखा असल्याबाबतच्या पोस्ट समाज माध्यमांतून व्हायरल होऊ लागल्या होत्या.

नव्या व्होट बँकेकडे लक्ष

लोकसभा २०२४ डोळ्यासमोर ठेवून सोलापूरच्या राजकारणात बीआरएसने चाचपणी सुरू केली आहे. चिमणी समर्थकांच्या बरोबरीने असलेल्या तेलुगु भाषिकांची व्होट बँक डॅमेज करण्यासाठी बीआरएस फॅक्टर महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपसाठी पूरक ठरलेला वंचित फॅक्टर यंदा काय करणार? यावर देखील सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या व्होट बँकेचे महत्व व अस्तित्व अवलंबून राहण्याची शक्यता आहे. सोलापूर जिंकण्यासाठी भाजप काय बी प्लॅन करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT