Mumbai News : मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाने रणशिंग फुंकले आहे. त्यातच अमित साटम यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी झालेली नियुक्ती हा भाजपचा मोठा मास्टरस्ट्रोक ठरू शकतो. साटम यांच्याकडे भाजपने अध्यक्षपद सोपवत अनेक पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. साटम हे मराठा आहेत. एवढेच नव्हे, तर आपल्या सुरुवातीच्या काळात ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे खासगी सहाय्यक (PA) होते. मुंबई अध्यक्षपदासाठी आता नव्या चेहऱ्यास संधी देत भाजपने ठाकरे बंधूंच्या ‘मराठी अस्मिता’ मुद्द्याला प्रभावीपणे उत्तर दिले आहे. आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकरांना ओव्हरटेक करीत सीएम देवेंद्र फडणवीसच्या गुडबुकमधील नेत्याला दिलेली संधी 'ही' येत्या काळात यशस्वी ठरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या 25 वर्षांपासून एकसंध शिवसेनेचे (Shivsena) मुंबई महापालिकेवर वर्चस्व राहिले आहे. मात्र, तीन वर्षापूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक जिंकायचे मिशन भाजपकडून गेल्या दोन वर्षांपासून राबवले जात आहे. त्यासाठी भाजपकडून मुंबईवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी भाजपने नवी रणनीती आखली आहे. त्याच अनुषंगाने भाजपने मुंबईत भाकरी फिरवली आहे.
राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपने संघटनात्मक निवडणुकीवर भर दिला आहे. राज्यात 'संघटन पर्व' मोहीम राबवण्यात आली. ज्यामुळे पक्षाचे गटस्तरावरील बळ वाढले आहे. महाराष्ट्र राज्याला दीड कोटी नव्या सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले होते. हे टार्गेट पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर बूथ कमिटी, मंडलअध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा निवडी आतापर्यंत पार पडल्या. दुसरीकडे मुंबई अध्यक्षपदासाठी नावाची घोषणा सोमवारी करण्यात आली.
आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची मानली जाणारी मुंबई भाजपच्या (BJP) अध्यक्षपदाची निवड करण्यास उशीर लागला. नऊ महिन्यापूर्वी आशिष शेलार यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे, त्यांच्या जागी नवीन अध्यक्षाची शोध घेतला जात होता. त्यासाठी भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक बैठका देखील पार पडल्या. या बैठकीत आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम व अतुल भातखळकर या तीन नावांवर चर्चा झाली होती.
या पदासाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे नाव देखील चर्चेत आहे. दरेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात असल्याने त्यांचे नाव आघाडीवर होते. मुंबईच्या राजकारणातील त्यांचा अनुभव आणि आक्रमक भूमिका लक्षात घेता, अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, मधल्या काळात भाजपच्या माध्यमातून त्यांनी अनेक सहकारी संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रावर मजबूत पकड त्यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे ऐनवेळी शर्यतीत त्यांचे नाव पिछाडीवार पडले.
2017 च्या महापालिका निवडणुकीत मुंबईचे अध्यक्षपद सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे होते. त्यावेळी भाजपने दमदार कामगिरी केली होती. त्यावेळी मुंबई महापालिकेत भाजपने त्यावेळी एकसंध शिवसनेच्या बरोबरीने काम केले होते. शिवसनेच्या तुलनेत त्यावेळी दोन नगरसेवक कमी निवडून आले होते. त्यानंतर 2019 व 20124 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजप पक्ष एक नंबरवर ठेवण्यात आशिष शेलार यांचे योगदान मोठे होते. त्यामुळे भाजपमध्ये शेलार यांच्याकडे या निवडणुकीत देखील अध्यक्षपद ठेवावे, असा एक मतप्रवाह होता. विशेष म्हणजे शेलार हे अमित शाह यांच्या निकटचे मानले जात असल्याने शेलार या पदावर कायम राहतील, असे वाटत असतानाच भाजपने त्यांच्याकडील पदभार आक्रमक चेहरा असलेल्या अमित साटम यांच्याकडे सोपवला आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने मुंबईचे नेतृत्व नव्या चेहऱ्याकडे सोपवले आहे. एक टर्म नगरसेवक व तीन टर्म आमदार असलेल्या तळागळातून आलेल्या अमित साटम या आक्रमक कार्यकर्त्याकडे मुंबई भाजपचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. साटम यांनी संघटनेत काम करीत असताना त्यांनी युवा मोर्चापासून काम केले आहे. एक टर्म नगरसेवक व तीन टर्म आमदार असे तळागळापासून काम केलेला नागरी चेहरा अशी साटम यांची ओळख असल्याने त्यांच्याकडे मुंबई भाजपचे नेतृत्व देण्यात आले आहे.
साटम यांनी काही काळ टाटा टेलिकॉम सर्व्हिसेसमध्ये एचआर म्हणून कार्यरत होते. काही वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात राहिल्यानंतर जेव्हा साटम राजकारणात आले, तेव्हा त्यांनी श्रीश्री रविशंकर यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर ते बीएमसीचे नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे २०१४ मध्ये ते प्रथमच आमदार झाले. त्यानंतर 2019 व 2024 च्या विधानसभा निवडुकीत ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
भाजप हायकमांडने सध्याच्या परिस्थितीत साटम यांची निवड करीत मोठा डाव टाकला आहे. फडणवीसांची ही खेळी मास्टरस्ट्रोक ठरणार आहे. प्रवीण दरेकरही शर्यतीत होते, पण ते मनसेतून भाजपमध्ये आलेले असल्याने कदाचित त्यांच्या नावावर वरिष्ठ पातळीवर एकमत झाले नसावे. साटम मात्र अतिशय सक्रिय आमदार राहिले आहेत. ते मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहेत. पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.