K. Annamalai - Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

Tamil nadu Politics : अण्णामलाईंनी करून दाखवलंय, आता भाजपची वेळ!

K. Annamalai - Narendra Modi : 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा जनाधार वाढल्याचे चित्र दिसून आले. या निवडणुकीत भाजपला तब्बल 11 टक्के मते मिळाली होती. याचे शिल्पकार म्हणून के. अण्णामलाई यांच्याकडे पाहिलं जातं.

सरकारनामा ब्युरो

देशातील बहुतांश भागामध्ये ठळक अस्तित्व निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कर्नाटक वगळता दाक्षिणात्य राज्यांमध्ये अपेक्षित जनाधार मिळवता आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकत राजकीय खेळपट्टीवर स्वत:चे वर्चस्व सिद्ध केलं असलं, तरीही तामिळनाडूसारख्या राज्यात भाजपला अजूनही महत्त्वाचं स्थान मिळालेलं नाही. गेली अनेक वर्षे तमिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी हिंदीविरोधी आणि द्रविडी अस्मितेचं राजकारण केलं आणि यात भाजपला फारशी संधी मिळालेली नाही.

तरीही 2021 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक भाजपसाठी तुलनेनं चांगली ठरली होती. त्या निवडणुकीत भाजपनं एआयएडीएमके आणि पीएमके या दोन पक्षांशी युती केली होती. विधानसभा निवडणुकीत या युतीला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही भाजपच्या चार जागा निवडून आल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तमिळनाडूमध्ये तीन टक्के मते मिळाली होती. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा जनाधार वाढल्याचे चित्र दिसून आले. या निवडणुकीत भाजपला तब्बल 11 टक्के मते मिळाली होती. याचे शिल्पकार म्हणून के. अण्णामलाई यांच्याकडे पाहिलं जातं. याच अवघ्या 39 वर्षांच्या के. अण्णामलाई यांनी आता राष्ट्रीय राजकारणाच्या चर्चेत स्थान मिळवलं आहे.

तमिळनाडूमध्ये भाजपचा पाया भक्कम करण्याची जबाबदारी अण्णामलाई यांच्यावर सोपवण्यात आली होती. अण्णामलाई यांनीही आक्रमक भूमिका घेत आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून भूमिका घेण्यास सुरुवात केली. माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अण्णामलाई यांनी रस्त्यापासून बौद्धिक व्यासपीठांपर्यंत सर्वत्र ठाम भूमिका मांडत भाजपला तमिळनाडूत 'व्हिजिबिलिटी' मिळवून दिली.

पण तमिळनाडूमध्ये सत्तेपर्यंत पोचण्यासाठी भाजपला एवढंच पुरेसं नाही, हे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाला उमगलं. याचमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्टॅलिन यांना ठाम पर्याय उभा करण्यासाठी भाजपला आणखी काही पर्यायांचा विचार करणं भाग होतं. त्यातला एक भाग म्हणजे गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही एआयएडीएमकेशी युती करणं. पण अण्णामलाई यांनी सातत्याने याविरोधात भूमिका घेतली होती. त्यांच्या मते तमिळनाडूमध्ये भाजपनं स्वबळावर लढणंच प्रगतीसाठी हितकारक आहे.

स्वबळावर लढण्याचा अण्णामलाई यांचा निर्धार कितीही कौतुकास्पद असला, तरीही भाजपसाठी पुढील 10 ते 15 वर्षांत त्याचा लक्षणीय फायदा झाला नसता. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी युती करणं, हा भाजपसमोरील सध्याचा एकमेव पर्याय आहे. यामुळेच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वानं अण्णामलाई यांच्याबद्दल वेगळा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णामलाई यांनी तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षपदाची आणखी एक टर्म करण्यात रस नसल्याचं जाहीर केल्यामुळे भाजपमध्ये नेमकं काय चाललं आहे, अशी चर्चा सुरु झाली. अण्णामलाई यांच्याऐवजी एन. नागेंद्रन यांना संधी देण्यात आली आहे. या पावलामुळे आता तमिळनाडूत भाजप आणि एआयएडीएमके यांची युती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डीएमकेचं विखारी राजकारण :

स्टॅलिन यांच्या डीएमकेनं गेल्या काही महिन्यांत सतत केंद्र सरकारशी संघर्ष करण्याचीच भूमिका घेतली आहे. नवी राष्ट्रीय शैक्षणिक योजना देशभरात लागू होत असली तरीही त्रिभाषा सूत्राच्या मुद्यावर याच्या अंमलबजावणीस स्टॅलिन यांनी नकार दिला आहे. तसंच देशानं स्वीकारलेल्या रुपयाच्या चिन्हालाही बदलण्याचा प्रकार तमिळनाडूनं केला. याशिवाय आता लोकसभेसाठी मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया सुरु होणार आहे. यालाही स्टॅलिन यांनी विरोध करत या मुद्याला दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असे संघर्षाचे रुप देण्याचा प्रयत्न केला.

अण्णामलाई यांचा पक्षासाठी त्याग :

स्वबळाची भाषा करणाऱ्या अण्णामलाई यांनी पक्षाची भूमिका मांडत डीएमकेवर हल्ला केला होता, तितकीच तिखट टीका एआयएडीएमकेवरही केली होती. यामुळे भाजप-एआयआडीएमके यांच्या युतीमध्ये सर्वांत मोठी अडचण अण्णामलाई यांचीच होती, हे उघड आहे. पण पक्षाची गरज आणि राज्यातील पक्षाचे भवितव्य यांचा विचार करत अण्णामलाई यांनी पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.

यातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे एआयएडीएमकेचे नेते पलानीस्वामी आणि अण्णामलाई या दोघांचीही जात एकच आहे. तमिळनाडूतील राजकारणात जात हा एक मुख्य घटक आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य नाही.

डीएमकेचा पराभव करायचा असेल तर एआयएडीएमकेची साथ भाजपसाठी महत्त्वाची आहे; पण "आमची साथ हवी असेल तर अण्णामलाई नको" अशी भूमिका एआयएडीएमकेनं घेतली. यामुळे भाजपची तिथे कोंडी झाली होती. पक्षाच्या हितासाठी तमिळनाडूत सत्ता स्थापन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एआयएडीएमकेची साथ महत्त्वाची आहे, हे अण्णामलाई यांनी ओळखलं.

यापुढे अण्णामलाई यांचा वापर राष्ट्रीय पातळीवर करण्याचा भाजपचा मानस असल्याचे सध्या दिसून येत आहे. कदाचित येत्या काळात अण्णामलाई यांच्याकडे पक्षाचे उपाध्यक्षपद किंवा सचिवपदही सोपवण्यात येऊ शकतं. अर्थात याची अधिकृत घोषणा होईपर्यंत अण्णामलाई यांना भाजपसाठी दाक्षिणात्य राज्यांमध्येच अधिक महत्त्वाची भूमिका दिली जाईल व त्यांच्यासाठी पहिली चाचणी केरळमधील विधानसभा निवडणूक असू शकते. अण्णामलाई यांच्याबद्दल असलेल्या उत्सुकतेचा आणि त्यांच्या धडाडीचा वापर भाजप कसा करून घेणार, याची उत्सुकता राजकीय विश्लेषकांमध्ये यापुढील काळात असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT