
Bihar Politics : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदावरून भाजपप्रणित एनडीएमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पद भाजपच्या अनेक नेत्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यांच्या विधानांमधून ते सातत्याने समोर आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी नुकतेच त्यावर मीठ चोळले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांची जोडी राम-लक्ष्मणाची असल्याचे सागंत चौबे यांनी नितीश कुमारांसाठी मुख्यमंत्रिपद आता काही मोठे पद राहिले नाही, असे विधान केले आहे. तसेच आता बिहारची इच्छा आहे की त्यांनी एनडीएचे संयोजक बनावे. त्यांना उपपंतप्रधान पदाचा दर्जा मिळाल्यास बिहारसाठी ही गर्वाची बाब असेल, असेही चौबे म्हणाले आहेत.
चौबे यांच्याआधीही भाजपच्या अनेक नेत्यांनी नितीश कुमारांनी आता मुख्यमंत्रिपदाची इच्छा सोडून द्यावी, आता भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवी, अशी विधाने केली आहेत. त्यावरून संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये वादाची ठिणगीही पडली आहे. भाजप नेतृत्वाकडूनही मोदी आणि नितीश कुमार या दोघांचा चेहरा पुढे करून निवडणूक लढण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
नितीश कुमार यांना भाजपने आरसा दाखवला आहे. त्यामुळे त्यांना आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सल्ला घ्यायला हरकत नाही. राज्यात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर शिंदेना अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपद मिळाले. त्यांनी जीव तोडून कामही केले. पण निवडणुकीदरम्यान तेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे महायुतीने एकदाही जाहीर केले नव्हते. त्यामुळे जी भीती होती तेच घडले.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाणार, अशी चर्चा सुरू झाली. याचे कारण म्हणजे भाजपला मिळालेले घवघवीत यश. शिंदे सीएम चे डीसीएम झाले म्हणण्यापेक्षा त्यांना नाइलाजास्तव व्हावे लागले. ते हे पद स्वीकारायलाही तयार नव्हते. पण शिवसेनेतील नेत्यांच्या दबावामुळे त्यांनी हे पद घेतल्याचे त्यांच्याच नेत्यांकडून त्यावेळी सांगितले गेले. आता शिंदेंप्रमाणेच नितीश कुमारांच्या मुख्यमंत्रिपदालाही ग्रहण लागण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार हे जवळपास 20 वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. पण त्यानंतरही त्यांना पुन्हा या खुर्चीवर बसायचे आहे. पण आता भाजप त्यांच्यासमोरील अडसर ठरणार हे निश्चित आहे. तसे संकेतही नेत्यांकडून दिले जात आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना नितीश कुमारांना उपपंतप्रधानपद दिले जाईल, याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे उपपंतप्रधान पदाचा उल्लेख करत भाजप नेते उपमुख्यमंत्रिपदाकडे तर बोट दाखवत नाहीत ना, अशी शंका घ्यायलाही वाव आहे.
मुख्यमंत्रिपद अनेक वर्षे भोगलेल्या नितीश कुमारांना डिमोशन सहन होणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा आल्यास ते काय भूमिका घेणार, हे एनडीएसाठी आणि त्यांच्या राजकीय भवितव्यासाठीही खूप महत्वाचे ठरणार आहे. बिहारमध्ये सद्यस्थितीत भाजपचे आमदार नितीश कुमारांपेक्षा जास्त आहेत. आगामी निवडणुकीतही अशीच स्थिती राहिल्यास किंवा भाजपच्या जागा वाढल्यास नितीश कुमारांना भाजपकडून नैतिकतेची आठवण करून दिली जाऊ शकते.
जेमतेम 40 आमदार असताना पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या नितीश कुमारांनाही निवडणुकीत आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. भाजपच्या तोडीस तोड आमदार निवडून आणावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. पण भाजप त्यांना यामध्ये कितपत साथ देणार, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. बिहारची निवडणूक केवळ राज्यातील एनडीएचे भवितव्य ठरवणार नाही तर केंद्रातील सरकारवरही त्याचा परिणामकारक ठरणारी आहे. नितीश कुमार यांचे राजकारणही भरवश्याचे नाही. ते कधी पलटी मारतील, याची भाजपला अजूनही खात्री नाही. त्यामुळे नितीश कुमारांशी तडजोड करताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पावले सावध टाकावी लागणार, हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.