Delhi Political News : खासदार असदुद्दीन औवेसी यांचा एमआयएम पक्ष देशभरात विविध निवडणुका लढवत असतो. गृहराज्य तेलंगणात विधानसभेच्या निवडक जागा लढवणारा हा पक्ष अन्य राज्यांत मात्र अनेक जागांवर लढत असतो. हा पक्ष कुणाच्या तरी इशाऱ्यावर धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतो, असा आरोप होऊ लागला तसा मतदारांचा भ्रमनिरास झाला. पक्षाची क्रेझ अन्य राज्यांतील मुस्लिम मतदारांतून संपुष्टात येऊ लागली. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीतही याची प्रचीती आली होती.
दिल्ली महापालिकेची निवडणूक चार डिसेंबर 2022 रोजी झाली होती. त्या निवडणुकीत एमआयएमने 15 उमेदवार रिंगणात उतरवले होते. खासदार इम्तियाझ जलील यांच्यावर ओवैसी यांनी मोठी जबाबदारी सोपवत त्यांच्या हाती प्रचाराची धुरा सोपवली होती. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत खासदार ओवैसी यांनीही अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
निकाल लागल्यानंतर एमआयएमचा मोठा भ्रमनिरास झाला होता. त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नव्हता. त्यांच्या सर्व 15 उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. मतदारांनी एमआयएमला स्पष्टपणे झिडकारले होते.
एमआयएमने अन्य राज्यांत पाय ठेवले त्यावेळी मुस्लिम मतदार त्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले होते. हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली. एमआयएमचा अन्य राज्यांतील मुस्लिम मतदारांचा आधार निसटू लागला. एमआयएम भाजपसाठी पूरक भूमिका घेत निवडणूक लढवतो, अशी धारणा मुस्लिम मतदारांमध्ये बळावत गेली आणि त्याचा फटका बसला.
एमआयएमने (AIMIM) महाराष्ट्रात पाय ठेवला आणि मोठे यश त्यांच्या पदरात पडले. त्यांचे दोन आमदार निवडून आले. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इम्तियाझ जलील विजयी झाले. छत्रपती संभाजीनगर महापालिका, नांदेड महापालिकेत त्यांचे अनेक नगरसेवक विजयी झाले. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमच्या उमेदवाराने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना कडवी झुंज दिली होती.
सर्वंच निवडणुकांध्ये एमआयएमच्या उमेदवारांचा फटका काँग्रेसला बसू लागला आणि त्याचा फायदा भाजपला होऊ लागला. उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतही असेच झाले. हळूहळू मुस्लिम मतदारांच्या लक्षात यायला लागले. शिवाय हैदराबादेत मोठे साम्राज्य असूनही ओवैसी यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडलेली नाही. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला उमेदवार मिळणेही कठीण झाले होते. एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार ओवैसी आणि त्यांचे लहान बंधू अकबरुद्दीन ओवैसे हे दोघेही मतांच्या ध्रुवीकरणाचे काम करतात. खासदार ओवैसी हे काम सभ्यपणाने तर अकबरुद्दीन हे काम चिथावणीखोर, प्रक्षोभक पद्धतीने करतात. यामुळे हिंदू-मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होते आणि त्याचा फायदा भाजपला होतो, नुकसान काँग्रसचे होते.
ओवैसी बंधुंमुळे मुस्लिमांमधील कट्टरता वाढीस लागायला मदत होते. यामुळे समाजाचे नुकसानच होते. मुस्लिम मुख्य प्रवाहात येत नाही, अशा एका गटाचा आरोप यामुळे खरा वाटू लागतो. हळूहळू का होईना मुस्लिमांच्या हे लक्षात यायला लागले आहे. त्यामुळे अन्य राज्यांतील मुस्लिम आता एमआयएमपासून फटकून राहू लागले आहेत.
तेलंगणात त्यांचा एक खासदार आणि 7-8 आमदार विजयी होत असतात. एमआयएम आणि ओवेसी यांचे खरे रूप तेथील मतदारांच्याही लक्षात आले आहे, मात्र संरक्षण म्हणून ते त्यांना मते देत असतात. इतर राज्यांच मात्र आता त्यांची डाळ शिजणे अवघड झाले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.