Babanrao & Prataprao Dhakne Sarkarnama
विश्लेषण

Babanrao Dhakne News : ढाकणे पिता-पुत्रांचा भावनिक प्रसंग; पित्याने केलेल्या कौतुकाने ढसाढसा रडले प्रतापराव...!

Vijaykumar Dudhale

प्रदीप पेंढारे

Nagar News : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनानंतर त्यांच्या जुन्या मित्रांकडून आणि पाथर्डीकरांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. बोधेगाव येथे गेल्या वर्षी झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात वडिलांनी केलेल्या कौतुकानंतर पुत्र प्रतापराव रडले होते, याच्याही आठवणी जागवल्या जात आहेत. ढाकणे पिता-पुत्रांमध्ये जाहीर कार्यक्रमामध्ये घडलेला या भावनिक प्रसंगाचे छायाचित्र सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यातून बबनरावांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. (Babanarao Dhakne's praise made Prataprao Dhakne cry on stage)

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. संघर्षमय योद्धा म्हणून ते परिचित होते. बबनराव ढाकणे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. या सर्वांचा मागोवा घेणाऱ्या 'महाराष्ट्र विधिमंडळातील बबनराव ढाकणे', या पुस्तकाचे प्रकाशन गेल्या वर्षी झाले. पुस्तक प्रकाशन सोहळा मे २०२२ मध्ये झाला. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दूरस्थ पद्धतीने या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी बबनरावांनी त्यांचे पुत्र वकील प्रतापरावांचे कौतुक केले. 'तीन वेळा प्रतापचा सलग पराभव झाला, पण हार पचवायला ताकद लागते', असे म्हणत बबनरावांनी प्रतापरावांचे कौतुक करत स्वतःच्या हाताने हार घालून सत्कार केला. बापाने भरकार्यक्रमात काढलेले हे कौतुकोद्‌गाराने प्रतापराव ढाकणे भारावून गेले अन् ढसाढसा रडले होते. या क्षणाचे हजारो नागरिक साक्षीदार राहिले आहेत.

बबनराव ढाकणे यांनी त्यावेळी भाषणात म्हटले होते की, मी अनेकांचा मित्र राहिलो. रस्त्यावर फिरत राहिलो. कुटुंबाकडे दुर्लक्ष करत राहिलो. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. सोयऱ्या धोयऱ्यांकडे गेलो नाही. त्यांचाही माझ्यावर राग आहे. मित्रांचाही आणि मुलाबाळांचा आहे. नातवांचाही राग आहे. एवढं सगळं केले. आम्ही कोण आहे. पण रात्रंदिवस रस्त्यात होतो आम्ही. आता प्रतापच्या जीवनातही संघर्ष आलाय. पण त्या संघर्षाला तो कंटाळला नाही. तीन वेळेस तो पराभूत झाला. सत्ता-बित्ता काही नाही. सत्तेचे काय असते, हे सांगितले आहे. तो तुमच्या जिवावर लढतोय. सत्तेसाठी नाही. पण, त्याने आज चांगले काम केले आहे. म्हणून त्याचा सत्कार करत आहे".

अपयश पचवणे अवघड असते. वेडा होतो माणूस. जी ताकद आहे, ती जनतेने दिली आहे. त्यामुळे सत्ता महत्त्वाची नाही. खरी सत्ता अपयश पचवण्यात आहे. लोकांच्या प्रेमामध्ये आहे. त्यामुळे नाउमेद न होता जनतेसाठी काम करत राहा, असे म्हणत बबनराव ढाकणे यांनी प्रतापराव यांचा हार घालून सत्कार केला आणि त्यांना मिठी मारली. प्रतापला मी पहिल्यांदाच जवळ घेत आहे, असेही बबनरावांनी त्यावेळी सांगितले होते.

भर व्यासपीठावर झालेल्या ढाकणे पिता-पुत्रांमधील या भावनात्मक प्रसंगांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ हे साक्षीदार राहिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT