Balasaheb Thackeray Memorial Sarkarnama
विश्लेषण

Balasaheb Thackeray Memorial : स्मारक : बाळासाहेब ठाकरेंचे अन् मराठी अस्मितेचेही!

Political Influence of Balasaheb Thackeray : ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारण करणारी शिवसेना आता कुठे आहे? मराठी माणसाची अस्मिता तर दूरच, त्याचे मुंबईतील अस्तित्वही धोक्यात आलेले असताना शिवसेना कुठे आहे?

दीपा कदम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे २३ जून २०२६ पासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. त्या वेळी त्यांच्या स्मारकाचे उद्घाटन होईल. हे केवळ ठाकरेंचे स्मारक नसेल तर महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मराठी माणसाच्या अस्मितेचा, भूमिपुत्रांच्या लढ्याचा तो इतिहास असेल. बाळासाहेबांच्या स्मृतींचे जतन करताना मराठी माणसाच्या अस्मितेचेही ते स्मारकच ठरेल. कारण भूमिपुत्राच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेली, ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारण करणारी शिवसेना आता कुठे आहे? मराठी माणसाची अस्मिता तर दूरच, त्याचे मुंबईतील अस्तित्वही धोक्यात आलेले असताना शिवसेना कुठे आहे?

मुंबईत दादर भागात बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) स्मारक उभे राहत आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. या स्मारकाच्या ट्रस्टचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना स्मारकाच्या उभ्या राहिलेल्या वास्तूचे दर्शन नुकतेच घडवले. जुन्या महापौर निवासाच्या या वारसास्थळ असलेल्या वास्तूत अन् त्याच्या आवारात हे स्मारक उभे राहिले आहे. अतिशय देखणी अशी ही वास्तू उभी राहिली आहे. समुद्रकिनाऱ्याला लागूनच असलेले महापौर निवास ‘सीआरझेड’च्या कक्षेत येते. त्यामुळे हे स्मारक उभारण्यासाठी अनेक मर्यादा होत्या. उंच स्मारक उभारता येणार नव्हते आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा धोका असल्याने जमिनीखाली हे स्मारक उभारणे आव्हान होते.

समुद्रामुळे आव्हान

वास्तुविशारद आभा लांबा यांनी भूमिगत स्मारक उभारण्याचे आव्हान पेलले. समुद्राला खेटून हे जगातले पहिले भूमिगत स्मारक असल्याचा दावा लांबा यांनी केला आहे. स्मारकाच्या नवीन तळघराच्या बांधकामाखालील एकूण क्षेत्रफळ ४० हजार चौरस फूट आहे. त्यासोबत महापौरांच्या बंगल्यातील दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळ स्मारकासाठी वापरले जाईल. दहा हजार चौरस फुटांवर प्रशासकीय ‘ब्लॉक’ आणि ‘कॅफेटेरिया’ असा बांधला आहे. समुद्रातून पाणी गळती आणि मुसळधार पावसामुळे स्मारकाच्या भूमिगत रचनेत येणाऱ्या सुरक्षिततेच्या आव्हानावर मात करण्यासाठी ‘स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग’मधील ‘डबल वॉल फ्लास्क डिझाइन’ नावाची विशेष डिझाइन वापरली गेली आहे.

दुसऱ्या टप्पा अवघड

वास्तुविशारदांनी अत्यंत देखणी वास्तू उभी करून दिली. आता दुसऱ्या टप्प्यातले काम सागरकिनारी भूमिगत वास्तू उभारण्यापेक्षाही अवघड असणार आहे. ठाकरेंचा चरित्रपट या स्मारकात साकारला जाणार आहे. त्यामध्ये त्यांची छायाचित्रे, त्यांनी काढलेली व्यंग्यचित्रे, त्यांची इतरांनी काढलेली व्यंग्यचित्रे, त्यांची ध्वनिमुद्रित भाषणं येथे ऐकता येतील. पण बाळासाहेब ठाकरे हे व्यापक व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागवून भूमिपुत्रांसाठी लढा उभा केला अन् शिवसेनेसारखी संघटना उभी केली. राजकीय सारीपाटावरचा डावही ते लीलया खेळले. शिवसेनेची कधी काँग्रेसला साथ देणारी ‘वसंतसेना’ झाली, तर कधी तिने जनतेची मुस्कटदाबी करणाऱ्या आणीबाणीचे समर्थन करत सर्वांना अचंबित केलं. दाक्षिणात्य आणि गुजरातींच्या विरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेने रोखठोक भूमिका घेतली. पण गिरणी कामगारांचा संप फोडण्यात, मुंबईतील (Mumbai) ‘कम्युनिस्ट’ गडाला खिंडार पाडणारीही बाळासाहेबांचीच शिवसेना होती.

मराठी माणूस वाऱ्यावरच

बाळासाहेबांच्या भूमिका मराठी माणसाच्या हितसंरक्षण करणाऱ्या, अस्मितांना गोंजारणाऱ्या होत्या. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजूही होती. मात्र, स्मारकात चांगल्याच स्मृतींचे चिंतन करायचे असते. त्यामुळे येथे हे टाळले जाईल. कोळी माणूस या शहराचा आद्य रहिवासी. मात्र, आता याच शहरात शाकाहारी आणि मांसाहारी भेद केले जाऊ लागले. मांसाहार करणाऱ्यांना नवीन उभ्या राहणाऱ्या टॉवरमध्ये घरे नाकारली जात आहेत. अशा वेळी कुठे आहे ती शिवसेना? मराठी तरुणांना रोजगार मिळावा यासाठी लढा उभा करणारी शिवसेना बिथरलेल्या मराठी तरुणाईच्या मागे उभी आहे का? शिपाई, कारकून आणि वडा-पावच्या गाडीव्यतिरिक्त त्यानी उंच झेप घ्यावी, दहीहंडीचे मनोरे रचून जीव धोक्यात घालण्यापेक्षा जीवाची बाजी नवउद्योगनिर्मितीसाठी लावावी हे सांगण्यासाठी कुठे आहे शिवसेना? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन मुंबईत धुणीभांडीची काम करणाऱ्या महिलांना शिवसेनेने कोणती दिशा दाखवली?

दहा-पंधरा हजारांसाठी विरारपासून चर्चगेटपर्यंत लोंबकळत प्रवास करणाऱ्या तरुणांना सन्मानाने जगण्यासाठी कोणता पर्याय शिवसेनेने उपलब्ध करुन दिले? हे सर्व शिवसेनेनेच करण्याची गरज आहे का? असा प्रश्न पडत असेल तर होय...हे शिवसेनेनेच करण्याची गरज होती. कारण मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि हक्कासाठी जन्माला आलेला तो एकमेव पक्ष आहे. मराठी माणसाला सन्मानाने जगण्यासाठी आणि शिवसेना म्हणून स्वत:ही जिवंत राहण्यासाठी शिवसेनेने हे करणं आवश्यक होतं. ‘मी पुस्तकाच्या कपाटातला माणूस नाही, मैदानातला माणूस आहे,’ असे सांगत बाळासाहेबांनी आत्मचरित्र लिहिले नाही. ते खरेही होते. कारण मैदानातली शिवसेना संपल्यानंतर काय होतं हे आताच्या शिवसेनेच्या झालेल्या शकलांवरून लक्षात येते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT