बंगळूर : प्राप्तिकर विभागाने (Income Tax) माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांच्या (B.S.Yediyurappa) स्वीय साहाय्यकावर छापे घातले होते. यामुळे येडियुरप्पा नाराज असल्याचे मानले जात होते. अखेर त्यांची नाराजी दूर करण्यात कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांना यश आले आहे. पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बोम्मई हे पक्षाचे नेतृत्व करणार का, यावर शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक आहे.
आता कर्नाटकात सिंदगी आणि हनगळ या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. येडियुरप्पांच्या नाराजीचा फटका या पोटनिवडणुकांत बसण्याचा धोका भाजपला वाटत होता. यामुळे येडियुरप्पांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर सोपवली होती. बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच मोठी परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे अतिशय प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या या पोटनिवडणुकांसाठी येडियुरप्पांचे मन वळवण्यात बोम्मई हे यशस्वी ठरले आहेत. याबाबत बोलताना बोम्मई म्हणाले की, येडियुरप्पा हे 20 ऑक्टोबरपासून हनगळमध्ये प्रचार सुरू करतील. याबाबत आधीच माझी येडियुरप्पांशी चर्चा झाली होती. मी हनगळमध्ये 17 ऑक्टोहबरपासून प्रचार सुरू करणार आहे. नंतर 20 ऑक्टोबरपासून पुढील दोन दिवस मी सिंदगीसाठी देणार आहे.
सिंदगी आणि हनगळ या पोटनिवडणुका 30 ऑक्टोबरला होत आहेत. यातील हनगळची जागा भाजपकडे तर सिंदगीची जागा धर्मनिरपेक्ष दलाकडे (जेडीएस) होती. हनगळचे आमदार सी.एम.उदासी यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. जेडीएसचे एम.सी.मानागुळी यांच्या निधनाने सिंदगीची जागा रिक्त जागा झाली आहे. आता या जागांसाठी भाजपसह काँग्रेस आणि जेडीएसने जोर लावला आहे.
मागील काही दिवसांपासून येडियुरप्पा हे भाजपला अडचणीत आणण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. भाजपने नेतृत्वाने त्यांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांना सुरवातीला मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. नंतर राज्यात हनगळ आणि सिंदगी या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी प्रभारी म्हणून विजयेंद्र यांचा समावेश करण्यात आला नव्हता. याबद्दल येडियुरप्पांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर लगेचच विजयेंद्र यांनी प्रभारी करण्यात आले होते. येडियुरप्पांच्या राज्य यात्रेलाही भाजपने विरोध केला आहे. आता येडियुरप्पांच्या पीएवर छापे पडल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.