मतचोरी अभियान: राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ‘वोट चोरी के खिलाफ, मैं राहुल गांधी के साथ’ स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून हा मुद्दा जिल्हा-तालुका पातळीवर नेण्याची तयारी आहे.
अंतर्गत संघर्ष व आव्हाने: काँग्रेसमध्ये संस्थानिक विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ते असा संघर्ष सुरू असून नेतृत्वात विसंगती, काही वरिष्ठ नेत्यांची गैरहजेरी, तसेच विधानसभेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन आढळले.
नवीन प्रवेश व युवा नेतृत्व: माजी आमदार दुर्राणी व पद्माकर वळवींचा काँग्रेसमध्ये प्रवेश, तसेच युवक काँग्रेसला शिवराज मोरे आणि एनएसयूआयला सागर साळुंखे नवे प्रदेशाध्यक्ष मिळाल्याने पक्षाला नवीन ऊर्जा मिळाली आहे.
काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील प्रमुख नेत्याने मतचोरीचा मुद्दा हातात घेतल्याने हा मुद्दा गल्लीत पोहोचविण्यासाठी, रुजविण्यासाठी प्रदेश पातळीवरील नेते सज्ज झाले आहेत. त्यातूनच ‘वोट चोरी के खिलाफ, मैं राहुल गांधी के साथ’ या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली आहे. गटबाजीत अडकलेला अन् खिळखिळा झालेला काँग्रेस पक्ष दिल्लीतील हा मुद्दा गल्लीत कसा पोहोचवणार, असा प्रश्न संघटनात्मक दुफळीतून समोर येऊ लागला आहे.
हरियाना आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर ‘ईव्हीएम’च्या विरोधात बोलणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता मतदारयादीवर बोलू लागले आहेत. वर्षाच्या आत ‘ईव्हीएम’वरून सुरू झालेला आरोपांचा प्रवास आता मतदारयादीवर येऊन ठेपला आहे. देशातील मतदारयाद्यांची २००३ नंतर घरोघरी जाऊन पडताळणी झाली नाही.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभर ही मोहीम राबविण्याचे संकेत निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. मध्य प्रदेश, हरियाना आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक काँग्रेसने अतिआत्मविश्वासामुळे हातची घालविल्याचे आता जाणवू लागले आहे. या निवडणुकांमध्ये झालेल्या चुका झाकण्यासाठी मतचोरी अभियान तर नाही ना, अशी शंका वाटते. बिहार विधानसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. हरियाना, महाराष्ट्र हातातून गेले. आता किमान बिहारबाबतीत तरी असा अनुभव येऊ नये, या निवडणुकीच्या आगोदर सत्ताधाऱ्यांवर व निवडणूक आयोगावर दबाव रहावा म्हणूनही या अभियानाची कल्पना काँग्रेसला सुचल्याचे समजते.
जिल्हा परिषद-पंचायत समित्या, महापालिका व नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हाताला या निमित्ताने काही पक्षाचे तरी काम मिळाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा मांडला. त्यानंतर प्रदेश काँग्रेसनेही तातडीने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये चक्काजाम आंदोलन केले.
येत्या काळात आता हा मुद्दा जिल्हा व तालुका पातळीवर उतरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेसमध्ये ‘प्रस्थापित संस्थानिक’ विरुद्ध ‘सर्वसामान्य’ हा संघर्ष आजही कमी-अधिक प्रमाणात सर्वच जिल्ह्यांत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जिल्हाध्यक्षाच्या निवडी रखडल्या तर काही ठिकाणी संस्थानिक नेत्यांच्या मर्जीतीलच कार्यकर्त्यांना नामधारी पदाधिकारी म्हणून संधी मिळाली आहे.
सत्ता असो किंवा नसो भाजप संघटनेच्या बाबतीत दक्ष आणि संवेदनशील दिसते. काँग्रेसमध्ये मात्र पराभवांची मालिका संपत नसतानाही संघटनेतील पदांसाठी आजही ‘संस्थांनिकां’ची मर्जी सांभाळली जाते हे विशेष.
विधिमंडळात जनसुरक्षा कायदा मंजूर होताना महाविकास आघाडीचे आमदार गप्प बसले. विधिमंडळातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निमित्त करून गावाकडे निघून गेले. विधानपरिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील चर्चेदरम्यान सभात्याग करून विधानपरिषदेतून निघून गेले. या नेत्यांनी अशी भूमिका का घेतली, याचे कोडे अजूनही सुटलेले नाही. त्यापूर्वीच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निर्धार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर जोरदार भाषण ठोकल्याचेही सर्वांनी पाहिले आहे.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या काळात नियुक्त झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी खडकवासला (जि. पुणे) येथील रिसॉर्टमध्ये दोन दिवसांची निवासी कार्यशाळा झाली. या कार्यशाळेतून नूतन पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर ‘बौध्दिक रिचार्ज’ करण्यात आले. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी हजेरी लावली. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दांडी मारली. सध्या महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये सगळे काही अलबेल आहे का, अशी शंका या दोन-तीन घटनांमधून येऊ लागली आहे.
संसद अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वरून विरोधकांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहांना घेरले. सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला ‘तमाशा’ म्हणून या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. प्रणिती यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांवर टीका करताना थेट ‘ऑपरेशन सिंदूर’वरच संशय घेतल्याने त्या समाजमाध्यमांत प्रचंड ‘ट्रोल’ झाल्या. खासदार होण्यापूर्वी प्रणिती शिंदे ज्या पद्धतीने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या, त्याच पद्धतीने त्या लोकसभेत बोलायला गेल्याने त्यांची मोठी पंचाईतच झाल्याचे दिसले.
सोलापुरात त्यांच्या विरोधात आंदोलन झाले. सोलापूर काँग्रेसनेही प्रणितींच्या समर्थनार्थ आंदोलन केले. पश्चिम बंगालच्या जाधोपूरमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार सायोनी घोष यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर केलेले भाषण आजही गाजत आहे.
खासदार घोष यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर न बोलता मोदींच्या कार्यपद्धतीवर लोकसभेत १७ मिनिटे भाषण केले. त्यात त्यांनी बंगाली, इंग्रजी, हिंदी या तिन्ही भाषांचा आधार घेतला होता. त्यामुळे खासदार घोष पश्चिम बंगालसह महाराष्ट्राच्या वाड्या-वस्त्यांवर लोकप्रिय झाल्या आहेत. ‘नेटिझन्स’ सध्या खासदार घोष यांचे भाषण आवडीने पुन्हा पुन्हा पहाताना दिसतात. ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सोलापूरची लेक ट्रोल झाली. दुसरीकडे ‘तृणमल’च्या खासदार सयानी यांची वाहवा होताना दिसली.
नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथील भाजपचे नेते अन् माजी मंत्री पद्माकर वळवींनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलडाणा येथील निवासस्थानी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच नंदूरबार येथे कार्यक्रमात त्यांच्या सहकाऱ्यांनाही काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशाआधी परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार)माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसच्या कार्यालयात टिळक भवन येथे प्रवेश केला.
दुर्राणी हे तीनदा आमदार होते. परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या राजकारणात त्यांचा चांगला जम आहे. सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्यांचा प्रभाव पडू शकतो. त्याचा मोठा लाभ परभणी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. पद्माकर वळवी यांच्या रुपानेही नंदुरबारसाठी जुनाच नेता नव्याने काँग्रेसला मिळाला आहे. या दोन प्रवेशांमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी जनमानसात स्थान असलेले नेतृत्व काँग्रेसच्या हाताला लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये प्रवेशाचे सत्र सुरू झाले होते. हे सत्र अवघ्या सहा महिन्यांचे ठरले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र काँग्रेसला पुन्हा एकदा गळती लागली होती.
माजी आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासारखे माजी आमदार काँग्रेसला सोडून गेले. त्यामुळे काँग्रेसचे काय होणार, कोण शिल्लक राहणार की नाही, अशीच दबकी चर्चा सुरू झाली होती. गेल्या आठवड्यात दुर्राणी आणि वळवींच्या प्रवेशाने बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे काँग्रेसजनांना दिलासा मिळू लागला आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर परभणी आणि नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला या प्रवेशाचा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.
युवक काँग्रेसला शिवराज मोरे यांच्या रुपाने नवे प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. ‘एनएसयूआय’लाही सागर साळुंखेंच्या रुपाने नवे प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. या दोन्ही नूतन प्रदेशाध्यक्षांचा आठवड्यात पदग्रहण समारंभ झाला. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकांसाठी ‘सोशल मीडिया’ प्रभावी अस्त्र आहे. त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रिय रहावे, जनतेचे प्रश्न हाती घेऊन आंदोलने करावीत, आठवड्यातून एक तरी आंदोलन झाले पाहिजे. १८ ते २५ वयोगटातील तरुण नवमतदार काँग्रेससोबत जोडला पाहिजे अशी अपेक्षा
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी खडकवासला येथील कार्यशाळेत व्यक्त केली. त्यांची ही अपेक्षा पूर्ण करण्याची प्रमुख जबाबदारी आता शिवराज मोरे आणि सागर साळुंखेंवर असणार आहे. विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर दिल्ली काँग्रेसने महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली. सपकाळ यांच्याकडे ‘ग्लॅमर’ आणि पैसा नसला तरीही ते पक्के काँग्रेसी आहेत. त्यांच्या जोडीला युवकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडलेले मोरे अन् साळुंखे हेही विचाराने पक्के काँग्रेसी आहेत हे विशेष. विचारांचे पाईक असलेल्यांच्याच हातात राज्याची काँग्रेस येऊ लागल्याचे यातून दिसत आहे.
युवकचे प्रदेशाध्यक्ष मोरे हे पश्चिम महाराष्ट्रातील कऱ्हाड (जि. सातारा) येथील आहेत. विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष साळुंखे हे मराठवाड्यातील वैजापूरचे (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील आहेत.
Q1: काँग्रेसने ‘मतचोरी’ विषयावर कोणती मोहीम सुरू केली आहे?
👉 ‘वोट चोरी के खिलाफ, मैं राहुल गांधी के साथ’ नावाची स्वाक्षरी मोहीम.
Q2: काँग्रेसमध्ये मुख्य संघटनात्मक अडचण कोणती आहे?
👉 संस्थानिक नेते व सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष.
Q3: अलीकडे काँग्रेसमध्ये कोणत्या नेत्यांचा प्रवेश झाला?
👉 माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व माजी मंत्री पद्माकर वळवी.
Q4: युवक काँग्रेस व एनएसयूआयचे नवे नेतृत्व कोण?
👉 युवक काँग्रेसला शिवराज मोरे व एनएसयूआयला सागर साळुंखे.
(Edited by: Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.