Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यापूर्वीच भाजपने निवडणुकीची तयारी केली आहे. विशेषतः पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर दिसत असून राज्यभरातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारींची निवड करीत आघाडी घेतली आहे. त्यातच बीड जिल्ह्यातील मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस यांच्या वादावर 'हायकमांड'ने तोडगा काढला आहे. तर लातूर, नांदेड, धाराशिवमध्ये जुन्या-नव्या नेत्यांमधील पक्षांतर्गत संघर्ष असताना त्यावर समन्वय साधत नेत्यांची एकजूट घडवली आहे.
येत्या काळात होता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्लॅनिंग सुरु केले आहे. भाजपने (BJP) महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख निवडले आहेत. त्यातच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नियुक्ती करीत वादावर तोडगा काढला आहे. बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार सुरेश धस तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर धस-मुंडे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद पहायला मिळाला होता. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोघांनाही एकत्रित पक्षाचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करताना अनेक जिल्ह्यात जुन्या-नव्या नेत्यांच्या वादावरही तोडगा काढला आहे. त्यामुळे हा वाद विसरून या नेत्यांना येत्या काळात एकत्रित काम करावे लागणार आहे. नांदेड जिल्ह्यात भाजपमधील जुने नेते व नव्याने काँग्रेससोडून पक्षात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात एकजूट घडवली आहे. निवडणूक प्रभारी म्हणून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे तर दुसरीकडे खासदार अजित गोपछडे यांच्याकडे नांदेड शहरची तर आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडे नांदेड उत्तरची जबाबदारी तर नांदेड दक्षिणची जबाबदारी आमदार राजेश पवार यांच्याकडे सोपवली आहे.
लातूर जिल्ह्यातही भाजपमधील जुने-नव्याने आलेल्या नेत्यांमध्ये संघर्ष पाहवयास मिळत होता. मात्र, हा वादही भाजपने सोडला आहे. काँग्रेससोडून नव्याने पक्षात आलेल्या माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून लातूर शहरची जबाबदारी सोपवली आहे तर लातूर ग्रामीणची जबाबदारी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे दिली आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
धाराशिवमध्ये समन्वयाचा प्रयत्न
स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या व नव्या वादाला तिलांजली देत भाजपने समन्वय साधला आहे. त्यामध्ये माजी मंत्री व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख म्हणून जिल्हयातील सर्वच तालुक्याची जबाबदारी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावर असणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.