Uday Samant And BJP sarkarnama
विश्लेषण

Uday Samant : सामंत भाजपच्या मुळावरच घाव घालणार होते, तयारीही झाली होती... इरादे लक्षात येताच जिल्हाध्यक्षांनी केला भांडाफोड!

BJP Vs Shivsena : भरलेल्या जेवणाच्या ताटातील वाटीत किंवा वाटीतील ताटात करण्याचे काम शिवसेनेनं करू नये. शिवसेनेनं महायुती धर्म पाळावा . मित्र पक्षातील पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांचा प्रवेश करून न घेता तो इतर पक्षातील असावा, अशी सल्ला वजा टीका भाजपने केली आहे.

Aslam Shanedivan, Hrishikesh Nalagune

BJP Vs Shivsena Politics News : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दणदणीत मतांनी सत्तेवर बसवले. विधानसभेची लढाई जिंकताच आता या तिन्ही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात पक्षविस्तार करण्यावर भर दिला जात आहे. तिन्ही पक्षांचे आमदार असणाऱ्या मतदारसंघात इतर पक्षांमधून माजी आमदार किंवा एखाद्या बड्या नेत्याला आयात केले जात आहे. सदस्य नोंदणी अभियान, शिबिर या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्षासोबत जोडले जात आहे. यात कधी कधी मित्रपक्षालाही दुखावण्यास मागे पुढे बघितले जात नाही. अशीच परिस्थिती कोकणात तयार झाली आहे.

मंत्री उदय सामंत यांनी पक्ष विस्ताराबाबत भाष्य केले पण यामुळे भाजपच्या मनाला खोलवर जखम झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल करत पक्ष वाढीवर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यामुळे कोकणातील महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

नेमकी ही धुसफूस काय आहे? शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा का रंगला आहे?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि निलेश राणे निवडून आल्यानंतर शिवसेनेत काही पक्ष प्रवेश झाले होते. सावंतवाडीमधील ओरोस येथील संजू परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. तर कुडाळमधील दादा साईल यांनी देखील भाजपला रामराम करत निलेश राणे आमदार झाल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला होता.

या पक्षप्रवेशापासूनच भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते. सामंत यांच्यावर खाजगीत टीका केली जात होती. त्याचवेळी भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये जाऊन संपूर्ण जिल्हा भाजपमय करू असा निर्धार व्यक्त केला होता. याला सिंधुदुर्गचे जिल्हा संपर्कप्रमुख असलेल्या सामंत यांनी सावंतवाडीमध्ये जाऊन प्रत्युत्तर दिले होते. राज्यात महायुतीचे सरकार असून शिंदेंच्या नेतृत्वाखाली 60 आमदार निवडून आले आहेत. सिंधुदुर्गात आमचे दोन आमदार आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जिल्ह्यात वर्चस्व आमचे आहे. आम्ही पक्ष वाढविला तर कोणाच्या पोटात का दुखते? त्यामुळे शिवसेनेला वाढवू नका, असे कोणीही सांगू शकत नाही. अशी टीका केली होती.

अशात आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांची आभार सभा येथे होणार आहे. याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. आज होणाऱ्या या सभेत ठाकरे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे. तर भाजपचे संजू वेंगुर्लेकर हे देखील प्रवेश करण्याची शक्यता होती.

त्यापूर्वीच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल करत पक्ष वाढीवर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. असे विधान करण्याआधी सामंत यांनी थोडी काळजी घ्यावी. महायुतीचे आमदार तीनही पक्षांच्या सहकाऱ्यामुळे निवडून आले आहेत. इथे पक्ष वाढविण्याचा हक्क सर्वांनाच आहे. पक्षाची ताकद वाढली की ती साहजिकच महायुतीची वाढणार आहे.

भरलेल्या जेवणाच्या ताटातील वाटीत किंवा वाटीतील ताटात करण्याचे काम शिवसेनेनं करू नये. शिवसेनेनं महायुती धर्म पाळावा . मित्र पक्षातील पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांचा प्रवेश करून न घेता तो इतर पक्षातील असावा, अशी सल्ला वजा टीका भाजपने केली आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभा वेळची आकडेवारी समोर ठेवत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचेही भाजपने म्हटलं आहे.

सध्या जिल्ह्यात भाजपचे 1 लाख 70 हजार अधिकृत सभासद असून लोकसभेला 1 लाख 57 हजार तर विधानसभेला 2 लाख 71 हजार मतदान झाले होते. ही आकडेवारी पाहिली असता महायुतीचे या जिल्ह्यात 3 आमदार कसे निवडून आले हे सांगायला नको. तरीही पुढच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुका होणार आहेत. यासाठी महायुतीची ताकद आणखी वाढावी अशीही आपली इच्छा आहे.

पण मित्र पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी न फोडता. याबाबत भाजप काळजी घेत असून सत्तेतील पक्षांमधील कार्यकर्त्यांचा आम्ही प्रवेश करून घेत नाही. त्याचपद्धतीने शिंदे शिवसेनेनं देखील भाजप किंवा मित्र पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेऊ नये. असेही आवाहन केलं आहे.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी स्थानिकच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देत असल्याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले. यावर आता भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही महायुतीचा धर्म पाळून निवडणुका लढवू. पण पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्यास आमची तयारी असल्याचेही स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT