devendra fadnavis | narendra modi sarkarnama
विश्लेषण

Assembly Election 2024 : महाराष्ट्रावर छत्तीसगड, गुजरातची 'स्वारी', भाजपचा बाजार भरवणार की उठवणार?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुजरात आणि छत्तीसगडमधील पदाधिकाऱ्यांना पाचारण केले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी हे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता भाजपला याचा फायदा होईल का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अय्यूब कादरी

निवडणूक जिंकणे आणि सत्ता प्राप्त करणे, हे कोणत्याही राजकीय पक्षाचे अंतिम ध्येय असते. त्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात, क्लृप्त्या लढवल्या जातात. आपल्या पक्षाच्या बाजूने वातावरणनिर्मिती करणे, हा भागही ओघाने येतच असतो. विविध फंडे वापरून अशी वातावरणनिर्मिती करण्यात भाजपचा हात कुणीही धरू शकत नाही. लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता भाजप सावध झाला असून, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आता गुजरातची मदत घेतली जात आहे. काही भागांत छत्तीसगडचेही पदाधिकारी दाखल झाले आहेत.

भाजप हा नेहमीच इलेक्शन मोडवर राहणारा पक्ष आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी नेहमी सतर्क असतात. निवडणुकीसाठी भाजपइतके ( Bjp ) सूक्ष्म नियोजन अन्य कोणत्याही पक्षाकडून केले जात नाही. एका पानावर मतदारांची जितकी नावे असतात, त्या मतदारांमागे एका कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. त्याला पन्नाप्रमुख असे संबोधले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत वॉरियर्स ही संकल्पनाही भाजपने समोर आणली होती. भाजपच्या सूक्ष्म नियोजनाबाबत लोकांमध्ये कुतूहल असते. त्याद्वारे वातावरणनिर्मितीही आपोआप होते.

लोकसभा निवडणुकीत मात्र वेगळे चित्र दिसले. लोकांमध्ये कुतुहलाचा विषय असलेला भाजपचा हा डोलारा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सूक्ष्म नियोजन सपशेल अयशस्वी ठरले. भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला. हे सूक्ष्म नियोजन कामाला का आले नाही, याची चर्चा भाजपमध्ये झालीच असणार. मुळात वातावरणच विरोधात असले, लोकांनी ठरवलेलेच असेल तर असे नियोजन कामाला येत नाही, याची अनुभूती भाजपला आली. त्यामुळे भाजपने मोठा निर्णय घेतला आहे, गुजरात, छत्तीसगड येथील भाजप पदाधिकारी, माजी खासदार, माजी आमदारांना महाराष्ट्रात पाचारण करण्यात आले आहे. ते स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अन्य काही राज्यांतूनही पदाधिकारी येण्याची शक्यता आहे.

भाजप सर्वार्थाने शक्तिशाली पक्ष आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक जागा जिंकणारा भाजप हा राज्यातील एकमेव पक्ष ठरला. काही अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. या धक्क्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी वापरलेली रणनीती भाजपच्या अंगलट आली. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबाबत महाराष्ट्रातील लोकांच्या मनात वेगळे स्थान आहे. विरोधकांच्या मनातही शिवसेनेबाबत तसेच वेगळे आदराचे स्थान आहे.

भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडायला नको होते, असे निष्ठावंत कार्यकर्ते खासगीत बोलताना सांगतात. राज्यात पाच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता राहिली असती तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली असते, असेही या कार्यकर्त्यांना वाटते. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवार यांनाही राज्यात सहानुभूती आहे. पक्ष फोडल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नैराश्य आलेले आहे. आमचे सरकार असूनही आम्हाला काही उपयोग होत नाही, अशीही भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

अन्य राज्यांतून पदाधिकाऱ्यांना बोलावून घेणे, ही पक्षाची संघटनात्मक बाब आहे, त्यात आश्चर्यजनक असे काही नाही, असे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिक, नगर जिल्ह्यांत आता गुजरातचे पदाधिकारी आलेले आहेत. मराठवाड्यात छत्तीसगड येथील पदाधिकारी येणार आहेत. ते स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ही पथके भाजपच्या वाट्याला येऊ शकणाऱ्या मतदारसंघांचा आढावा घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर पुढची दिशी ठरवली जाणार आहे, असे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपकडूनही अनेक उणीवा राहून गेल्या होत्या. भाजपला 400 पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर राज्यघटना बदलणार, अशा आशयाची वादग्रस्त विधाने भाजपच्याच नेत्यांनी केली होती. मात्र, त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोटे 'नॅरेटिव्ह' तयार केले, असे भाजप आणि महायुतीचे नेते अजूनही सांगत आहेत. अन्य राज्यांतून आलेली पथके अशा बाबींचा आढावा घेणार आहेत. समरसता मंच दलित वस्त्यांमध्ये जाऊन काम करणार आहे. भाजप राज्यघटना बदलणार, हे नॅरेटिव्ह मोडीत काढण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. ही पथके सांगतील त्याप्रमाणेच स्थानिक कार्यकर्त्यांना काम करावे लागणार आहे.

विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यावेळी कोणतीही कसर राहू नये, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुजरात आणि छत्तीसगडच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. पक्ष फोडल्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला आहे. विधानसभेला तसे काही होऊ नये, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे लोकांमध्ये मोठा संताप आहे. त्यानंतर महायुतीच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे या संतापात भर पडली आहे. अशा परिस्थितीत गुजरात, छत्तीसगडमधील पदाधिकाऱ्यांची भाजपला मदत होणार की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT