BJP Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra BJP : भाजप चक्रव्यूहात; 'धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतयं!' अशी अवस्था

अय्यूब कादरी

Maharashtra BJP Politics : महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष चक्रव्यूहात अडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची वाताहत झाली. पहिल्या नंबरवर राहणारा हा पक्ष झर्रकन घसरला आणि कार्यकर्त्यांमधील असंतोष उफाळून येऊ लागला.

लोकसभेची निवडणूक एकट्याने लढली असती तर भाजप पुन्हा राज्यातील एक नंबरचा पक्ष राहिला असता, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना आहे. यातूनच भाजप आता विधानसभा एकट्याने लढणार का? असा प्रश्न आहे. मात्र याचे उत्तर नाही असेच आहे. कारण सोडलं तर पळतयं आणि धरलं तर चावतयं, अशी अवस्था भाजपची झाली आहे.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. युतीत असलेल्या शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युती तुटली. त्यानंतरच्या घडामोडी भाजपच्या अंगलट आल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले आहे.

लोकसभेला भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या. आता यापेक्षा वाईट काही होणार नाही, त्यामुळे भाजपने विधानसभा स्वबळावर लढावी, असा सूर पदाधिकारी, कार्यकर्त्यांतून येऊ लागला आहे. ते नेत्यांनाही पटलेले असावे, मात्र तेही हतबल दिसतात. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून सोबत घेतलेल्या दोन गटांना सोडले तर काय होईल, याबाबत प्रदेश पातळीवर संभ्रम असल्याचे चित्र आहे.

पुण्यात 21 जुलै रोजी भाजपचे अधिवेशन झाले. प्रमुख नेत्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरद पवार Sharad Pawar यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे नकली संतान आहेत, ठाकरेंची शिवसेना नकली आहे, अशी टीकाही मोदींनी केली होती.

त्याचा काय परिणाम झाला, याचा विसर भाजपला दीड महिन्यातच पडला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावरील ती टीका म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवरील टीका, असे वातावरण त्यावेळी निर्माण झाले होते. पुण्यातील अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार, ठाकरे यांच्यावर अशीच टीका केली.

याकडे फक्त टीका म्हणून पाहता येणार नाही. अशा टीकेमुळे लोकसभा निवडणुकीत नुकसान झालेले असतानाही भाजप नेते त्याची पुनरावृत्ती का करत असतील, असा प्रश्न आहे. भाजप कोंडीत सापडला आहे, असा त्याचा एक अर्थ आहे. स्वबळावर लढावे, यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव आहे. मित्रपक्षांच्या आमदारांनी भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही, अशा अनेक ठिकाणच्या तक्रारी आहेत.

कार्यकर्त्यांची ही मागणी पूर्ण करणे भाजपसाठी अशक्य आहे. दोन पक्ष फोडून घेतलेल्या नेत्यांना सोडले तर आपला मतदानाचा टक्का आणखी घसरेल, अशी भीती भाजपला आहे. या भीतीने भाजपला चक्रव्यूहात अडकवून टाकले आहे.

कार्यकर्ते नाराज होऊ नयेत, त्यांचे खच्चीकरण होऊ नये यासाठी पुण्यातील अधिवेशनात शरद पवार, उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा साधण्यात आला. 2024 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचेच सरकार स्थापन होईल, म्हणजेच भाजपचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना देण्यात आला.

लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण विधानसभेलाही राहील का, हे आताच सांगता येणार नाही. मात्र भाजप आणि महायुतीची वाट बिकट आहे, हे तर कुणीही सांगू शकेल. महायुतीच्या विरोधात लोकांमध्ये अजूनही रोष आहे. दोन पक्ष फोडले, हे त्याचे मुख्य कारण आहे. ही बाब लोकांनी विसरू नये, याची काळजी महाविकास आघाडीकडून सातत्याने घेतली जात आहे.

पुण्यात भाजपचे अधिवेशन झाले आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी याच मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. फडणवीस यांनी प्रत्येकी 50 कोटी रुपये देऊन आमचे आमदार फोडले, अशी टीका त्यांनी केली. अमित शाह केंद्रीय गृहमंत्री आहेत, हे सांगायला लाज वाटते, अशी जिव्हारी लागणारी टीकाही त्यांनी केली.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजप विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी बाजूला ठेवणार नाही, हे निश्चित आहे. कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असली तरी भाजप या दोन नेत्यांना बाजूला सारण्याचा धोका पत्करू शकत नाही.

पक्ष फोडल्यावर लोकांमध्ये भाजपबद्दल रोष निर्माण झाला होता. आता या नेत्यांना सोडून दिले दिले तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये आपल्या पक्षाबद्दल तसाच रोष निर्माण होईल आणि मतांचा टक्का आणखी घसरेल, अशी भीती भाजपला आहे.

स्वबळावर लढायचे तर आहे, पण त्यामुळे एकटे पडण्याचीही भीतीही भाजपला आहे. राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत एकट्याची ताकद पुरेल का, अशी शंका भाजप नेत्यांना भेडसावत आहे. त्यामुळे इच्छा असूनही भाजप राज्यात स्वबळावर लढणार नाही, हे निश्चित मानले जात आहे.

लोकसभा निवडणुकीतील उल्लेखनीय यशानंतर महाविकास आघाडीच्या अंगात हत्तीचे बळ संचारले आहे. आघाडीची प्रभावी यंत्रणा नसतानाही लोकांनी त्यांच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी त्यांच्या नेत्यांवर प्रहार करणे भाजपसाठी क्रमप्राप्त आहे.

कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आपल्या मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न पुण्याच्या अधिवेशनातील भाषणांमधून करण्यात आला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका करण्याचा धोका भाजपने पुन्हा एकदा पत्करला आहे. त्याचा फायदा होईल की तोटा, याची चिंता भाजपला नक्कीच असणार.

मात्र एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांना सोबत ठेवताना भाजपला हे करावेच लागणार आहे. स्वबळावर लढण्याची इच्छा असतानाही पुरेशी ताकद नसणे, एकटे पडण्याची भीती सतावणे, ही त्यामागची कारणे आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT