Uddhav Thackeray, Amit Shah, Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Amit Shah News : आम्ही पक्ष फोडले नाहीत, हे अमित शाहांना राज्यात येऊन सांगण्याची गरज का भासली?

Lok Sabha Election 2024 : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती भाजपसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे. नेत्यांचे पक्षांतर करून घेणे आणि थेट पक्ष फोडणे, यातील फरक भाजपला आता कळला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अय्यूब कादरी

Maharashtra Politics : राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक राजकीय पक्षांच्या फोडाफोडीचे प्रकरण गेल्या अडीच वर्षांपासून गाजत आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले. नेत्यांचे पक्षांतर सातत्याने होत असते, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पक्ष फुटण्याचे प्रकार याआधी कदाचित महाराष्ट्राने पाहिले नसतील.

अर्थात, पक्षांच्या या फोडाफोडीचे श्रेय किंवा दोष भाजपवर गेले. गेली अडीच वर्षे याच मुद्द्यावरून राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पक्ष फोडण्याचे प्रकार लोकांना आवडलेले नाहीत, हे आता भाजपच्याही लक्षात आले, असे दिसत आहे. त्यामुळेच हे पक्ष आम्ही फोडले नाहीत, असे स्पष्ट करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah News) यांना महाराष्ट्रात यावे लागले.

दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो, असे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते, याचा विसर राज्याला अद्याप पडलेला नाही. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) धामधुमीत मात्र अमित शाह यांनी भाजपने (BJP) दोन्ही पक्ष फोडल्याचा इन्कार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) आम्ही फोडली नाही, पुत्रीमोह, पुत्रमोहामुळे हे पक्ष फुटल्याचे शाह यांचे म्हणणे आहे. याबाबत काही दिवसांतच भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांच्या बोलण्यामध्ये टोकाची विसंगती कशी येऊ शकते, असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला असेल.

उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना आणि शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस फोडून देवेंद्र फडणवीस यांनी 2019 चा बदला घेतला, अशी भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.

आता अमित शाह यांच्या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम वाढला असेल. आपल्याला हव्या त्या दिशेने प्रचार नेण्याची, नॅरेटिव्ह ठरवण्याची ताकद भाजपमध्ये आहे. मात्र महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपच्या मार्गातील मोठा अडसर बनून उभे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना फोडण्यात आली, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यानंतर ठाकरे यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली, त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती वाढली. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली, त्यानंतर शरद पवार यांच्याबाबतही सहानुभूती वाढली. शरद पवार यांच्याकडे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यापासून याची प्रचिती येत आहे.

भाजप आणि महायुतीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप, कुरघोड्या करत असले तरी जमिनीवर काय परिस्थिती आहे, याची जाणीव त्यांना नक्की असणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने फोडले नाहीत, असे ओरडू सांगण्याची वेळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आली आहे.

हो पक्ष आम्ही फोडले नाहीत. हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करायला मी आलो आहे, असेही अमित शाह म्हणाले आहेत. यावरून भाजपने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा किती धसका घेतला आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना शिवसेनेच्या भाषेत गद्दार असे संबोधले जाते. या वेळी शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांना या संबोधनासह 50 खोक्यांचे लेबलही चिकटवले. सर्व सत्तापदे मिळूनही शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना शिवसैनिकांनी निश्चितपणे धडा शिकवलेला आहे, असा इतिहास आहे. या ऐतिहासिक फुटीनंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अशीच भावना तीव्र आहे.

नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला होता. शिवसेना सोडलेल्या अनेक नेत्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. या वेळी काय होईल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. असे असले तरी पक्षांच्या फोडाफोडीमुळे नागरिकांत नाराजी आहे, याची प्रचिती भाजपला आलेली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. असे प्रसंग त्यांच्यासाठी नवीन नाहीत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते ज्या धाडसाने पक्षांची पुन्हा बांधणी करत आहेत, ते अन्य कुण्याही नेत्याला शक्य नव्हते. महाराष्ट्र एकहाती काबीज करण्याच्या भाजपच्या वाटेतील शरद पवार हे सर्वात मोठा अडथळा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी फोडण्यात आली, मात्र शरद पवार पुन्हा जोमाने उभे राहिले. त्यांनी आपल्या पक्षात जीव ओतला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र आठवते का? त्या निवडणुकीपूर्वीही शरद पवारांचे अनेक बिनीचे शिलेदार भाजपवासी झाले होते. काँग्रेसही खिळखिळी झाली होती. या दोन्ही पक्षांचे 20-25 तरी आमदार निवडून येतील का नाही, अशी शंका निर्माण झाली होती. पुढे काय झाले सर्वांना माहीत आहे. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष आम्ही फोडले नाहीत, हे सांगण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात यावे लागले.   

(Edited By - Rajanand More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT