Manikrao Kokate Sanjay Shirsat Sarkarnama
विश्लेषण

Manikrao Kokate Sanjay Shirsat : वादाची साडेसाती अन् राजीनाम्याच्या चर्चा; संजय शिरसाट, माणिकराव कोकाटेचं शनिदेवाला साकडं

NCP Manikrao Kokate and Shivsena Sanjay Shirsat Perform Shani Puja After BJP Mahayuti Dispute : शिवसेना मंत्री संजय शिरसाट अन् राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वाद म्हणजे, इडा-पीडा म्हणून शनिदेव खरंच दूर करतील का?

Pradeep Pendhare

Shani Puja politics Maharashtra : मुंबईतील पावसाळी अधिवेशन भाजप महायुती सत्ताधाऱ्यांच्या मंत्री अन् आमदार यांच्या कारनाम्यांनी गाजलं. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आमदार निवास कँटीनमध्ये मुक्केबाजी केली. त्यानंतर लगेचच मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडिओ समोर आला.

विधिमंडळात हनी ट्रॅपचं प्रकरण देखील गाजत असतानाच, अधिवेशन शेवटच्या दिवशी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात "ऑनलाइन" रमी खेळतानाचा व्हिडिओंने कहरच केला.

मंत्री कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अतिशय संवेदनशील खातं आहे. ते राज्याचे कृषिमंत्री आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न जटील होऊन बसलेत, राज्याची संस्कृती ही कृषीप्रधान म्हणून ओळखली जाते, नैसर्गिक समस्यांना तोंड देताना शेतकरी मेटाकुटीला आलाय, कर्जबाजारी झालाय, यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत.

भाजप महायुती (Mahayuti) सरकारकडून कर्जमाफीचं आश्वासनावर निर्णय घेतला जात नसतानाच, सभागृहात मंत्र्यांनं रमी खेळणं म्हणजे, सरकार किती असंवेदनशील आहे, याचा परिचय मिळतो. स्वतःच्या बुद्धिने ही इडा-पीडा आणली असंच या मंत्र्यांचं वर्तन दिसतय, त्याला शनिदेवाचा फेरा कसा म्हणायचा? या फेऱ्यातून सुटका करण्यासाठी या दोघा मंत्र्यांनी केलेल्या शनि पूजेला कितपत अर्थ उरतो? शनि पूजा यशस्वी झाली, तरी त्यातून मिळणारं फळ यांना जबाबदारीची जाणिव करून देईल का?

मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी समोर आणला. त्या त्यांच्या घरातील असल्याची कबुली मंत्री शिरसाट यांनी दिली. मंत्री शिरसाट यांनी या व्हिडिओवर खासदार राऊत यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिलाय. परंतु या व्हिडिओ पाहिल्यास तिथली बॅग, संजय शिरसाट यांची स्टाईल सर्व काही सत्तेची हवा डोक्यात गेल्याचं दाखवतं.

संजय शिरसाट यांनी दुसऱ्या दिवशी बॅगेत पैसे नसून कपडे होते, असा दावा केला. हा दावा खोडून काढताना, खासदार राऊतांनी आणखी व्हिडिओ आहेत, ट्विट करतो, असे सांगून इशारा दिला. राऊत एवढ्यावर थांबले नाही, तर इतर मंत्र्यांचे आणि बॅगांचे देखील व्हिडिओ आहेत, असे सांगून खळबळ उडवून दिली.

या प्रकरणापूर्वी संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील वेदांत म्हणजेच विट्स हॉटेलच्या लिलावावरून संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप झाले. संजय शिरसाट यांच्या मुलाने या हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत हॉटेलची बाजारभावानुसार किंमत 110 कोटी रुपये असतानाही, केवळ 67 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय शिरसाट यांनी या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते.

विधान परिषदेच्या सभागृहात व्हिट्स हॉटेल टेंडर प्रकरणावरून मोठा गोंधळ झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे. संजय शिरसाट सभागृहात अक्षरश एकटे पडल्याचे दिसले. महायुतीमधील एकही मंत्री या मुद्यावर आजही त्यांची बाजू घेताना दिसत नाही.

मंत्री शिरसाट एकटे पडले

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन, उलट या प्रकरणात आरोप करणाऱ्यांवर वेगळ्याच मुद्यांवर संजय शिरसाट चर्चा करत बसले. मराठी माणूस पुढे जात आहे, तर तुम्ही पाय खेचता, असा आरोप संजय शिरसाट विरोधकांवर केला. जातीचा आधार देखील घेतला. पण कुणीही संजय शिरसाट यांच्या बाजूने उभे राहिले नाही. दस्तूर खुद्द त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बाजू घेतली नाही.

मंत्री शिरसाटांपाठोपाठ कोकाटे वादात

संजय शिरसाट यांनी ही इडा-पीडा आर्थिक मोहातून ओढावून घेतल्याचे कुणीही सांगेल. यातून सुटका करण्यासाठी शनिदेवाचा धावा सुरू केला. मंत्री शिरसाट यांच्यापाठोपाठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत साडले आहे. राज्याचे अतिशय संवेदनशील खाते त्यांच्याकडे आहे. कृषि खाते संभाळताना, किती जागरूक आणि संवेदनशील राहावे लागते, हे मंत्री कोकाटे यांच्या कोणत्याच कृती आतापर्यंत दिसले नाही. लागोपाठ वादग्रस्त विधाने करून ते शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळतच राहिले. भाजप महायुती आणि पक्ष नेतृत्व देखील त्यांची पाठराखण करत राहिले. या वादातून काही धडा घेतील, असे माणिकराव कोकाटे कुठले?

कोकाटे चूक मान्य करेना

या वादानंतर माणिकराव कोकाटे यांनी गंभीर चूक केलीच. ती म्हणजे विधिमंडळात "ऑनलाइन" रमी खेळून. चूक मान्य करणाऱ्यात कोकाटे नाहीत. मी फोन करण्यासाठी मोबाईल बाहेर काढला होता. त्यावेळी ती जाहिरात समोर आली, ती जाहिरात हटवण्याचा व्हिडिओ आहे, असा दावा केला.

स्मार्ट शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा प्रकार

पण भाजप सरकारने स्मार्ट आणि अपडेट केलेल्या युवा, तरुण शेतकर्‍यांच्या पचनी पडणारा नाही. लॅपटाॅपच्या एका बटनावर शेतीचं नियोजन करणारा युवा शेतकऱ्याला राज्याच्या कृषिमंत्री वेड्यात काढूच शकरणार नाही, हे भाजप महायुतीमधील राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वाला एव्हाना लक्षात आलं आहे. आणि कोकटे यांना देखील लक्षात आले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच...

राज्यात जानेवारी आणि मार्च 2025मध्ये तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील 373 शेतकरी कुटुंबे आर्थिक मदतीसाठी पात्र आढळली, तर 200प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले. 194 प्रकरणांची चौकशी अजूनही सुरू आहे. यात चार महिन्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा नाही. शेतकऱ्यांची राज्यातील आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो.

कोकाटेंचा बालिश खुलासा

अशा स्थितीत, विधिमंडळाच्या सभागृहात कृषिमंत्री "ऑनलाइन" रमी खेळतोय, हे किती असंवेदनशील आहे, यावरून संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळणारच. मंत्री कोकाटे यांनी केलेला खुलासा देखील संतापजनक असाच आहे. माफी मागण्याऐवजी जाहिरात स्किप करत होतो, असे सांगितले. व्हिडिओ समोर आणला म्हणून आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत दिले. पण व्हिडिओ पाहिल्यावर मोबाईलच्या स्क्रिनवर रमी खेळतानाचे बोट फिरताना दिसत आहेत. याचा खुलासा मंत्री महोदयांनी केला नाही.

कोकाटेंचं खूप साचलंय

माणिकराव कोकटे यांनी सुरवातीपासून शेतकर्‍यांविषयी वादग्रस्त विधान केली आहेत. ही इडा-पीडा आताचा नाही, तर खूप साचलेली आहे. ही इडा-पीडा आता उफाळून आल्यावर मंत्री कोकाटे यांना शनि देवाची आठवण झाली. नंदुरबारच्या शनिमांडळ इथं शनिमंदिरात पूजा-अर्चा केली.

कोकाटेंची शनिची पूजा-अर्चा

राजकीय कारकीर्दीत आलेली इडा पिडा टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी लीन झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनि मंदिर येथे कोकाटे यांनी दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. शनिवारी शनि देवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडा पिडा दूर होते, अशी अनेकांची भावना आहे.

शनि देव राजकीय क्षेत्राचा गुरू; पण...

शनि देव हा राजकीय क्षेत्राचा गुरू मानला जातो. त्यामुळे अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊन पूजा-अर्चा करतात. संकटात सापडलेल्या राजकीय नेत्यांना या ठिकाणाहून ऊर्जा मिळते, अशी धारणा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील आपल्या राजकीय जीवनाची सुरवात या शनैश्वराच्या दर्शनाने केली होती, असे सांगितले जाते. मंत्री विजयकुमार गावित, खासदार हिना गावित अशा अनेक राजकीय नेत्यांनी देखील इथल्या शनि मंदिराचे दर्शन घेतले आहे. वादात सापडलेले दोन्ही मंत्र्यांनी केलेली शनि पूजा ही त्यांची कृती झाली. पण, जबाबदारीची समज कधी येणार हा प्रश्नच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT