नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसला (Congress) धक्का देऊन माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंह (R. P. N. Singh) भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहेत. आता त्यांचा सामना भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले मातब्बर नेते स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्याशी होणार आहे. यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत सिंह यांचाही समावेश होता. आता सिंह हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ते पडरौना मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरतील, असे मानले जात आहे. या मतदारसंघात मौर्य हे विद्यमान आमदार आहेत. मौर्य यांच्या विरोधात लढण्यासाठी बलाढ्य नेत्याचा शोध भाजपकडून सुरू होता. अखेर सिंह यांच्या रुपाने हा नेता मिळाला आहे. सिंह आणि मौर्य या दोघांनीही या मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. मौर्य यांनी भाजपला धक्का देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपला मोठी गळती लावली होती.
सिंह यांच्यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसप्रमाणेच समाजवादी पक्षालाही फटका बसू शकतो, असे मानले जात आहे. सिंह हे कुशीनगर जिल्ह्यातील आहे. ते 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कुशीनगर मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर त्यानंतर त्यांना लगेच काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले होते. नंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पडरौना विधानसभा मतदारसंघाचे 1996, 2002 आणि 2007 मध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. (RPN Singh joins BJP)
काँग्रेस सोमवारी तीस जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात सिंह यांचाही समावेश करण्यात आला होता. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने मोठा धक्का बसला आहे. भाजपने स्टार प्रचारकालाच गळाला लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला हा मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. सिंह हे काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते.
सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून राजीनामा दिला. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना समाजवादी पक्षाचे पडरौना विधानसभा मतदारसंघातील उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात तिकीट दिले जाऊ शकते. मौर्य यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम केला आहे. सिंह हे उत्तर प्रदेशातील मागासवर्गातील नेते आहेत. कुशीनगर गोरखपुर, देवरिया या भागांत त्यांची ताकद आहे. पूर्वांचलमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने काँग्रेसला या भागात मोठा फटका बसणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.