PM Narendra Modi and Pramod Sawant
PM Narendra Modi and Pramod Sawant Sarkarnama
विश्लेषण

गोव्यात 'आसाम पॅटर्न' अन् भाजप नेतृत्वाकडून मुख्यमंत्री सावंतांना डच्चू?

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा पक्षासमोर निर्माण झाला आहे. आता गोव्यात आसाम पॅटर्नची पुनरावृत्ती भाजपकडून होण्याची शक्यता असून, सावंत यांना डच्चू मिळू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी राज्यपालांना भेटून राजीनामा दिला असून, भाजप नेते विश्वजित राणे यांनीही थेट राज्यपालांची भेट घेतली आहे. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी अद्याप घेतलेला नाही. यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर करण्याआधीच भाजपने आमदारांचा शपथविधी उरकून घेण्याचे ठरवले आहे. यामुळे राज्यात आसाम पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. आसाममध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना निवडणुकीनंतर यशानंतर पुन्हा संधी देण्यात आली नव्हती. त्यांच्या ऐवजी नेतृत्वाने थेट हिमंता बिस्वा सरमा यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. आता गोव्यातही असेच घडू शकते. प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी न देता दुसऱ्या व्यक्तीची निवड केली जाऊ शकते. यासाठी विश्वजित राणे हे स्पर्धेत आहेत. असे असले तरी भाजप नेतृत्व धक्कातंत्राचा वापर करून इतरही कुणाकडे धुरा सोपवू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम असताना राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्ले यांनी उद्या (ता.15) विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आमदार गणेश गावकर यांची निवड केली आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने आधी आमदारांना शपथ देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. पक्ष नेतृत्वाकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावावर खल सुरू आहे. मात्र, अद्याप निर्णय होत नसल्याने आमदारांच्या शपथविधीचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोव्यात (Goa) विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी उफाळली आहे. विश्वजित राणे (Vishwajit Rane) हे आरोग्यमंत्री होते. राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. सावंत यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. यानंतर काही वेळाने राणे हे थेट राज्यपालांना जाऊन भेटले होते. ही भेट व्यक्तिगत स्वरूपाची असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, या भेटीबद्दल भाजप नेत्यांना काहीही माहिती नव्हती.

राणे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदावर मानले जात आहेत. आजच्या त्यांच्या राज्यपालांच्या भेटीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे गोव्यातील राजकारणात अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना बदलण्याच्या चर्चेमागे त्यांचा निसटता विजयही कारणीभूत आहे. साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ ६६६ मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे सावंतांची विकेट पडून मुख्यमंत्रिपदासाठी दुसरे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT