Anil Benke
Anil Benke Sarkarnama
विश्लेषण

BJP NEWS : भाजपचा आमदार राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?

सरकारनामा ब्यूरो

बेळगाव : बेळगाव (Belgaum) उत्तर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अनिल बेनके यांना भाजपने (BJP) विधानसभेची उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आमदार बेनके प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांच्या समर्थकांकडून भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजपने तिकिट कापल्याने नाराज झालेले बेनके यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यात ते ‘महाराष्ट्र एकीकरण समिती किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत,’ अशी चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. (BJP MLA Anil Benke will contest election on NCP ticket)

भाजपने उत्तर विधानसभा मतदार संघात डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आमदार बेनके समर्थकांनी आंदोलनचा पवित्रा घेतला. बुधवारी चव्हाट गल्ली येथील आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच, भाजपाच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर चव्हाट गल्लीतून चन्नमा सर्कलमध्ये मानवी साकळी करून आंदोलन करण्यात आले.

सुमारे दोन तास आंदोलन केल्यानंतर पुन्हा खासदार अंगडी यांची भेट घेण्यात आली. त्यांच्या घरासमोर देखील सुमारे दोन तास आंदोलन करण्यात आले. अंगडी यांनी वरिष्टांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. भाजपने फेरविचार न केल्यास भविष्यातील निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसेल असे सांगितले.

आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारल्यामुळे बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाराष्ट्र एकिकरण समितीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली आहे. त्यामुळे तर्क वितर्कांना ऊत आला आहे. मात्र, याबाबत आमदार बेनके यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. मात्र, या चर्चा मोठ्या प्रमाणात होत असल्याने काहीही घडू शकते, असे मत व्यक्त होत आहे.

आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे बेळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. आंदोलनात बेळगावच्या उपमहापौर रेश्‍मा पाटील तसेच उत्तर विभागातील भाजप नगरसेवक उपस्थित होते. आमदार बेनके याना पक्षाने उमेदवारी दिली नाही तर नगरसेवकपदाचा राजीनामा दिला जाईल अशी घोषणा पाटील यांच्यासह भाजप नगरसेवकांनी केली.

बेळगाव महापालिकेत सत्ता येण्यात मोठे योगदान

सप्टेंबर २०२१ मध्ये बेळगाव महापालिकेची निवडणूक झाली. त्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच आपल्या चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरविले. त्या निवडणूकीत आमदार बेनके यांनी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यामुळे उत्तर विभागातील बहुतेक प्रभागांमध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे महापालिकेत भाजपला सत्ता मिळविणे सोपे गेले होते.

सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत उपमहापौरपदाचा उमेदवारही बेनके यांनीच निश्‍चित केला होता. बेनके यांच्या शिफारशीमुळेच रेश्‍मा पाटील यांना उपमहापौरपद मिळाले होते. त्यामुळे बेनके याना उमेदवारी न जाहीर झाल्यामुळे नाराज झालेल्यांमध्ये उपमहापौरांसह भाजपच्या सर्वच नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षावर दबाव टाकण्यासाठी त्यानी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT