पंढरपूर : काय झाडी...काय डोंगार..काय हाॅटेल या डाॅयलाॅगमुळे राज्यभरात चर्चेत आलेले सांगोल्याचे शिवसेनेचे (shivsena) आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) पुन्हा एकदा आपल्या भाषणा दरम्यान केलेल्या फटकेबाजीमुळे चर्चेत आले आहेत. भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरील प्रेमापोटीच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर सांगितले, तर कोण कुठेही असले तरी शेवटी शरद पवारांच्या (Sharad Pawar) फांद्या असल्याचे सांगत शरद पवारांवर आपली किती निष्ठा आहे, हेही त्यांनी स्पष्ट सांगितले. (No matter where I am in politics, I am a branch of Sharad Pawar.. : Shahaji Patil)
राजकारणात कुण कणाचं नसतं. सगळ्यांना गोड बोलून काम करावी लागतात. शरद पवार, शिंदेसाहेब यांच्यासह अनेक राजकीय नेते मला आपलं मानतात, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहाजी पाटील यांनी बुधवारीच उद्धव ठाकरेंच्या मार्फत माझं तिकीट कापण्याचा शरद पवारांचा प्लॅन होता, असं विधान केलं होतं. आज त्यांनी अचानक पवारांबद्दल आदर व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आमदार पाटील यांच्या राजकीय फटकेबाजीमुळे शिवसेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना त्यांनी राजकीय अनेक गुपीतं स्पष्ट केली.
आमदार पाटील म्हणाले, काॅंग्रेसने मला काहीच कमी केले नव्हते. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पहिले तिकीट आठ दिवस अगोदर जाहीर व्हायचं. नंतर विजयसिंह मोहिते पाटील आणि सुधाकर परिचारक यांच्यासह इतर नेत्यांची तिकीट जाहीर व्हायची. इतकं सगळं मला काँग्रेसने दिल्यानंतरही मी केवळ ठाकरे घराण्यावरील प्रेमापोटीच शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे घराण्यावर प्रेम नसतं, तर मी शिवसेनेत गेलोच नसतो. आजही माझ्या मनात ठाकरे घराणे आणि उध्दव यांच्या विषयी आदर आहे.
शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही आजही मला आपलं म्हणतात. मीही गोड बोलून त्यांच्याकडून कामे करून घेतो. सध्या सुरू असलेल्या राजकारणामध्ये कोणीच कुणाचं नाही, त्यामुळे आपली काम करून घ्या, असं वक्तव्यही आमदार पाटील यांनी केले.
राजकारणात मी कुठेही असलो तरी शेवटी शरद पवारांच्या झाडाच्या फांद्या आहोत. भाजप-शिवसेनेतील अनेक नेत्यांचे शरद पवारांशी प्रेमाचे संबंध आहेत. राजकारणात चाललेला हा नवा खेळ असला तरी मी लहान पणापासून राजकारणाचा खेळ खेळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.