Rohit Pawar, Ram Shinde News Sarkarnama
विश्लेषण

Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदेंचे 'बॉम्ब' रोहित पवार कसे निष्प्रभ करणार?

Ahmednagar Politics : शरद पवार यांना राजकारणातून निष्प्रभ करण्याच्या खेळीचा भाग म्हणून आता रोहित पवार यांच्याकडे...

अय्यूब कादरी

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते राम शिंदे यांना जोरदार धक्का देत त्यांचा पराभव केला होता. या पराभवाचा धक्का पचवल्यानंतर शिंदे पुन्हा सक्रिय झाले. निवडणुकीत रोहित पवार यांना खंबीर साथ देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यालाच शिंदे यांनी गळाला लावून भाजपमध्ये प्रवेश दिला होता. काही दिवसांपूर्वीही शिंदे यांनी पवार यांना असे धक्के दिले आहे. सध्या युवा संघर्ष यात्रेवर असलेले रोहित पवार शिंदे यांच्या धक्क्यांना कोणत्या पद्धतीने उत्तर देतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

गेल्यावर्षी महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi) कोसळले. महायुतीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यामुळे राम शिंदे यांना बळ मिळाले. त्यातच पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यांचे बळ आणखी वाढले. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून केलेला पराभव शिंदे आणि भाजपच्याही जिव्हारी लागला होता. त्यामुळेही पक्षानेही शिंदे यांना बळ दिले. आता राष्ट्रवादीतही फूट पडली आहे.

अजितदादा पवार सत्तेत जाऊन बसले आहेत, तर रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. शरद पवार यांना राजकारणातून निष्प्रभ करण्याच्या खेळीचा भाग म्हणून आता रोहित पवार यांच्याकडे भाजपने मोर्चा वळवला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही राम शिंदे यांच्या गटाने बाजी मारली. रोहित पवार यांचा गट पिछाडीवर राहिला. जवळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने लक्ष वेधून घेतले होते.

प्रशांत शिंदे या तरुण नेत्याचे पॅनेल या निवडणुकीत विजयी झाले होते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी प्रशांत शिंदे यांनाही गळाला लावले. प्रशांत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवश केला. त्यानंतर आणखीही काही बॉम्ब फुटणार आहेत, असे म्हणत राम शिंदे यांनी रोहित पवार यांना इशारा दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी समंजस राजकीय व्यक्तीमत्व अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मतदारसंघापुरते मर्यादित न राहता आपल्या राजकारणाची व्याप्ती राज्यभरात वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अजितदादा पवार हे सत्तेत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि रोहित पवार यांना 'स्पेस' मिळाली. त्याचा पुरेपूर वापर करून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्याकडे भविष्यातील राजकारणातील आश्वासक चेहरे म्हणून पाहिले जात आहे.

त्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे. रेहित पवार हे सध्या युवा संघर्ष यात्रेत आहेत. त्यांना पुणे ते नागपूर अशी ही पायी यात्रा काढली आहे. ८०० किलोमीटरचा प्रवास करत १३ जिल्ह्यांतून ही यात्रा जाणार आहे. नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ही युवा संघर्ष यात्रा धडकणार आहे.

या यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी सरकारवर तिखट हल्ले केले आहेत. ही टायमिंग साधत शिंदे यांनीही पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या येत्रादरम्यान रोहित पवार हे तरुणांचे विविध प्रश्न मांडत आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या राजकारणाची, त्यांच्या आकलनाची व्याप्ती आणखी वाढणार आहे.

शिंदे यांनी दिलेल्या धक्क्यांबाबत पवार यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे एेकिवात नाही. शरद पवार यांच्या मुशीत तयार झालेल्या रोहित पवार यांच्याकडे शिंदे यांनी दिलेल्या धक्क्यांना नक्कीच उत्तर असणार आहे, मात्र ते काय असेल, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT