Vinod Tawde Sarkarnama
विश्लेषण

BJP Candidates List : भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रासह, ज्येष्ठांना डच्चू; तर ओबीसींवर फोकस अन्...

Sachin Deshpande

BJP Politics : लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात महाराष्ट्राला स्थान देण्यात आले नाही. इतकेच नाही तर ज्येष्ठांना भाजपने डच्चू देत तरुणांना संधी दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही सर्व यादी घोषित करण्याचे काम महाराष्ट्राचे भाजपचे नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात तावडे यांचे वजन वाढल्याचे चित्र आहे.

दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात विनोद तावडे यांनी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली होती. आज उमेदवार घोषणेची पहिली पत्रकार परिषद ही विनोद तावडे या मराठी नेत्याने गाजविल्याचे चित्र देशभरात होते. भाजपने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील सर्वाधिक जागांची घोषणा केली. उत्तर प्रदेशात वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांच्या नावाची घोषणा केली गेली. गुजरातच्या गांधीनगर येथून गृहमंत्री अमित शाह, तर सुषमा स्वराज यांची कन्या बांसरी स्वराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन नेत्यांचे तिकीट कापण्यात आले.

उत्तर प्रदेश 51, पश्चिम बंगाल 20, मध्य प्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू कश्मीर 2, उत्तराखंड 3, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1, अंदमान निकोबार 1, दमन दीव 1 अशा एकूण 195 जागांचे उमेदवार भाजपने आज जाहीर केले.

या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचाही समावेश आहे. त्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही समावेश आहे. या उमेदवारांपैकी 28 महिला आहेत. 47 उमेदवार 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यादीत 27 अनुसूचित जाती आणि 18 एसटी उमेदवार आहेत. 195 पैकी 57 ओबीसी उमेदवार उभे करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आजच्या भाजपच्या पहिल्या यादीत तरुणांना सर्वाधिक संधी देण्यात आली आहे. 50 पेक्षा कमी वयाचे 47 उमेदवार भाजपने देत ज्येष्ठ राजकीय नेत्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर राजकारणात नवतरुणांना संधी देत भाजपने निवडणूक घोषित होण्यापूर्वीच पहिली यादी जाहीर करत राष्ट्रीय राजकारणात बाजी मारल्याचे चित्र आहे.

इंडिया आघाडीचे केवळ समाजवादी पार्टी व आपने काही जागा घोषित केल्या आहेत. अद्याप काँग्रेसने त्यांचे उमेदवार कोण याची यादी घोषित केली नाही. देशाच्या राजकारणात ओबीसींवर फोकस करण्यात आला असून, पहिल्या यादीत भाजपने सर्वाधिक. 195 पैकी 57 ओबीसी उमेदवार घोषित करत ओबीसींना संधी देण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र निर्माण केले आहे.

भाजपने नुकतेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यानुसार महिलांना या निवडणुकीत अधिक संधी देण्याची तयारी भाजपने केल्याचे चित्र आहे. पहिल्या यादीत 28 महिलांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये एकवाक्यता दिसून आली नाही. त्याच्या आघाडीत वंचितचा समावेश आहे की नाही, यावरदेखील अद्याप शिक्कामोर्तब झाला नाही. भाजप एकीकडे देशातील पहिली यादी जाहीर करत असताना महाविकासचा एकही उमेदवार घोषित झाला नाही. त्यांची आघाडी कायम आहे की नाही, सीट शेअरिंग पूर्ण झाली काय, हेदेखील निश्चित नाही. भाजपने महाराष्ट्रात अद्याप एकही उमेदवार घोषित केला नाही. असे असताना महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवित एकमताने उमेदवारांची नावे घोषित करतात की प्रत्येक पक्ष स्वमर्जीतील उमेदवार पुढील काळात घोषित करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

तर दुसरीकडे महायुतीत एकमत नसल्याने भाजपने महाराष्ट्रात एकही उमेदवार का घोषित केला नसल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्यात सीट शेअरिंगविषयी एकमत झाले की नाही, असा संशय यानिमित्त बळावला आहे. त्याचबरोबर नेमक्या कोणत्या जागा कोणाला सुटल्या याची ही जाहीर वाच्यता महायुतीचे नेते करताना दिसत नाही. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रातील एकही उमेदवार घोषित केला नसल्याचे चित्र आज निर्माण झाले होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT