BJP Politics : दिल्लीत भाजपला 27 वर्षांनंतर सत्ता मिळाली आहे. गुरूवारी (ता. 20) नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. पण नेत्यांच्या मनात एक धाकधूक कायम असेल. भाजपला राज्यात चौथा मुख्यमंत्री मिळणार असला तरी आधीचा इतिहास पक्षाच्या सध्याच्या नावलौकिकाला साजेसा नाही. पक्षाच्या राज्यातील पहिल्या मुख्यमंत्र्यांपासूनच नामुष्की ओढवली होती. ती चूक पक्ष पुन्हा करणार नाही, अशीच चर्चा आता रंगली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असणार, याचीच सध्या जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री कोण होणार, ते पाच वर्षे राहणार की नाहीत, अशीही चर्चा त्यासोबतच सुरू आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. भाजपला पहिल्यांदा 1993 मध्ये राज्यात सत्ता मिळाली. मदन लाल खुराना हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. मात्र, हवाला प्रकरणात त्यांचे नाव आल्याने कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला.
खुराना हे केवळ 27 महिने मुख्यमंत्रिपदावर होते. त्यानंतर भाजपने साहिब सिंह वर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली. पण तेही फारकाळ या पदावर टिकले नाहीत. 31 महिन्यांतच त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. कांद्याचे वाढलेले भाव त्यांच्या अंगलट आले. नागरिकांमध्ये नाराजी वाढल्याने पक्षाला त्यांचा राजीनामा घ्यावा लागला.
विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना भाजपला मुख्यमंत्री बदलावे लागले. वर्मा यांच्यानंतर सुषमा स्वराज्य मुख्यमंत्री बनल्या. त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. मात्र, त्यांनाही केवळ 52 दिवस मिळाले. विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचे कमळ फुलले नाही. काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता काबीज केली. सलग 15 वर्षे राज्यात काँग्रेसची सत्ता होती.
भाजपवर ही नामुष्की पुन्हा ओढवू नये, अशीच चर्चा सध्या रंगली आहे. निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस उलटले तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पक्षाला ठरवता आलेला नाही. पक्षाला राज्यात 48 जागा मिळाल्या आहेत. 1993 च्या तुलनेत केवळ एक जागा कमी मिळाली आहे. त्यावेळी पाच वर्षात भाजपला तीन मुख्यमंत्री करावे लागले होते. आता पुढील पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहील, असा चेहरा भाजप निवडणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.