
Prayagraj News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभचा उल्लेख ‘मृत्यू कुंभ’ असा केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपकडून बंगालमध्ये आंदोलन केले जात असून अनेक नेत्यांनी या विधानाचा निषेध केला आहे. मात्र, उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे ममतांच्या मदतीला धावून आले आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेश सरकारलाही खडेबोल सुनावले आहेत.
ममता बॅनर्जी यांनी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात झालेली चेंगराचेंगरी, मोठी वाहतूक कोंडी, नदीतील प्रदुषित पाणी आदी मुद्द्यांवर उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, ‘हा मृत्यू कुंभ आहे... मी महाकुंभचा आदर करत, पवित्र गंगामैय्याचाही आदर आहे. पण तिथे काहीच नियोजन नाही.’ चेंगराचेंगरीमध्ये 30 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यावरूनच ममतांनी आपला संताप व्यक्त केला होता.
भाजपने ममतांच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेत हा धार्मिक भावना दुखावल्याची टीका केली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मात्र कुंभमेळ्याच्या आयोजकांवर ठपका ठेवत ममतांच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्यांनीही वाहतूक कोंडी, विस्कळीत नियोजन, प्रदुषित पाणी आदी मुद्दे पुढे करत अप्रत्यक्षपणे सरकारवर निशाणा साधला आहे.
शंकराचार्यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले की, तिथे 300 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे नियोजनातील अपयश नव्हे तर मग काय आहे? लोकांना त्यांचे सामान घेऊन 25 ते 30 किलोमीटर चालावे लागले. स्नानासाठीच्या पाण्यामध्ये सांडपाणी येत आहे. हे पाणी स्नानासाठी योग्य नसल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. त्यानंतर कोट्यवधी लोकांना त्यामध्ये स्नान करावे लागत आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
नदीत येणारे सांडपाणी थांबविणे किंवा ते काही इतरत्र वळवणे हे तुमचे काम आहे. जेणेकरून लोकांना स्वच्छ पाण्यात स्नान करता येईल. तुम्हाला 12 वर्षांपूर्वीच माहिती होते की, महाकुंभ 12 वर्षांनंतर येणार आहे. त्याअनुषंगाने तुम्ही काहीच का प्रयत्न केले नाही, असे खडेबोलही शंकराचार्यांनी सुनावले आहेत.
कमी जागेत अधिक लोक येणार असल्याचे माहिती असूनही तसे नियोजन करण्यात आले नाही. चुकीची माहिती पसरवण्यात आली. 144 वर्षांचा खोटा प्रचार करून लोकांना आकर्षित करण्यात आले. गर्दीचे नियोजन करता आले नाही. लोकांचा मृत्यू झाला, तोही लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा खूप मोठा गुन्हा होता. अशा परिस्थितीत काही जणांनी असा (मृत्यू कुंभ) उल्लेख केला तर आपण त्याला विरोध करू शकत नाही, असे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.